दीनबंध स्मृती प्रबाेधन कार्यक्रम उत्साहात
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकाेला: कविता वेदनेचं प्रतिबिंब असते. जनसामान्यांच्या व्यथा, वेदना साहित्यातून साहित्यातून मांडण्याची अभिव्यक्ती आज फुलताना दिसत आहे. आजही खेड्यापाड्यात प्रगल्भ विचारांची कविता जन्माला येत आहे. थेट काळजाला भिडणाऱ्या लाेकभाषिक कविता जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिकचे माजी सनदी अधिकारी, विचारवंत, लेखक बी. जी. वाघ यांनी केले.
साहित्यिक, कलावंतांचा गाैरव
कार्यक्रमात आत्माराम पळसपगार यांना दीनबंधु काव्य लेखन पुरस्कार, वसंत मानवटकर यांना दीनबंधु कलावंत पुरस्कार, नागसेन सावदेकर यांना दीनबंधु गीत गायन पुरस्कार, विलास अंभोरे यांना दीनबंधु कादंबरी लेखन पुरस्कार, समाधान सिरसाट यांना दीनबंधु कलापथक पुरस्कार, तसेच आ. कि. सोनोने यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कपिलवस्तूनगरस्थित बुद्धविहारात नालंदा प्रकाशनतर्फे आयाेजित ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक दीनबंधू शेगावकर गुरुजी स्मृती प्रबाेधन मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाेलत हाेते. यावेळी बी. जी. वाघ यांनी दीनबंधुंच्या नावे सहा सत्कारमूर्तींना गाैरववृत्ती देऊन त्यांना मानपत्रे प्रदान करीत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. औरंगाबादचे माजी शिक्षणाधिकारी डाॅ. रमेशचंद्र धनेगावकर यांनी दीनबंधूंच्या साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. दीनबंधूंच्या लेखनामुळे आंबेडकरी चळवळ भक्कम पायावर उभी झाली, असे ते म्हणाले. दीनबंधूंच्या साहित्यात परिवर्तनाचा विचार असल्याचे गाैरवाेद्गार डाॅ. भास्कर पाटील यांनी काढले. शेगावकर यांचा प्रशासक ते प्रकाशक हा प्रवास प्रेरणादायी असल्याचे लेखिका शिला घरडे म्हणाल्या. समाजाला साहित्याद्वारे प्रबाेधनाचे बळ मिळते. त्यामुळे अखंडित प्रबाेधनात्मक लेखन ही काळाची गरज असल्याचे सेवानिवृत्त आयएएस विश्वनाथ शेगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमात बी. गाेपनारायण, सुनिता इंगळे, डाॅ. पी. जे. वानखडे, प्रा. डाॅ. एम. आर. इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. ज्येष्ठ कवी आ. कि. साेनाेने यांच्या ‘पायदळी पडलेली फुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साेनाेने यांची कविता समाजात नव्या विचारांची पेरणी करीत असल्याचे गाैरवाेद्गार मान्यवरांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गवई यांनी केले. संविधान वाचन विशाल नंदागवळी यांनी केले.