माजी प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंह राव, माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग आणि हरित क्रांतीचे जनक कृषीतज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मधून आज हे जाहीर केलं. विद्वान राजकारणी असलेले नरसिंह राव यांनी विविध पदांवर काम करून देशाची मोठी सेवा केली. त्यांचं दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यासाठी, देशाची समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया घालण्यासाठी महत्वाचं ठरलं असं त्यांनी म्हटलं आहे.
चौधरी चरणसिंग यांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं असं त्यांनी म्हटलं आहे. एम एस स्वामिनाथन यांनी आव्हानात्मक काळात देशाला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.