भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर क्रांतिवीरांनी आपले प्राण देशाला अर्पण केले, त्यात क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी राघोजी वस्तादसारख्या महान क्रांतिकारकाचे स्थान वरचे आहे. लहुजींचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी नंतरच्या काळात लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. शौर्यशाली कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ ही पदवी दिली. लहुजींचे वडील हिंदवी स्वराज्याचे धाडसी व निष्ठावान सरदार होते. राघोजी साळवे बलदंड देहयष्टी लाभलेले उंचपुरे व प्रखर बुद्धिमत्ता असलेले सरदार होते. एकदा राघोजींनी पेशव्यांच्या दरबारात ‘जिवंत वाघ’ आपल्या खांद्यावर आणला आणि त्यांचे धाडस पाहून तिथले दरबारातील सरदार व खुद्द पेशवे अचंबित झाले होते. अशा धाडसी राघोजींचे पुत्र लहुजी वस्ताद. आपल्या वडिलांचा पराक्रम बघत लहुजी लहानाचे मोठे झाले. लहुजींना युद्धकलेचे शिक्षण त्यांच्या घरातील थोर पुरुषमंडळींकडून मिळाले होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जहाल क्रांतिकारक ‘निर्माण’ करण्याचे त्यांनी मनात ठरविले. इ. स. १८२२ मध्ये रस्तापेठ पुणे येथे तालीम युद्ध कला, कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यात अनेक क्रांतिकारक वीरांना घडवले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, महात्मा फुलेंचे सहकारी, वाळवेकर आणि परांजपे हे सगळे महारथी लहुजी वस्ताद यांच्या आखाड्यातच शिकले.
खडकी येथे राघोजींनी इंग्रज सैन्याशी कडवी झुंज दिली. मात्र त्या युद्धात ते धारातीर्थी पडले. त्याच वेळी लहुजी यांनी इंग्रजांचे पारिपत्य करणाऱ्यासाठी भीष्मप्रतिज्ञा केली. ‘जगेल तर देशासाठी, मरेन तर देशासाठी’ अशी शपथ त्यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना घेतली.
लहुजींना अफलातून शरीरयष्टी प्राप्त झाली होती. त्यासाठी त्यांनी अतिशय श्रम, मेहनत घेतली. शिवाय शरीर कमवण्याची आवड होती. त्यांनी ती आवड निधड्या छातीच्या अनेक तरुणांमध्ये निर्माण करण्याचा संकल्प केला. तरुण पिढी देशासाठी आत्मसमर्पण करण्यासाठी घडविण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यांनी तरुण मुलांना एकत्रित करून त्यांना युद्ध कलेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. डोंगर, किल्ल्यांवर चढून जाण्यासाठी घोरपडीचा उपयोग कसा करावा, धावत्या घोड्यावर बसून निशाणबाजी करणे, तुटक्या कड्यावरून उड्या मारणे हे सगळे त्यांनी पुण्याच्या गुलटेकडीवर नेऊन आपल्याकडील युद्ध कलेचे तरुणांना प्रशिक्षण दिले. अनेक ठिकाणी आखाडे सुरू केले.
त्यांनी अज्ञातवासात राहून धनाढ्य सावकरांना, इंग्रजांची गुलामी करणाऱ्यांना वठणीवर आणणे, तारायंत्र बंद पाडणे, सरकारी खजिना लुटणे, जनतेच्या मनात ब्रिटिशांविषयी तिरस्कार निर्माण करणे हे कार्य चोखपणे केले. त्यांच्या तालमीत, आखाड्यावर कोणताही भेदभाव न ठेवता शस्त्र विधीचे ज्ञान सर्वांना दिले. शिवछत्रपतींचा गनिमी कावा अंगी बाणवला. इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. १४ नोव्हेंबर १७९४ हा त्यांचा जन्मदिवस. त्यांना मनोभावे वंदन करून अन्याय तसेच अत्याचाराविरुद्ध लढणारी सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी संकल्प करण्याचा दिवस महाराष्ट्रात भव्य प्रमाणात साजरा केला जातो. लहुजी साळवे हे महान क्रांतिकारक म्हणून कायमच प्रेरणादायी राहतील.
■ कृष्णा नारायण आराणे