
डिजिटल पेमेंट (Digital Payments) वाढीस लागल्याने वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण देशात एकूण ४ हजार एटीएम बंद झाल्याची खळबळजनक आकडेवारी आहे. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था (digital economy) वेगाने वाढत चालली आहे. अनेक जण व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. परिणामी रोख रकमेचा वापर आता कमी प्रमाणात होऊ लागला आहे. याचा मोठा परिणाम हा एटीएम सेंटर्सवर दिसून येत आहे. देशात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने करणे शक्य झाल्याने नागरिकांनी रोकड बाळगणे कमी केले आहे. त्यामुळे एटीएमची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएमच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती. वर्षभरात ही संख्या घटून २,१५,००० वर गेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त ऑनलाईन पेमेंट केले जात आहे तेथील एटीएम बंद करावी लागली आहेत किंवा त्यांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. यूपीआयची लोकप्रियता वाढल्याने एटीएमचा वापर कमी होत असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. आरबीआयने लागू केलेल्या निर्बंधांचाही फटका बसल्याचे दिसून आले आहे. २०२२ या आर्थिक वर्षात ३ देवाणघेवाणीचे ८९ टक्के व्यवहार रोखीत केले आहेत. तसेच कोविडनंतर सरकारने कमी रोकड आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे धोरण स्वीकारले. तसेच आरबीआयकडूनही एटीएम वापरावर शुल्क तसेच इतर बँकांचे एटीएम वापरल्यास शुल्क वाढवण्यात आले आहे. मोफत व्यवहारांवर मर्यादा आणण्यात आली, त्यामुळे एटीएमचा वापर कमी होत गेला आहे.