आपल्या नखांकडे बघा. ती वाढली आहेत का ? नखांमध्ये मळ साठला आहे का ? नखांची काळजी घेणं महत्त्वाचे ठरतंच त्याचबरोबर नखांची निर्मिती कशी होते हे जाणून घेणंही महत्त्वाचे असते. मित्रांनो, नखांची निर्मिती ‘केराटिन’ या घटकापासून होते. केराटिनपासूनच केस आणि त्वचेच्या बाह्य आवरणाचीही निर्मिती होत असते. आपण नखं कापतो तिथून त्यांची वाढ होते असा आपला समज । असतो. पण प्रत्यक्षात बोटांशी जोडलेल्या भागापासून नखांची वाढ होत असते. केसांप्रमाणे नखंही छोट्या रक्तवाहिन्यांशी जोडलेली असतात. त्यातील रक्तामुळे नखांना फिकट गुलाबी रंग येतो. नखांवर थोडा दाब दिला तर ती जास्त गुलाबी होतात कारण यामुळे नखांच्या खालच्या भागातील रक्ताचा संचार वाढतो.
नखांच्या पेशी त्वचेच्या खाली वाढत असतात. प्रत्येक पेशींचं विभाजन होते आणि पेशींची संख्या वाढत जाते. नव्या पेशी जुन्या पेशींना त्वचेच्या पृष्ठभागावर ढकलतात. पृष्ठभागावर आल्यानंतर नव्या पेशी त्यांना बोटांच्या दिशेने ढकलतात. बाहेर पडल्यानंतर पेशींची संख्या वाढत नाही. त्यामुळे त्या मृत होतात. अशा मृत पेशी वाढत असल्यामुळे नखांची वाढ होत राहते. पायांच्या बोटांपेक्षा हातांच्या बोटांची नखं वेगाने वाढतात. बोटांना नखं जोडलेली असतात त्या भागाला क्युटिकल्स असं म्हटलं जातं. नवे नख तसंच बोटाचा आतला भाग यांच्या संरक्षणाचे काम क्युटिकल्स करतात. नखांमुळे बोटांचे रक्षण होते. असं असले तरी दर आठवड्याला नखे कापायला हवी. नखांमधली घाण स्वच्छ करायला हवी. यामुळे नखांचे आरोग्य टिकून राहते.