प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे,प्रेम या अडीच अक्षरी शब्दात किती ताकद आहे म्हणून सांगू? प्रेमाच्या प्रभावाखाली आल्यावर तर भले विद्वान, शहाणी माणसं शरणागती पत्करतात. राजे- महाराजांच्या ‘तख्तों- ताज’ ची उलथापालथ झाली, युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहीले, असं आपला इतिहास सांगतो. प्रेम या भावनेला जीवशास्त्रीय, रासायनिक बाजूही असते. मेंदूतील अनेक संप्रेरके आणि रसायने अर्थात केमिकल्स प्रेमात आपापली भूमिका चोख बजावत असतात. तर या अडीच अक्षरांमुळे तुमचं जीवन जसं बदलून जातं तसंच तुमच्या मेंदूत आणि शरीरात काय बदल होतात अर्थात केमिकल लोचा हे मी सांगणार आहे.
आम्ही मेडिकल क्षेत्रातील मंडळी हा सगळा शास्त्रीय विचार करून प्रेमात पडत नाही, बरं का! नाहीतर तुमचा उगाच गैरसमज व्हायचा की, आमच्या प्रेमाचा रंगच वेगळा म्हणून! पण तसं काही नाही हो ! कवीवर्य पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे,
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं अगदी सेम असतं.’
तर प्रेमीजन हो! आज मी तुम्हाला प्रेमरोगाची लक्षणे सांगणार आहे. प्रेमाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे. बापरे ! प्रेमालाही वर्गीकरणापासून आपण वंचित ठेवू शकलो नाही.
१) पहिली पायरी– गरज / इच्छा २) दुसरी पायरी– आकर्षण
(३) शेवटची पायरी ओढ
यापैकी प्रत्येक प्रकारात वेगवेगळी रसायने सहभागी होतात.
१) पहिला प्रकार गरज / इच्छा : या प्रकारात वयात येणाऱ्या स्त्री-पुरुषांत टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजीन ही संप्रेरके पुनरूत्पादनाकरता योग्य ते बदल घडवून आणतात. या रसायनांना पुरुष किंवा स्त्री हार्मोन असं संबोधल्या जातं. पुनरुत्पादनासाठी ही दोन्हीही संप्रेरके जोडीदाराची गरज तीव्र करतात. त्यातूनच प्रेमाची दुसरी पायरी म्हणजे आकर्षण निर्माण होतं.
२) आकर्षण : मुख्यतः डोपामाईन या न्युरोटान्समीटरचे काम आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्याला हॅप्पी हॉर्मोन म्हणूनही ओळखलं जातं. तसं त्याला रिवार्ड हार्मोनपण म्हणतात. हे हार्मोनचे प्रमाण वाढले तर अॅडीक्शन वाढतं. म्हणजेच, तीच गोष्ट पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होणं. म्हणून प्रेमात पडल्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटण्याची, बोलण्याची, त्या व्यक्तीचा आवाज ऐकण्याची भावना का निर्माण होते ? हे तुम्हाला आता समजले असेलच. डोपामाईनच्या बरोबर नॉरेएपिनेफरिन संप्रेरकही मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. नॉरएफिनेफरिन लढा किंवा पळा प्रतिक्रियेशी संबंधित असतात. हे हार्मोन्स प्रेमात पडलेल्या व्यक्तीला आनंदी आणि उत्साही बनवतं. आकर्षणामुळे मेंदूत सेरोटनिन या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपल्या मूडमध्ये बदल येतात. प्रेमात पडल्यावर आपण भूक, तहान, झोप सगळं विसरतो. त्यामुळेच डोपामाइनचा उच्च आणि सेरोटोनिनच्या कमी पातळीमुळे आपल्या जोडीदाराबाबत व्यसनासारखी, सक्तीची भावना निर्माण होते आणि आपण भावनिकरित्या आपल्या जोडीदाराबरोबर गुंतत जातो, त्याच्या अधीन होतो. सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे ओढ!
३) ओढ : यासाठी जे महत्त्वाचं संप्रेरक काम करतं ते म्हणजे ऑक्झीटोसीन ! प्रेमाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं असतं एकमेकांवर असलेला विश्वास आणि जोडणारे बंध आणि हे कार्य ऑक्झीटोसीन संप्रेरक करतात. म्हणून त्याला ‘कडल हार्मोन’ असे म्हणतात. त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणामही होतात. सामाजिक वर्तन आणि भावना यामुळे प्रभावित होतात. तर आता कळलं ना? प्रेमात पडल्यावर मेंदूत आणि शरीरात काय काय बदल होतात ते!
तर या आहेत प्रेमनगरीपर्यंत पोहचण्याच्या तीन पायऱ्या! नल-दमयंतीची प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का? दमयंती नल राजाच्या प्रेमात पडली होती.
त्याच्यासाठी व्याकुळ झाली होती. तिने खाणं-पिणंही सोडलं आणि तिची प्रकृती ढासळली. सारं विश्व तिला शून्यवत वाटत होतं. तेव्हा राजवैद्याला पाचारण केलं आणि ते तिला काही औषध द्यायला गेलेत तेव्हा दमयंतीने ‘औषध न लगे मजला असे उद्गार काढले. याचा अर्थ, मला औषध नको असा नाही तर फक्त ‘नल’ राजा हेच माझं औषध आहेत, असा आहे. त्यांच्या सहवासानेच मी आनंदी होईन, असा त्याचा अर्थ हा प्रेमज्वर बरा व्हायला तुमच्या प्रिय व्यक्तीचे दर्शन किंवा सहवास हीच मात्रा लागू पडते.
कधी दोघांनाही प्रेमभंगाचा सामना करावा लागतो. प्रेमभंगातही मेंदूतील रसायने आपली भूमिका चोख बजावतात. प्रेमभंग झालेले व्यक्ती अत्यंत निराश होते. तिला नैराश्याचा सामना करावा लागतो. डोपामाईन संप्रेरक चांगल्या किंवा वाईट अशा दोन्हींवर नियंत्रण ठेवतो. प्रेमभंग झाल्यावर त्याचे प्रमाण खूप अधिक वाढते आणि नियंत्रणाबाहेर त्याची पातळी जाते. त्यामुळे हे सगळे बदल होतात आणि निराशेबरोबरच द्वेष, ईर्ष्या या भावनाही मनामध्ये येतात. तर प्रेमरोग ते प्रेमभंगामागे ही सगळी शास्त्रीय कारणही आहेत. प्रेमभंगातून बाहेर यायलाही संप्रेरके आपले काम करतात. फेब्रुवारीच्या या प्रेमाच्या महिन्यात जर तुम्ही प्रेमात पडले असाल तर इतकं रूक्ष, शास्त्रीय कारण मात्र तुमच्या जोडीदाराला सांगत बसू नका, बरं का! नाही तर तुमच्या प्रेमाची गाडी कधी प्रेमभंगाकडे वळेल हे कळणारच नाही. तर ही सुंदर भावना अनुभवायला प्रत्येकाने प्रेमात पडायलाच हवं …!
डॉ. सुमेधा हर्षे