वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादिवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जसीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतें.
जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिकदृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकते.
दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं.
इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला.
इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे.
ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसऱ्या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या १० वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही, तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणाऱ्या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत. एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्यूज अॅट टेन म्हणून बरोबर १० वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा १५ मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते.
दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत, वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि ३ मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते. इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे.२०० – वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक बस पुढील वर्षी निविदा मागवणार.