महाराणा प्रताप हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो एक तेजस्वी योद्धा. जिथे असतो दुर्गम अरण्यातील संग्राम. घोड्यावरून उडणारा सिंह. हिंदुत्व आणि स्वाभिमानासाठी झगडणारा एक अद्भुत राजा! असा राजा ज्यांना अकबर व मुगल शासकांनीसुद्धा मुक्तमनाने स्तुती सुमने वाहिलीत. असे महान व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे मेवाड संरक्षक महाराणा प्रतापसिंहजी. Maharana Pratap
भारताच्या कान्याकोपऱ्यात गुंजणारे नाव महाराणा प्रताप. हे शौर्य आणि वचनबद्धतेचे प्रतीक होते. महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला वीरांची भूमी समजल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कुंभलगड, मेवाड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उदयसिंहजी व आईचे नाव जयवंताबाईजी होते. धन्य झाला राजस्थान जेथे जन्मला प्रताप महान. त्यांचे मित्र भिल्ल समाजातीलही होते. ते राजकुमार असूनही सामान्य जनतेबरोबर मिळून मिसळून राहत. त्यांचे बालपण खूप आनंदात गेले. त्यांना लहानपणापासूनच जास्तीत जास्त वेळ प्रजेबरोबर घालवायला खूप आवडत असे. तेथे भिल्ल समाजातील योद्ध्यांनी त्यांना सशस्त्र युद्धाचे धडे दिले. ते लहानपनापासूनच अतिशय शूर, पराक्रमी, दृढनिश्चयी, स्वाभिमानी व तेजस्वी होते. ते कोठेही जाण्याआधी आपली जन्मभूमी मेवाडची माती कपाळावर लावत व थोडी माती आपल्या सोबत घेऊन जात असत. मुगल सम्राट अकबराशी त्यांनी अनेक वर्षे लढा दिला व मुगलांना पराभूत केले. चेतकवर स्वार होऊन शत्रू संहारले. सन १५६७ मध्ये मेवाडची राजधानी चित्तोडवर अकबराने कब्जा केला. तेव्हा अकबराने आपले दूत महाराणा प्रतापकडे शांती करार करण्यासाठी ६ वेळा पाठविले. परंतु, धर्माभिमानी, स्वातंत्र्यप्रेमी राजपूत राजाने कोणासमोरही झुकणे मान्य केले नाही.
भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण समजली जाणारी लढाई म्हणजे हल्दीघाटीची लढाई. १८ जून १५७६ साली मेवाडचे राजे महाराणा प्रतापसिंह व मुगल सम्राट अकबर यांच्यामध्ये ही लढाई झाली. प्रत्यक्षात अकबर या लढाईमध्ये महाराणा प्रतापांचा सामना करण्यास आला नव्हता. त्याचा सेनापती मानसिंगच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली. ही लढाई राजस्थानमधील गोगांडाजवळील एका डोंगराळ भागात झाली. या लढाईमध्ये महाराणा प्रतापांजवळ ३ हजार घोडदळ आणि ४०० भिल्ल तिरंदाज व १० हजार पायदळ सैन्य होते. अकबराचे ८० हजार सैन्य होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या सैन्याचे नेतृत्व हकिमखान सुदी यांनी केले होते. अनेक अडचणींना सामोरे जात मेवाड सैन्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावले. मेवाडच्या कमी सैन्यापुढे अकबराचे भले मोठे सैन्य कमी पडायला लागले होते. महाराणा प्रतापांनी गनिमी काव्याने युद्ध करण्यास सुरुवात केली व मुगल सैन्याला पळ काढण्यास भाग पाडले. विशेषतः हल्दीघाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांचा प्रिय घोडा ‘चेतक’ याने देखील शौर्य दाखवले. ‘चेतक’ने महाराणा प्रतापांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढले. त्यावेळी चेतक दऱ्याखोऱ्यातून जखमी अवस्थेत वाऱ्याच्या वेगाने धावला व २५ फूट लांब दरीतून उडी मारली. नंतर त्याचा मृत्यू झाला. चेतकच्या मृत्यूने महाराणांना अतिशय दुःख झाले. काही काळानंतर महाराणा प्रतापांनी एक नवीन शहर वसवले. त्याचे नाव ‘चावंड ‘ असे होते. १५८२ मध्ये त्यांनी दैवर या ठिकाणी मुगल चौकीवर हल्ला करून त्यावर ताबा मिळविला. यानंतर आपले मुगलांच्या ताब्यात असलेले ३४ किल्ले परत मिळविले. बघता बघता कुंभलगड, उदयपूर, पश्चिम मेवाड, गोगुंडा हे सर्व आपल्या ताब्यात घेतले. इतिहासकार याला मेवाडचे मॅराथॉन म्हणतात. त्यानंतर मेवाडच्या उत्थानासाठी राणाजींनी भरपूर कार्य केले. १५ वर्षांनंतर म्हणजे १९ जानेवारी १५९७ रोजी शिकारीच्या मोहिमेदरम्यान युद्धामुळे आलेला थकवा व खालावलेली प्रकृती यामुळे भारतातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अकबराला कळताच त्याचे शिश झुकले व डोळ्यात अश्रू आले. अचानक अकबराच्या तोंडून उद्गार निघाले, धन्य महाराणा प्रताप, वीर योद्धा! शत्रू असावा तर महाराणा प्रतापांसारखा. शूर महाराणा प्रतापला हरवण्याची माझी इच्छा अपूर्णच राहिली.
ज्यांनी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. पण, अधर्मापुढे झुकले नाही, अशा हिंदुसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या चरणी विनम्र अभिवादन!
– संगीता चौहान
