स्वातंत्र्य चळवळीनंतर देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू केले गेले. साधारणपणे १९३४ ते १९४० या काळात स्वातंत्र्याची ही चळवळ अधिक गतिमान झाली होती. ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहू नयेत यासाठी त्यांना स्वावलंबनातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. यातूनच वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून ग्रामसेवा मंडळ या स्वयंसेवी संस्थेची उभारणी झाली. आजही देशभरात ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामसेवा मंडळाच्या माध्यमातून होत आहे. ८८ वर्षे अविरतपणे काम करणाऱ्या या ग्रामोद्योग मंडळाचा घेतलेला आढावा.
वर्धा येथील समाजसेवी जमनालाल बजाज यांनी विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून नालवाडी परिसरात ग्रामसेवा मंडळाचे कामकाज सुरू केले. विनोबा भावे यांनी आश्रमातील पदाधिकाऱ्यांसाठी १४ दिवसांच्या गावभेटीचा कार्यक्रम तयार केला. ‘भगवान प्रदक्षिणा’ असे त्याला नाव देण्यात आले. एका कार्यकर्त्याने या भ्रमंतीच्या माध्यमातून बारा गावांना भेट देणे असे हे काम होते. हे कार्यकर्ते लोकांना सूत कताई आणि कापड विणण्याचे काम शिकवीत होते. ग्रामसेवा मंडळाचा खादी यात्रा हा एक विशेष कार्यक्रम होता. भाषण, चर्चासोबतच खादी यात्रेत सूतकताई आणि विणकाम स्पर्धांचे आयोजन केले जायचे. यातील विजेत्यांना चरखा भेट स्वरूपात दिला जात असे. अशा प्रकारे ग्रामोद्योगाला पाठबळ देण्याचे काम सुरू झाले.

लोकसहभागातून कापूस ते कापड या संकल्पनेवर काम होत असताना त्याकरिता लागणारे संयंत्रदेखील स्वदेशी असावे अशी ग्रामसेवा मंडळाची भूमिका होती. कापूस ते कापड संकल्पनेत चरखा आणि विणकामासाठी हातमागाची गरज होती. हे लक्षात घेऊन ग्रामसेवा मंडळाने ही साधने तयार करण्यावर भर दिला. उत्पादनासोबत संशोधनासाठी देखील संस्था प्रयत्नशील राहिली. त्यामुळे चरख्याचे विविध प्रकार विकसित करण्यात संस्थेला यश आले. यामध्ये पाच प्रकारच्या मानवचलित चरख्यांचा समावेश आहे. एकाच वेळी आठ ते दहा धागे निघतील किंवा सूतकताई होईल असे हे चरखे आहेत. नजीकच्या काळात कमी श्रमात अधिक काम व्हावे यासाठी सौरऊर्जाचलित चरखादेखील तयार करण्यात आला.
महिला झाल्या आर्थिक सक्षम
चरख्यावर सूतकताईचे काम संस्थेच्या परिसरात होते. काही महिलांना सूतकताईसाठी घरी चरखे वापरण्यास दिले आहेत. त्याकरिता थोडीफार रक्कम अनामत स्वरूपात स्वीकारली जाते. या माध्यमातून एका महिलेला १५० ते २०० रुपयांचे उत्पन्न मिळते. सूतकताईच्या प्रमाणात मेहताना देण्याची पद्धत या ठिकाणी प्रचलित आहे. सध्या १०० महिलांना चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संस्थेच्या परिसरात वीस हातमाग आहेत. ग्रामसेवा मंडळामध्ये विणकर असून, त्यांना हे सूत दिल्यानंतर त्यापासून कापड तयार करून घेतले जाते.
पेटी चरख्याने दिली आधुनिकतेची जोड
ग्रामसेवा मंडळाकडून खास पेटी चरखा तयार करण्यात आला आहे. आत्मिक समाधानासाठी या चरख्याचा वापर होतो. मोठ्या आकाराचा चरखा १९५० रुपये आणि प्रवासी श्रेणीतील पेटी चरखा १७०० रुपयांना उपलब्ध आहे. ग्रामसेवा मंडळाद्वारे हातमाग तयार करून त्याची विक्री होते. देशभरात मागणीनुसार याचा पुरवठा करण्यावर मंडळाचा भर आहे. संस्थेद्वारे अनेक प्रकारची ग्राम उपयोगी संयंत्र विकसित केली जातात. हा परिसर सरंजाम म्हणून प्रसिद्ध आहे.
देशी गोवंश संवर्धन, रेशीमनिर्मिती यंत्र, लाकडी तेलघाणा आणि बरंच काही….
वर्धा जिल्हा हा गवळाऊ गोवंशासाठी प्रसिद्ध आहे. या जातीचे बैल काटक असतात तसेच गायीची दूध उत्पादन क्षमतादेखील चांगली आहे. त्यामुळे १९४० मध्ये संस्थेच्या प्रक्षेत्रावर गवळाऊ गोवंश संवर्धनासाठी गोशाळा सुरू करण्यात आली. जातिवंत वळू आणि दुधाळ गाई तयार करण्यावर भर देण्यात आला. येथे सध्या विविध जातींचे देशी गोवंशाचे संवर्धन केले जाते. याशिवाय रेशीम कोषाला कापून त्यातून पतंग निघून गेल्यानंतर त्या कोशाला बाजारपेठ मिळत नाही. अशा कोषांपासून रेशीम धागा तयार करण्याची यंत्रणा संस्थेने विकसित केली आहे. संस्थेला रेशीम उद्योगातील वाया जाणाऱ्या घटकांपासून धागा मिळविण्यात यश आले आहे. पूर्वी गावोगावी बैलचलित लाकडी तेलघाण्या होत्या. त्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीसोबतच शेतीमालावर प्रक्रियेचा उद्देश साधला जात असे. संस्थेने लाकडी तेलघाणीची संकल्पना तशीच कायम बैलाऐवजी मोटारीचा वापर सुरू केला आहे. शेतकऱ्यांकडूनच बाजार दरानुसार तेलनिर्मितीसाठी कच्चा माल खरेदी केला जातो. लाकडी तेलघाणा उद्योग गावस्तरावर उभारण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना तेलघाणा तयार करून देण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. तेलघाणा तयार करण्यासाठी बाभूळ आणि भेराच्या लाकडाचा वापर होतो..
अशी होते उत्पादनांची विक्री
मंडळाद्वारे हातमागावरील कापड लाकडी घाण्यावरील तेल तसेच अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्याच्या विक्रीसाठी संस्थेने वर्धा शहरात दोन मंडळाचा परिसर असलेल्या भागात एक आणि सेवाग्राम आश्रम परिसरात एक विक्री केंद्र उभारले आहे. तसेच विनोबांचे साहित्य प्रकाशनावर मंडळाचा भर आहे. त्याकरिता परमधाम प्रकाशन आहे.
ग्रामसेवा मंडळाची चाळीस एकर शेती आहे. या प्रक्षेत्रावर ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, भात तसेच देशी कापसाची लागवड केली जाते. शेतीमाल प्रक्रियेतही मंडळाने सातत्य राखले आहे. येत्या काळात स्वयंसाह्यता समूह, शेतकरी कंपन्या आणि बचत गटांना गावस्तरावर उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा हेतू असल्याचे अध्यक्षा करुणाताई फुटाणे यांनी सांगितले.
स्वरा सावंत
tejashreebhekare1989@gmail.com