खाण्यात ओव्याचा स्वाद खूपच चांगला लागतो.. याशिवाय पोटांच्या विकारासाठी ओवा अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ओव्याचा उपयोग सौंदर्यात भर घालण्यासाठीही होऊ शकतो. ओव्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते जाणून घ्या.
» ओव्याचा मारक मुरुमांवर ठरतो जालीम उपाय मासिक पाळीच्या दिवसात असो अथवा अन्य वेळीही अनेक मुली वा महिलांना चेहऱ्यावर मुरूम येण्याचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी बाजारातील अनेक फेसवॉश वा घरगुती फेसमास्कही वापरण्यात येतात. याचा वापर करून पिंपल्सपासून आपल्याला नक्कीच सुटका मिळवता येते.
» चेहऱ्यासाठी वापरा ओव्याची पेस्ट
एका भांड्यामध्ये घरात ओवा भाजून तयार केलेली ओव्याची पावडर घ्या. या पावडरमध्ये साधारण एक चमचा दही मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण १० मिनिट्स तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग तुमच्या चेहऱ्यावर करू शकता.
» ओव्याच्या मास्कचा सुरकुत्यांसाठी वापर ओवा त्वचेला चमक देण्यासह त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचेही काम करतो. सततची धावपळ, वेळेवर जेवण न होणे, धूळ, प्रदूषण यामुळे कमी वयातच सुरकुत्या चेहऱ्यावर दिसू लागतात. पण ओव्याचा वापर करून या सुरकुत्या कमी करता येतात. कारण ओव्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि सुरकुत्या कमी होतात. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या. त्यात ओवा मिक्स करा. हे पाणी थंड झाल्यावर पाणी गाळून घ्या आणि ओवा खलबत्त्यात ठेचून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गाळलेले ओव्याचे पाणी प्या. यामुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते. चेहरा साधारण १० मिनिट्सने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे करून पाहू शकता.
» चमकदार त्वचा हवी असेल तर प्या ओव्याचे पाणी त्वचा धूळ आणि प्रदूषणामुळे खूपच खराब आणि निस्तेज होते. त्वचेचे आरोग्यही बिघडते. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते. त्वचेत खोलवर जाऊन ओव्याचे पाणी पोषण देते आणि यामुळे चेहरा हायड्रेट राहण्यासाठीही मदत मिळते. चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. तसंच ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे पोटाचे विकारही दूर राहतात
» डेड स्किनसाठी ओव्याचा स्क्रब डेड स्किन अर्थात मृत पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर महिला हमखास करतात. या स्क्रबिंगमुळे ब्लॅकहेड्समधील घाण निघून जाणे, टॅनिंग कमी होणे असे फायदे मिळतात. यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीने ओव्याचा स्क्रब तयार करून त्याचा वापर करून घ्या. स्क्रबसाठी एका वाटीत एक चमचा ओवा पावडर घ्या आणि त्यात साखर आणि लिंबाचा रस मिक्स करून स्क्रब तयार करा. हा स्क्रब चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा साधारण २ मिनिट मसाज करून झाल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. पंधरा दिवसातून एकदा तुम्ही याचा वापर करू शकता.
» सफेद केसांचा त्रास होईल दूर
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही समस्या अनेकांना त्रासदायक ठरते. पांढऱ्या केसांना दूर ठेवण्यासाठी ओव्याचा वापर करावा. ओव्यातील पोषक तत्वे केसांना मजबूती देण्यासाठी आणि केस काळे ठेवण्यासाठी मदत करतात. सफेद केसांनी हैराण असाल तर हा उपाय करू शकता. यासाठी रात्री एका ग्लासात पाणी घ्या आणि भाजलेला ओवा दोन चमचे मिक्स करा. रात्रभर हे तसेच ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि जेवण्यापूर्वी अथवा नाश्ता करण्यापूर्वी हे पाणी प्या.