मुली, युवती, महिलांवरील वाढते अन्याय, अत्याचार, विनयभंग, अतिप्रसंग यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्यामुळे त्यावर वेळोवेळी उपाययोजना करणे आणि अंमलबजावणी करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता जर आपण बदलू शकलो आणि कठोर पावले उचलू शकलो, तर नक्कीच अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसेल.
आपल्याबाबतीत कोणतीही अनुचित, अप्रिय घटना घडल्यास पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करायला तत्पर आहेच; परंतु आपण स्वतः देखील सावधगिरीने वागणे, सतर्क राहणे खूप आवश्यक आहे. घरात असताना, घराबाहेर असताना, प्रवास करताना अथवा सामाजिक माध्यमे वापरताना अनेकदा आपल्याला चुकीचे अनुभव येत असतात. या सर्व प्रसंगांना धैर्याने तोंड देणे आणि स्वतःचा बचाव करणे आपण शिकायला हवे. स्वतःच्या बचावासाठी पेपर स्प्रे नक्कीच सोबत ठेवा. कोणीही तुमचा निर्जन ठिकाणी पाठलाग करीत असेल, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या वेळी आरडाओरडा करणे, लोकांचे लक्ष वेधून घेणे, आपल्यातील धैर्य एकवटून गुन्हेगाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहा. घराबाहेर, प्रवासात असताना आपल्याला कोणीही संशयित आहे असे जाणवल्यास त्याच्या हालचालींवर त्याच्या मोबाइलमधील संभाषणावर, देहबोलीवर लक्ष ठेवा. आपल्या हाती असलेल्या मोबाइल वा स्मार्ट फोनचा उपयोग स्वतःच्या रक्षणासाठी करा ऑटोरिक्षा किंवा इतर वाहनातून एकट्याने प्रवास करताना त्या वाहनाचा नंबर, वाहनाचा फोटो आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना जरूर पाठवा. आपण कोठे आहोत, आपले लोकेशन काय आहे हे सगळ्यांना कळवत राहा, जेणेकरून वेळप्रसंगी त्यांची मदत तुम्हाला मिळू शकेल.
मोबाइल वापरताना अथवा हाताळतात देखील काही दक्षता महिलांनी घेणे आवश्यक आहे. मोबाइलमध्ये कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती अथवा डाटा शक्यतो ठेऊ नका. बँक अकाऊंट नंबर, एटीएम पिन क्रमांक, पासवर्ड मोबाइलमध्ये सेव करून ठेऊ नका. त्याचप्रमाणे ई-मेल, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक याबाबतची माहिती गोपनीय कोणाच्या हाती लागेल अशा प्रकारे साठवून ठेऊ नका. मोबाइलमध्ये स्वतःचे फोटो सेव करून ठेवणे पण धोकेदायक असू शकते. मोबाइलचा आयएमईआय क्रमांक आपल्या मोबाइलच्या सुरक्षेसाठी जपून ठेवा. रितसर पावती असल्याखेरीज मोबाइल खरेदी करू नका. तसेच तुमच्या मोबाइलमध्ये काही बिघाड आला म्हणून परस्पर तो विकून टाकू नका, त्यातील सर्व डाटा, माहिती डिलिट केल्याची खात्री करा. पावतीशिवाय खरेदी केलेला मोबाइल चोरीचा असू शकतो. आपल्या मोबाइलच्या सुरक्षेसाठी तुम्ही काही विशेष सुरक्षा अॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर डाऊनलोड करून ते
वापरा. आपल्या मोबाइलमध्ये जीपीआरएस प्रणालीचा समावेश जरूर करा. कार्यालयीन कामाच्या ठिकाणी जर कोणी तुम्हाला फसविण्याचा, तुमच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करण्याचा, तुम्हाला दडपणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल, तुमचे मानसिक खच्चीकरण केले जात असेल, तर संबंधित व्यक्तीची रितसर तक्रार करून अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवा. मुली, युवती, महिला समाजात अथवा अनोळखी ठिकाणी देखील अतिशय निष्काळजीपणे वावरताना दिसतात, कोणावरही पटकन विश्वास ठेवणे, आपल्याबद्दलची सर्व खरी माहिती अनोळखी व्यक्तीला पुरवणे, सार्वजनिक ठिकाणी फोनवर बोलताना मोठ्याने आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे भान न ठेवता वाटेल त्या विषयावर बोलणे, चुकीची देहबोली अथवा चुकीचा पेहराव नको त्या ठिकाणी वापरणे. यामुळे समोरच्या चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागतात. मला, माझ्या चारित्र्याला माझ्या शरीराला धोका आहे हे वेळीच ओळखा.
कोणत्याही परिस्थितीमधून स्वतःचा बचाव कसा करता येईल यावर विचार करण्याची सवय लावून घ्या. सहजासहजी कोणाचाही शारीरिक स्पर्श आपल्याला होणार नाही याची काळजी घ्या. ऑनलाइन काम करताना स्वतःचे एक्सपोसर आणि अॅक्सेस टाळण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच स्वतःला सहजपणे फसविले जाणारे म्हणून बघू नका आणि तशा पद्धतीने वागू देखील नका. तुमच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात देहबोली आत्मविश्वास दर्शवणारी असणे आवश्यक आहे. तुमच्या सीमारेषा तुम्ही स्वतःला आखून घ्या. आपल्याकडूनच कोणाला चुकीचं वागण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिसाद दिला जात नाही ना याची पुरेपूर काळजी घ्या. एखाद्याशी बोलताना तुमचा संवाद स्पष्ट असू द्या. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला गैरकृत्य करायला निमंत्रण देत आहात, असे संभाषण अनोळखी व्यक्तीशी करणे टाळा. तुम्हाला शक्य असल्यास सेल्फ डिफेन्सचे ट्रेनिंग घ्या. कधीही बिकट परिस्थितीमध्ये कसोटीच्या वेळी त्याचा वापर नक्कीच करता येतो.
मीनाक्षी जगदाळे