वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
सध्याच्या इंटरनेट युगात असंख्य गोष्टी वेगाने पुढे जात आहेत. त्यासाठी स्मार्टफोन व कॉम्प्युटरचे मोठे योगदान म्हणावे लागेल. आपल्यातील सर्वच जण कोणती ना कोणती वेबसाइट नित्यनेमाने वापरत असतो; पण आपणास ठाऊक आहे का? आपण जी वेबसाइट वा अॅपचा वापर करत आहोत, ती ज्याच्यामुळे सक्रिय आहे, त्यास एक गोष्ट कारणीभूत असते, ती म्हणजे ‘कोडिंग’.त्यामुळे ‘कोडिंग’ विश्वाचे एक वेगळंच वलय आपल्या अवती-भोवती निर्माण झालं आहे. त्याच अनुषंगाने आपण या ‘कोडिंग’च्या आगळ्या-वेगळ्या दुनियेची सफर करणार आहोत.
कोडिंग म्हणजे काय?
‘कोडिंग’ म्हणजे कॉम्प्युटरची एक स्वतंत्र भाषा, ज्यास मशीन कोड असे म्हणतात. ती कॉम्प्युटरला कमांड देते, म्हणजे कॉम्प्युटरला काय करायचे आहे, कसे करायचे इत्यादी गोष्टींवर तिचा वर्चस्व असतो. एकप्रकारे कॉम्प्युटरला जी भाषा कळते, त्यास ‘कोडिंग’ असे म्हणतात. मशीन कोड एक कॉम्प्युटर प्रोग्राम असतो, जो बाइनरी (द्विमान पद्धत जसे की.. ०, १) मध्ये लिहिला जातो. इतर प्रोग्रामिंग भाषांना मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट केले जाते, जेणेकरून कॉम्प्युटर ते समजू शकेल. मशीन कोडच्या जागी प्रोग्रामिंग भाषा (एचटीएमएल, सीएसएस, जावा इत्यादी…)चा वापर केला जातो, जे समजणे देखील सोप्पे आहे. जगातील प्रत्येक वेबसाइट ही कोडिंगच्या मदतीनेच काम करते. त्यामुळे कोडिंगला एक महत्त्व असून, कोडिंग करणाऱ्याला ‘कोडर’ असे म्हटले जाते.
मुख्य कोडिंग लँग्वेज कोडिंग शिकण्यासह आपणास काही प्रमुख कोडिंग भाषांबाबत (लँग्वेज) जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्या पुढीलप्रमाणे आहेत…
१) सी-लँग्वेज : सी लँग्वेजला सुरुवातीला निर्माण करण्यात आले. डेनिस रिच्ची यांनी १९६९ ते १९७३ या काळात याची निर्मिती केली. जावा, पीएचपी, जावा स्क्रिप्ट व लँग्वेजचे सिंटेक्स (मांडणी) हे सर्व सी लँग्वेजवर आधारित आहेत.
२) सी ++ : हा अत्यंत पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, याचा वापर गेम्स, ब्रोवेर आणि ऑपरेटिंग सिस्टमला विकसित करण्यासाठी केला जातो. सी+ + पॉवरफुल असण्यासह खूपच लवचिक आहे. हा वेगळ्या प्रकारे ऑफ प्रोग्रामिंगला सपोर्ट करतो.
३) जेएव्हीए (जावा) – जावा एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ज्याचा वापर अॅप बनवण्यासाठी केला जातो. जावाला ‘सन मायक्रोसिस्टम्स’ने नव्वदच्या दशकात निर्माण केले. अॅपच्या निर्मितीसाठी जावा सर्वात सोप्पा पर्याय आहे. जावाला नेटवर्क अॅप्लिकेशन बनवण्यासाठीच डिझाइन करण्यात आला आहे. जर आपणास जावाचे प्राथमिक ज्ञान असेल, तर आपण एक छानसं अॅप डिझाइन करू शकता.
४) एचटीएमएल : एचटीएमएल एक कोडिंग लँग्वेज आहे, ज्याचा वापर वेबसाइट डेव्हलपमेंटमध्ये सर्वात जास्त केला जातो. एचटीएमएलचा अर्थ म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज होय. एचटीएमएलचा शोध टिम बर्नर्स ली यांनी १९८० साली लावला. एचटीएमएलमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे असते, ते म्हणजे टॅग.
जर आपण त्याला योग्यरित्या टॅग करू शकलो नाही, तर एचटीएमएल देखील काम करणार नाही. एचटीएमएलमध्ये असंख्य छोटे कोड असतात, जे एकत्रितपणे संपूर्ण सीरिज बनवतात. एचटीएमएलला आपण साधारण नोटपॅडवर ही लिहू शकतो. एचटीएमएलच्या मुलभूत गोष्टी शिकल्यानंतर आपण सहजपणे वेबसाइट निर्माण करू शकता.
५) सीएसएस : याचा वापर वेबपेजचे लेआऊट, रंगीत फोटोंचे डिझाइन व कस्टमाइज करण्यासाठी केला जातो. याला कोणत्याही एक्सएमएल (एक्स्टेंसिबल मार्कअप लँग्वेज) आधारित मार्कअप लँग्वेजसह वापरता येते. हा एक स्वतंत्र एचटीएमएल आहे.
६) आरयूबीवाय (रुबी) : याचा वापर वेब अॅप्लिकेशन डिझाइन करण्यासाठी केला जातो. ही एक पायथनची सामान्य कोडिंग लँग्वेज आहे. यात डेटा विश्लेषण, प्रोटोटायपिंग व प्रूफ ऑफ कॉन्सेप्टसारखे अॅप्लिकेशन असतात. रुबीचा सर्वात जास्त वापर रेल वेबसाठी केला जातो. रेल वेब रुबीच्या माध्यमातूनच साकारण्यात आले आहे. त्यात आपणास वाटत असेल, तर कोणत्याही अडथळ्याशिवाय बदल करू शकता.
७) पायथन : एचटीएमएल, सीएसएस आणि जावा स्क्रिप्टपेक्षा पायथन सर्वात वेगळे आहे. याचा वापर डेटा सायन्समध्ये केला जातो. इतर प्रोग्रामिंग लँग्वेज पीएचपी एमवायएसक्यूएल जावा स्क्रिप्ट डॉट एनइटी
कोडिंग कशी शिकावी?
जर कोडिंगला आपण आपलं करिअर म्हणून निवडता, तर आपण कॉम्प्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग, बीसीए वा एमसीएची पदवी धारण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कोडिंग शिकण्यासाठी पदवी असावी असे काही गरजेचे नाही. कोडिंगमध्ये प्रभुत्व स्थापन करण्यासाठी आपण इंस्टिट्यूट वा ऑनलाइन ट्युटोरिअलच्या माध्यमातून ही ती शिकू शकता. कोडिंगच्या दुनियेत सर्वातआधी आपणास एचटीएमएल आणि सीएसएस शिकावे लागते, ज्याच्या माध्यमातून आपण काही वेबसाइट विकसित करू शकता. तसेच, पेमेंट सिस्टम वा डेटाबेस, सुरक्षिततेबाबत अधिकाधिक वेबसाइटसाठी आपणास जावा स्क्रिप्ट, पीएसपी, एसक्यूएल, पायथन इत्यादींची ओळख असणे गरजेचे आहे. मोबाइल आयओएस आणि अँड्रॉइडसाठी जावा वा कोटलिन, फ्ल्युट्टर इत्यादी लँग्वेज शिकावी लागतात.
ऑनलाइन आणि ऑफलाइन कोडिंग
ऑनलाइन आणि ऑफलाइन कोडिंग यामधील एकाची निवड करण्याआधी, आपणास हे जाणून घेणे गरजेचे आहे की, आपणासाठी कोणते माध्यम सर्वात योग्य असेल. त्यामुळे दोघांमधील फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
ऑफलाइन कोडिंग शिकण्यासाठी आपणास कोचिंग क्लासला जात प्रोग्रामिंग पुस्तकाच्या माध्यमातून कोडिंग शिकावी लागेल. तसेच, ऑनलाइन कोडिंग शिकण्यासाठी असंख्य वेबसाइट आहेत. ज्याच्या माध्यमातून आपण कोडिंग शिकू शकता. गुगलवर सर्च केल्यास आपणास असंख्य वेबसाइट दिसू शकतात. येथे काही वेबसाइट आपणास मोफत, तर काही वेबसाइटसाठी आपणास पैसे द्यावे लागतात. तसेच, नव्या शिक्षण नीतीनुसार आता इयत्ता सहावीपासूनचे विद्यार्थी कोडिंग शिकू शकतात.
कोडिंग शिकण्याचे फायदे जेव्हा आपण कोडिंग शिकण्याची कला अवगत करता, त्यानंतर आपणासाठी सर्व गोष्टी सोप्या होतात, तसेच कोडिंग शिकणे या काळातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. कोडिंग एक असे कौशल्य आहे, ज्याला सध्याच्या काळात सर्वात जास्त डिमांड आहे. एक कोडर वा कॉम्प्युटर प्रोग्रामरकडे नोकरीच्या असंख्य संधी असतात, तसेच ते आपल्यातील कौशल्याच्या आधारे खूप चांगला पैसा कमावू शकतात. कोडिंगच्या मदतीने आपण वेबसाइट, अॅप आणि व्हिडीओ गेम बनवू शकता, तसेच आपण दुसऱ्यांसाठी काम करत पैसे कमावू शकता. कोडिंगसाठी तार्किक विचार करणे गरजेचे असते. आपणास कॉम्प्युटरमध्ये स्टेप बाय स्टेप कमांड फिड करावे लागतात. असे केल्याने आपण एक व्यक्ती वा एखाद्या समस्येला सोडवण्याची क्षमता निर्माण करू शकता.
पात्रता
कोडिंग शिकण्याच्या विविध पात्रता आहेत. बॅचलर्ससाठी बारावीनंतर चांगल्या गुणांनी आपण मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोडिंग शिकू शकता. जर आपणास मास्टर्स करायचे आहे, तर आवश्यक गुणांसह पदवीधर असणे गरजेचे आहे. असंख्य वेळा किमान जीपीएची आवश्यकता असते.
मित्रांनो, कोडिंग शिकल्यानंतर असंख्य करिअरची संधी या क्षेत्रात निर्माण होतात.
कोडिंग शिकत आपण मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये सॉफ्टवेअर अॅप डेव्हलपर, वेब डेव्हलपर, कॉम्प्युटर सिस्टम इंजीनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, बिझनेस इंटेलिजेंस अॅनालिस्ट, कॉम्प्युटर प्रोग्रामर, सॉफ्टवेअर क्वालिटी अॅनालिस्ट इत्यादी क्षेत्रात नोकरी करू शकता. येणाऱ्या काळात जगभरात इंटरनेटचं युग जोमानं सक्रिय होणार आहे. ज्यात कोडर (कोडिंग करणारे)ची गरज नितांत भासेल. हे क्षेत्र काही छोटे क्षेत्र नाही. या क्षेत्राची व्याप्ती अफाट आहे. सध्या आपण टीव्हीवरील असंख्य लहान मुलांना कोडिंग शिकवणाऱ्या जाहिरात पाहत असतो. नव्या युगाला लहानपणापासूनच कोडिंगचे ज्ञान प्राप्त व्हावे, म्हणून त्या दिशेने उचलेले ते पाऊल आहे, तसेच असंख्य (सीबीएससी) शाळांमध्ये देखील कोडिंगचे ज्ञान इयत्ता पहिलीपासून देखील सुरू झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोडिंगचे महत्त्व वाढणार असून, त्याचा फायदा चांगलं करिअर करण्यासाठी तरुणांना होणार आहे.
राकेश ग.खेडेकर