बालपणापासूनच संभाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली. पण, त्याने नाउमेद न होता पिल्याचा आदर्श ठेवून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी मातोश्री सईबाईंचे निधन झाले. आजी जिजाऊंनी त्यांना घडविले आणि वाढविले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी मोगलांकडे राहावे लागले. वयाच्या नवव्या वर्षी शिवरायांसोबत आग्य्राला गेले. शिवरायांच्या स्वाभिमानाचे, पराक्रमाचे, निर्भीडपणाचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले. औरंगजेबाच्या कराल दाढेतून ते निसटले. शिवरायांनी त्यांना मोगलांच्या पाठलागापासून वाचविण्यासाठी वाराणसी येथे ठेवले. बालपणापासून जीवघेण्या संकटांचा पाठलाग त्यांच्यामागे होता. पण ते हतबल झाले नाहीत. #DrShrimantKokate #HistoryScholar #ChhatrapatiSambhajiMaharaj

शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत घोडदौड सुरू होती. शिवरायांना निर्भीड, पराक्रमी, महाबुद्धिमान सुपुत्राचा प्रचंड अभिमान वाटत असे. त्यांनी कुमारवयातील संभाजीराजांना सुमारे १० हजारांची फौज घेऊन गुजरात मोहिमेवर पाठविले. त्या युद्धात संभाजीराजांनी मोठा पराक्रम गाजविला. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि ज्येष्ठांना सन्मानाने वागविले. जखमी सैनिकांना मदत केली. ते जसे शूरवीर होते, तसेच ते मनमिळावू होते. ते जसे स्वाभिमानी होते तसेच ते संवेदनशील मनाचे होते. त्यांनी तलवार चालविली, रणांगण गाजविले. तसेच त्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात कीर्ती मिळविली. त्यांचे मराठीप्रमाणेच संस्कृत आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी बुधभूषण हा संस्कृत तर नखशिख, नायिकाभेद आणि सातसतक हे हिंदी ग्रंथ लिहिले. ते साहित्यिक होते. सुसंस्कृत विद्वान होते. त्यांच्या शौर्याचे, विद्धत्तेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना समकालीन फ्रेंच पर्यटक ॲबे करे म्हणतो, “छत्रपती संभाजीराजांसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी अन्यत्र पाहिला नाही. संभाजीराजे जसे शूर होते, तसेच ते विद्वान होते आणि सुंदरही होते. पण त्यांचे खरे सौंदर्य त्यांच्या विचारात, कर्तत्वात, दयाळूपणात आणि शौर्यात आहे. त्यांनी गरिबांना न्याय दिला. शेतकऱ्यांचे हित जोपासले. स्त्रियांचा आदर, सन्मान केला आणि संरक्षण दिले. पत्नीला सर्वाधिकार दिले. त्यांना स्वराज्याचे सर्वोच्च असे कुलमुखत्यार केले. त्यांना ‘श्री सखी राज्ञी जयति’ हा सन्मान दिला. स्वराज्यातील स्त्रियांप्रमाणेच शत्रूंच्या स्त्रियांचा, लहान मुलांचा, धर्म- धर्मग्रंथांचा आदर, सन्मान केला पाहिजे या वडिलांच्या शिकवणुकीचे शेवटपर्यंत संतोतंत पालन केले. सावत्र मातांचा आदर केला. सावत्र बंधू राजाराम महाराजांना प्रेमाने सांभाळले. संभाजीराजे स्वच्छ अंतःकरणाचे होते. तसेच ते धोरणी आणि मुत्सद्दी होते. बापाविरुद्ध बंड करून आलेल्या अकबराला तत्काळ भेटायचा आतातायीपणा त्यांनी केला नाही. यावरून त्यांचा सावधपणा दिसतो. शिवरायांच्या मृत्यूनंतर अथकपणे ते पोर्तुगीज, सिदी, मोगल आदिला आणि अंतर्गत शत्रुविरुद्ध लढत होते. जंजिरा आणि गोवा जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मांडवी नदीत घोडा घातला. समुद्रात भराव टाकून जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान औरंगजेब ८ लाखांची फौज घेऊन दक्षिणेत उतरला. त्याला प्रतिकार करण्यासाठी संभाजीराजांनी मोगलांचे दक्षिणेतील महत्त्वाचे असणारे बऱ्हाणपूर शहर जिंकले. शिवकाळात औरंगजेब स्वतः दक्षिणेकडे आला नव्हता. तो शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांच्या काळात खजिना आणि अफाट फौज घेऊन दक्षिणेत उतरला. औरंगजेब तत्कालीन जगातील सर्वात बलाढ्य आणि तितकाच क्रूर बादशहा होता. त्याने सत्तेसाठी वडिलांना कैदेत ठेवले. भावांची हत्या केली. अनेक सूफी संतांच्या हत्या केल्या. तो क्रूर, निर्दयी, पाताळयंत्री आणि धूर्त होता. तो शंभूराजांना अर्थात मराठ्यांचे स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी माण, खटाव, मिरज, जत, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, श्रीगोंदा आदी दुष्काळी भागात सुमारे २७ वर्षे राहिला. राजधानीपासून कायमचा दूर राहिलेला तो एकमेव बादशहा आहे. त्याने मराठ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. परंतु मराठे मागे हटले नाहीत. त्याचे कारण जिजाऊ-शिवरायांनी निर्माण केलेली स्वराज्याची प्रेरणा आहे. औरंगजेबाची फौज सुमारे ८ लाख, संभाजीराजांची फौज सुमारे १ लाख; औरंगजेबाचा वार्षिक महसूल सुमारे ५० कोटी, तर संभाजीराजांचा वार्षिक महसूल सुमारे १ कोटी, अशा अक्राळविक्राळ औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी सुमारे आठ वर्षे निकराचा लढा दिला. औरंगजेबाच्या फौजेला त्यांनी सळो की पळो करून सोडले. सह्याद्री, रामसेज किल्ला हे रणमैदान झाले. शिवरायांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी संभाजीराजांनी सर्वस्व पणाला लावले. संभाजीराजांना सहज पराभूत करून दख्खन ताब्यात घेण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाला त्यांनी जेरीस आणले. छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाचे वर्णन करताना औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफीखान म्हणतो, “संभाजीराजे मोगलांसाठी शिवाजीराजांपेक्षा दहापटीने तापदायक आहेत. ” अखेर औरंगजेबाच्या कपट नीतीने घात झाला. संभाजीराजांना पकडून औरंगजेबाने त्यांचे सुमारे ३९ दिवस हाल हाल केले. पण संभाजीराजांनी स्वराज्यावरील निष्ठा बदलली नाही. शिवरायांनी निर्माण केलेली वाट सोडली नाही. त्यांचे डोळे काढले, जीभ कापली, त्यांना असह्य वेदना दिल्या. पण ते हतबल झाले नाहीत. संभाजीराजांनी मरण पत्करले. पण ते औरंगजेबाला शरण गेले नाहीत. यावेळेस शंभूराजे केवळ ३२ वर्षांचे होते, शंभूराजांच्या त्यागाला, बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. शंभूराजांच्या त्यागामुळेच शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य अजरामर झाले. प्राण वाचविण्यासाठी शंभूराजांनी स्वराज्य, स्वभाषा, स्वधर्म स्वाभिमान आणि संस्कृती औरंगजेबाला समर्पित केली नाही. त्यांच्या त्यागातून लाखो मावळे स्वराज्यासाठी औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी निर्भीडपणे पुढे आले.
डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक