Takshashila University विद्यापीठात केवळ ज्ञान दिलं- घेतलं जातं असं नाही, तर तेथे नवीन ज्ञानशाखांचा उदय होतो, त्यांचा अभ्यास केला जातो, त्यामुळे समाजाची वैचारिक शक्ती वाढते आणि तो समाज, ती संस्कृती बहरते. अभ्यासामुळे नवे शोध लागतात, अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे सापडतात, विवेचक बुद्धी वाढीला लागते. एकंदरीत युनिव्हर्सिटीज समाजाचे ज्ञानपीठ – संस्कृतीचे पोषण करतात. असंच एक विद्यापीठांचं गाव होतं. प्राचीन गांधार देशाची ती राजधानी होती, तक्षिला – तक्षशिला. तक्षशिला सिंधू नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेली होती. ही नगरी म्हणजे भारतीय उपखंड आणि मध्य आशिया यांचे मार्ग जोडणारे महत्त्वाचं स्थळ. इ. स. पूर्व १००० वर्षे या नगरीची स्थापना झाली. दक्षिण आशियातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचं असं हे शिक्षणाचं केंद्र मानलं जातं. ‘शतपथ ब्राह्मण’ या वैदिक ग्रंथात वेदतत्त्वज्ञानी उद्दालक आरुणी (इ.स. पूर्व ७ वे शतक) याने शिक्षणासाठी, गांधार देशापर्यंत प्रवास केल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतरच्या ‘जातक’ या बौद्ध ग्रंथातही आरुणी आणि त्याचा पुत्र श्वतकेतू यांनी तक्षिला येथे शिक्षण घेतल्याचे लिहिले आहे. महाकाव्य महाभारत हे व्यास ऋषींचा शिष्य वैशंपायन आणि राजा जनमेजय यातील संवाद आहे. राजा जनमेजयाने तक्षशिला येथे केलेल्या सर्पयज्ञात व्यासांच्या आज्ञेवरून वैशंपायनाने महाभारत कथा राजाला सांगितली, असं मानलं जातं. श्रीरामाचा भाऊ भरत याने तक्षशिला या संपन्न शहराची स्थापना केली, असं रामायणात वर्णन आहे. बौद्ध जातक ग्रंथात तक्षशिला ही गांधार देशाची राजधानी असून ती जागतिक कीर्तीचे विद्वान गुरु आणि बौद्ध नसलेल्या गुरुकुलांसाठी ओळखली जाते, असा उल्लेख आहे. तेथे वैदिक तसेच कायदा, वैद्यकीय आणि लष्करी तंत्रज्ञान देणाऱ्या विद्याशाखा आणि विद्वान होते, हेही कळते. या ठिकाणी काशी, कोसल, मगध अशा दूरदूरच्या राज्यांतील विद्यार्थी खडतर प्रवास करून प्रत्येक क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत. तक्षशिला विद्यापीठात हिंदू संस्कृती आणि संस्कृत भाषेचा मोठा प्रभाव होता. सम्राट चंद्रगुप्ताचे गुरु आचार्य चाणक्य, म्हणजेच कौटिल्य यांच्यामुळे तक्षशिला नगरीचं नाव जास्त प्रसिद्ध झालं. चाणक्याच्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्राची रचना तक्षशिलेत केली गेली. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ आणि ग्रंथकार चरक याचे शिक्षण तेथेच झाले. चरकाने तेथे अध्यापनाचे कामही केले. संस्कृत व्याकरणकार पाणिनी हाही तक्षशिलेतच होता. बौद्ध पंथाच्या महायान शाखेची रचना तेथे झाली. राजा बिंबिसार याचा वैद्य जीवक, कोसलाधिपती प्रसेनजीत यांनी तक्षशिलेतच शिक्षण घेतलं. तक्षशिलेतील ज्ञानविषयक, अभ्यासविषयक, शैक्षणिक घडामोडी आणि कार्य तेथील राजाने, स्थानिक नेत्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं नव्हतं ही विशेष गोष्ट. तेथील प्रत्येक गुरु, आचार्याने आपापलं गुरुकुल स्थापन करून स्वातंत्र्य जपलं होतं. प्रत्येक गुरु आपल्या विचाराने अभ्यासक्रम तयार करीत असे, तसेच गुरुचे पूर्ण समाधान होईपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी होईपर्यंत तो गुरूबरोबर रहात असे. गुरुकुल गुरूच्या घरीच असे आणि तेथे उच्च अभ्यासक्रमच शिकविला जात असे. विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक (सोळा वर्षानंतर) शिक्षण पूर्ण करून तेथे विशिष्ट शाखेतील उच्च शिक्षण घेत. गुरुदक्षिणा फारशी नसायची. गरीब विद्यार्थ्यांना राजा मदत करायचा. राजकुमार व गुरुदक्षिणा देऊ शकणारे विद्यार्थी दिवसा शिकायचे आणि न देऊ शकणारे विद्यार्थी रात्रीच्या वेळी शिकायचे. गुरूंना समाजाकडून, श्रीमंत व्यापारी, पालक यांच्याकडून मदत मिळायची. कोणालाही शिक्षण नाकारलं जायचं नाही. गुरुकुलातील सामाजिक, बौद्धिक, नैतिक नियम मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल सोडण्यास सांगण्यात येत असे. विद्यार्थ्यांचं राहणं, जेवण सर्व मोफत होते. विद्यार्थ्यांनी गुरुकुलातील कामे स्वतः करायची शिस्त होती. परीक्षा नव्हत्या. पदवी दिली जात नसे. ज्ञान मिळणं हीच पदवी असायची. केवळ पैसे मिळवण्यासाठी ज्ञानाचा वापर करणे अपवित्र मानलं जात असे. प्राचीन ग्रंथ, सर्व कला, धनुर्विद्या, शिकार, हत्ती विषयक विशेष ज्ञान, शिल्पकला इत्यादी विषयांचं नेहमीच्या कायदा, लष्कर आणि वैद्यकीय ज्ञानाबरोबर शिक्षण दिलं जात असे. तक्षशिला आणि तिच्या आजूबाजूच्या परिसरातील मानवी वस्तीची सुरुवात इसवी सन पूर्व काळात म्हणजे अश्मयुगात झाली. इसवी सन पूर्व तेराशे वर्षे या काळातील हडप्पा संस्कृतीच्या खुणा तेथे सापडतात. लोहयुगात प्राचीन इंडो आर्यन संस्कृती असलेल्या गांधार देशाचं आणि राजधानी तक्षशिला यांचं अस्तित्व सिद्ध होतं. या काळात या शहरात उत्तम व्यापार सुरू होता. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात प्राचीन इराणी घराण्याच्या पहिल्या डॅरियसचं तेथे राज्य होतं. तक्षशिला जिंकून घेतल्यावर त्याने गांधार प्रदेशात राहून सिंधू नदीचे खोरे जिंकण्याची तयारी केली आणि इसवी सन पूर्व ५१५ मध्ये तो यशस्वी झाला. तरी काही काळ तक्षशिला स्वतंत्र नगरराज्य होतं. इ.स. पूर्व ३२६ मध्ये सम्राट अलेक्झांडर याने तक्षशिला जिंकून घेतली. तक्षशिलेचा राजा भी याने न लढताच शरणागती पत्करली. इ. स. पूर्व ३०३ मध्ये अलेक्झांडरचा प्रतिनिधी सेल्युकस निकेटर याच्याशी चंद्रगुप्त मौर्य याचे युद्ध झाले. चंद्रगुप्ताचा अमात्य चाणक्य होता. चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक यांनी तक्षशिला ही बौद्ध तत्त्वज्ञानाचे पीठ बनविले. इ.स. ७६ मध्ये या नगरीत कुषाणांचे म्हणजे कनिष्काचे राज्य होते. मोक्याची जागा असल्याने तक्षशिला ही ज्ञाननगरी सतत एका राजसत्तेकडून दुसऱ्या राजसत्तेकडे गेली. गुप्त साम्राज्याच्या काळात ही नगरी व्यापारी मार्गावरील महत्त्वाचं केंद्र म्हणून प्रसिद्ध झाली. सिल्क, चंदन, घोडे, कापूस, चांदीची भांडी, मोती, मसाल्याचे पदार्थ यांचा व्यापार येथून चालत असे. म्हणजे हे भारतीय अभिजात साहित्याच्या अभ्यासाचं, संस्कृतीचं केंद्र होतं आणि सरहद्दीवरचं संरक्षित शहरही होतं. इ. स. ४७० मध्ये मध्य आशियातील भटक्या जमातींनी म्हणजे हूणांनी तक्षशिलेवर आक्रमण केलं. स्कंदगुप्त आणि हूण यांच्यात युद्ध झालं. स्कंदगुप्त जिंकला तरी नंतर हूणांनी गांधार, पंजाब जिंकून घेतलं. तक्षशिलेतील व्यापार खंडित झाला, विद्यार्जन थांबलं. इसवी सन ४०० वर्षापर्यंत तक्षशिला विद्यापीठाचं अस्तित्व होतं, असं एका चिनी प्रवाशाने लिहून ठेवलय. हूण ही आशियातून आलेली घोड्यांवरून लढणारी भटकी जमात. त्यांच्या अनेक उपजमाती होत्या. त्यांनी तक्षशिलेतील प्रसिद्ध बौद्ध विहारांची तोडफोड केली, संपूर्ण तक्षशिला भकास, उजाड झाली. विध्वंस झालेली तक्षशिला पुन्हा पूर्वीसारखी झाली नाही. इ. स. ६२९ ते ६४५ या काळात झुआनझॅग या चिनी बौद्ध भिक्षूने तक्षशिलेला भेट दिली तेव्हा तक्षशिला उद्ध्वस्त अवस्थेतच होती. नंतरच्या काळात इ. स. नवव्या शतकात शेवटी इथे गजनीचा महमूद यांचं राज्य सुरू झालं. आजच्या काळात तक्षशिला ही दिव्य ज्ञाननगरी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्ह्यात अवशेष रूपाने शिल्लक आहे.
मेधा मराठे