शेगाव संस्थानच्या धर्तीवर निर्णय; इच्छुक सेवेकऱ्यांना अर्ज करावा लागणार
वऱ्हाडवृत्त
सोलापूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना श्रींच्या सानिध्यात मोफत सेवा बजावता येणार आहे. यासाठी मंदिर समिती आराखडा तयार करत आहे. येत्या आषाढी यात्रेपासून ही मोफत सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी आता विठ्ठल- रुक्मिणीची व परिवार देवता तसेच भाविकांची देखील सेवा करण्याची संधी मिळणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक गुरुवारी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांना मोफत सेवा बजावण्याचा लाभ देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याची संधी मिळावी, वारकऱ्यांची सेवा करता यावी, अशी भावना भाविक व संस्थांनी बोलून दाखवली होती. ज्यांना सेवेकरी म्हणून सेवा बजावयाची आहे अशा भाविकांनी मागील अनेक वर्षांपासून मागणी केली होती. भाविकांच्या मागणीचा विचार मंदिर समितीने केला आहे. त्यामुळे येत्या आषाढी एकादशीपासून इच्छुक भाविकांना सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर कृती आराखडा मेच्या पहिल्या आठवड्यात तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार भाविकांना मंदिरांसह परिसरात मोफत सेवा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंदिर समिती सांगेल त्यानुसार जे भाविक सेवा देण्यास तयार होतील; तसेच सेवा देणाऱ्या भाविकांचा प्रतिसाद कसा मिळतो, त्यानुसार भाविकांना वर्षभर सेवा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.