वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
जालंधर : प्रवासाची आवड असणारे अनेक लोक असतात. छोट्याशा बोटीतून जगाची प्रदक्षिणा घालणारे किंवा छोट्याशा वाहनातून जगभर फिरणारे साहसवीरही आहेत. आता एका माणसाने अमेरिका ते भारत हा प्रवास चक्क मोटारीतुन केला आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये राहणाऱ्या लखविंदर सिंह याने आपल्या गाडीतून अमेरिका ते जालंधर हा प्रवास केला आहे. लखविंदर अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या सॅक्रामेंटो शहरात राहतात. तिथे त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या गावी गाडीतून जाण्याचे ठरवले होते. मात्र, त्यावेळी त्यांना असे करता आले नाही. आता मात्र त्यांनी हा अनोखा प्रवास पूर्ण करून दाखवला आहे. त्यांनी 34 दिवसांमध्ये 20 देशांचाप्रवास करून आपल्या देशात आगमन केले. यासाठी त्यांना 20 हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला.
ब्रिटनमधून रोड ट्रीप सुरू झाली
ब्रिटनमधून त्यांची खऱ्या अर्थाने रोड ट्रीप सुरू झाली. ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, हंगेरी, तुर्की, इराण व पाकिस्तानमार्गे ते भारतात आले. इराणमध्ये त्यांना थोडा वेगळा अनुभव आला. तिथे अमेरिकन गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. त्यामळे टॅक्सीला गाडी बांधून त्यांना तेथील प्रवास करावा लागला. पाकिस्तानात त्यांनी चौदा दिवस प्रवास केला.या काळात तेथील लोक आपल्याशी प्रेमाने वागल्याचे ते सांगतात..