१४,१५ऑक्टोबरला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक, गांधीवादी विचारवंतांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भूदान चळवळीचे प्रणेते, सर्वोदयी नेते विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेल्या वाच्या भूमीत ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी येत्या १४ व १५ ऑक्टोबर रोजी गोव्यातील फोंडा येथील नागेशी बांदिवडे येथे महामंडळाची बैठक होणार आहे. या संमेलनात गांधीवादी विचारांशी नाळ जुळणारे साहित्यिक, प्रकाशक किंवा सामाजिक चळवळीतील नाव निश्चिती होण्याची शक्यता आहे.
१४ रोजी महामंडळाच्या घटक संस्था, समाविष्ट व संलग्न संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी नावे सूचविण्यात येणार असून त्यावर चर्चेअंती नाव निश्चित करण्यात येणार आहे. महामंडळाच्या संमेलनाध्यक्षपदासाठी घटक संस्थांना प्रत्येकी ३, समाविष्ट व संलग्न संस्थांकडून प्रत्येकी १ नाव, संमेलनाची निमंत्रक संस्था व विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून प्रत्येकी एकेक नाव सुचविण्यात येते. मात्र याबाबत घटकसंस्थांशी संपर्क साधला असता अद्याप या नाव निश्चितीसाठी स्थानिक पातळीवर बैठक पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई मराठी साहित्य संघांकडून संमेलनाध्यक्षांचे नाव सुचविण्यासाठी ८ ऑक्टोबरला बैठक होणार आहे. गोव्याच्या बैठकीत संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाही निश्चित होणार आहे. १६ रोजी महामंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे यजमानपद विदर्भ साहित्य संघाकडे आहे. संघाचे यंदाशतकमहोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षाची सांगता संमेलनाने होणार असल्याने फेब्रवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलन होण्याची शक्यता आहे.
मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), छत्तीसगढ़ मराठी साहित्य परिषद (बिलासपुर),मराठी वाङमय परिषद (बडोदे), साहित्य संमेलनाची निमंत्रक असलेली संस्था यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यात येणार आहेत.
लोगोचे अनावरण
या संमेलनाच्या लोगोचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विलास मानेकर, डॉ.रवींद्र शोभणे, विवेक अलोणी, प्रदीप दाते, मंजुषा जोशी तसेच, वर्धा शाखेचे सदस्य संजय इंगळे तिगावकर, डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते, महेश मोकलकर, आकाश दाते यावेळी उपस्थितीतत होते. वर्धा शहराचे स्वातंत्र्यलढ्यात असलेले मोठे योगदान लक्षात घेवून प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कळमकर यांनी हा लोगो रेखाटला आहे. वर्धा जिल्ह्याचा नकाशा, चरखा आणि लेखणीचा यांचा कलात्मक वापर या लोगोत करण्यात आला आहे. ही मंडळी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत .या संमेलनासाठी गांधीवादी विचारवंत व प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते अभय बंग,प्रकाशकरामदास भटकळ,सुरेश व्दादशीवार, प्रभा गणोरकर, मेधा पाटकर, रावसाहेब कसबे, किशोर सानप, आशा बगे यांच्या नावांची चर्चा आहे. ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे हेही या पदासाठी इच्छुक होते, मात्र ते विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत आहेत, विदर्भ साहित्य संघ यंदाच्या संमेलनाचे आयोजक असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. मात्र शोभणे हे संघात अद्याप कार्यरत आहेत, त्यामुळे अध्यक्षपदाच्या चर्चेतून त्यांचे नावही आपसूकच बाहेर पडले आहे.