वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या पौराणिक इतिहा वारसा लाभलेल्या केळझर गावच्या बौद्धविहार परिसरात शेतात काम करीत असम्लेल्यांना शेत मशागतीदरम्यान पाषाणाची १३ व्या शतकातील वृषभनाथ महाराजांची मूर्ती मिळाली आहे. ही मूर्ती ५ फूट उंच, ४४ सेंटिमीटर रुंद तसेच दीड फूट जाडीची आहे. ही माहिती मिळताच नागपूरच्या पुरातत्व विभागाचे डॉ. अरुण मलिक, श्याम बोरकर, शरद गोस्वामी आदी तज्ज्ञ या परिसरात आले व त्यांनी ही मूर्ती तेराव्या शतकातील यादवकालीन वृषभनाथ महाराजांचीच असल्यावर शिक्कामोर्तब केले. तेरावे शतक, हे यादवकालीन राजवटीचे होते.
बौद्ध विहार परिसरात जमिनीखाली मिळालेली ही वृषभनाथ महाराजांची मूर्ती बाहेर काढण्यास तब्बल तीन तास लागले, मूर्ती जड आणि वजनदार आहे. ही मूर्ती नागपूरच्या पुरातत्व विभागात नेण्याची तयारी अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. पण नागरिकांनी विरोध केल्याने ही मूर्ती सध्या केळझरच्या बौद्धविहारातच ठेवण्यात आली आहे. यापूर्वीही याच परिसरात भगवान चंद्रास्वामी, भगवान महावीर स्वामींची मूर्ती मिळाली होती.
१९६० मध्ये याच भागातील खोदकामात १३ फूट लांबीची भगवान महावीरांची मूर्ती मिळाली होती. सध्या ही विशाल मूर्ती बेवारस पडून आहे. केळकरला महाभारतकालीन संदर्भ दिला जातो. गणेशकोषात या नगरीचे नाव एकचक्रा नगरी असे आहे. येथे यापूर्वी केळझरच्या तलाव परिसरात गंडकी पाषाणातील कोरीव भगवान विष्णूची तसेच नळयोजनेची जलवाहिनी टाकतानाच्या खोदकामात गंडकी पाषाणाचीच गरुडारुढ विष्णूची मूर्तीही मिळाली होती. शिवाय गणेशमंदिरातील भिंतीत महालक्ष्मीची मूर्ती मिळाली होती. यातील गरुडारूढ विष्णूची मूर्ती तसेच महालक्ष्मीची मूर्ती गणेशमंदिराच्या परिसरात तर विष्णूची मोठी मूर्ती केळझर गावात विष्णूमंदिर उभारून तेथे स्थापित केली आहे.
या परिसरातील ऐतिहासिक पाऊलखुणांचा शोध घेण्यास नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने २०१८ मध्ये गणेशमंदिराच्या बाजूच्या जागेत उत्खनन केले होते. त्यावेळी किल्ल्याची तटबंदी तसेच घरांच्या भिंतींचे अवशेष, घोड्यांची हाडे, काही हत्यारे मिळाली होती. पण कसलेही कारण न देता हे उत्खनन बंद केले गेले. तसेच मिळालेल्या किल्ल्याच्या बुरुजावर तसेच घरांवर प्लास्टिकचे कापड टाकून त्यावर ती जागा बुजविण्यात माती टाकून आली होती.
या परिसरात यादवकालीन तसेच बौद्धकालीन दगडी अवशेष मिळाले आहेत. येथील रस्त्याच्या कामातच गणेशाची मोठी मूर्तीही मिळाली होती. येथे मिळालेल्या ऐतिहासिक पाऊलखुणांबाबत संशोधन करण्यास सातत्याने दुर्लक्ष झाल्याने हा मौल्यवान इतिहास भूगर्भातच दडून आहे.

बाराव्या तसेच तेराव्या शतकात यादवांची राजवट होती. मध्ययुगीन भारताच्या नोंदीत याचा उल्लेख आहे. १६०१ च्या ऐन-ए-अकबरीत केळझरचा उल्लेख केळझर महाल मुख्यालय, असा आहे. येथे हिंदू, जैन, बौद्धकालीन मूर्ती अवशेष मिळाले आहेत. काही मूर्तीभंजकांनी तोडल्याने त्यावरलेल्या पडून आहेत. आताही जैन तिर्थकराची शेतात मोठी मूर्ती मिळाली, पण संशोधन होत नाही, हीच खरी अडचण आहे.