वडनगर : गेल्या सात वर्षापासून सुख असलेल्या खोदकामात मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गुजरातमधील मूळ गावात सुमारे २,८०० वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे पुरावे सापडले आहेत. आयआयटी खरगपूर आणि भारतीय पुरातत्त्व खाते (एएसआय) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ७ वर्षांपासून तेथे उत्खनन सुरू आहे. या उत्खननातून एक लाखाहून अधिक अवशेष काढण्यात आले आहेत.
वडनगर हे सर्वात जुने गाव आहे. तेथे २,८०० वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे पुरावे आम्हाला सापडले आहेत. आम्ही २० मीटर खोलीपर्यंत खोदकाम करून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत, असे आयआयटी खरगपूरचे प्रा. अनिंद्य सरकार यांनी सांगितले.
प्रकल्प पर्यवेक्षक मुकेश ठाकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनगरमध्ये तीसहून अधिक ठिकाणी आतापर्यंत खोदकाम करण्यात आले असून, एक लाखाहून अधिक अवशेष काढण्यात आले आहेत. या ठिकाणी बुद्ध, जैन, हिंदू अशा विविध समाजांचे लोक एकत्र राहत होते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून येथे काम सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, डेक्कन कॉलेज आणि आयआयटी खरगपूर या प्रकल्पावर एकत्रितपणे काम करत आहेत.
आतापर्यंतच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गेल्या ३,५०० वर्षांत देशातील विविध साम्राज्यांच्या निर्मितीवर आणि त्या नष्ट होणे यावर हवामानातील बदलांचा मोठा परिणाम झाला. मध्य आशियातील राज्यकर्त्यांना भारतात साम्राज्य स्थापन करायचे होते; कारण तेथील लोक दुष्काळामुळे अडचणीत आले होते.

महाभारत काळात आनंदपुरा होते वडनगर : वडनगर हे गुजरातमधील प्राचीन शहर आहे. त्याचा इतिहास सुमारे २,५०० ते ३,००० वर्षांचा आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते, तेथे हजारो वर्षांपूर्वी शेती केली जात होती. उत्खननादरम्यान, मातीची भांडी, दागिने आणि हजारो वर्षांपूर्वीची विविध प्रकारची हत्यारे आणि शस्त्रे सापडली आहेत. अनेक पुरातत्त्व शास्त्रज्ञ मानतात की, हे गाव हडप्पा संस्कृतीतील पुरातत्व स्थएक आहे. हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वात जुनी संस्कृती मानली जाते.