अमेरिकेतील संशोधनातून स्पष्ट
जीन्सच करतात आत्महत्येस प्रवृत्त
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : ‘अमेरिकन असोसिएशन’च्या मेडिकल जर्नलमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जगात दर वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले असून यामध्ये महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. वास्तवतः या आत्महत्येस ठरणारे कारणही काहीसे वेगळे असून शरीरातील जीन्सच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे ठरत असल्याचे या संशोधानात नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान आत्महत्येची विचारसरणी आणि वागणूक यांच्यात अनुवंशिक संबंध असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेच्या ‘ड्यूक युनिव्हर्सिटी’च्या शास्त्रज्ञांनी संशोधनात अमेरिकेतील सहा लाख तीस हजार निवृत्त युद्ध सैनिकांचा समावेश केला आहे. या संशोधनासाठी घेण्यात आलेल्या रक्ताचे नमुन्यांपैकी ७१.४ टक्के नमुने हे युरोपियन वंशाचे पुरुष होते, तर उरलेल्यांमध्ये आफ्रिकन अमेरिकन, हिस्पॅनिक आणि आशियाई पुरुषही होते. यात फक्त नऊ टक्के महिला होत्या. वीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा आत्महत्येचा अभ्यास केला असता, या अभ्यासात वीस टक्क्यांपेक्षा जास्त सहभागी झालेल्या व्यक्तींनी आत्महत्येचा विचार केला होता किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आढळून आले. यावेळी महिलांच्या तुलनेत पुरुष दुप्पट प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे आढळून आले आहे.
अभ्यासातून मिळालेल्या माहितीमुळे आपण अधिकाधिक जीव वाचवू शकू, असे संशोधकांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात दर वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजेच जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. आत्महत्या हे तरुणांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.