नवी दिल्ली : जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुका (IUCAA)चे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमात देशभरातील एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री, १३ जणांना विज्ञान युवा, तर एका समूहाला विज्ञान समूह पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध संशोधन संस्थांमधील ६ शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
विज्ञान श्री पुरस्कारासाठी मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉ. युसुफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्रा. महान एम. जे. (गणित), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित (अभियांत्रिकी) आणि नागपूरच्या नीरीचे डॉ. एस. वेंकट मोहन (पर्यावरण) यांचा गौरव करण्यात आला.
विज्ञान युवा पुरस्कारासाठी बेंगळुरूच्या जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉ. दीपा आगाशे (जैविक शास्त्र), टीआयएफआरचे प्रा. सब्यसाची मुखर्जी (गणित) आणि पुण्यातील आयुकाचे प्रा. सुहृद मोरे (पदार्थ विज्ञान) यांचा सन्मान करण्यात आला.

भारतीय विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या शास्त्रज्ञांना देण्यात आलेले पुरस्कार संशोधन क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
