भारतवर्षामध्ये ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवळ ज्ञानप्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्यज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आणि समाजक्रांतीचा उद्गाता ठरला. आज (२३ मे) बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने..
इ . स. पूर्व सहावे शतक हे प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे शतक होते. त्यामुळे या शतकाला प्रबोधन युग म्हटले जाते. सामाजिक असमतोल व विषमतेविरुद्ध बंड पुकारून सामाजिक न्यायाचा झेंडा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांनी या शतकात फडकाविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, “भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेली नसून, ती बुद्धांच्या जीवन चरित्रातून घेतली आहेत.’ यावरून बुद्धांच्या विचारांचे पुरोगामीत्व सिद्ध होते. बुद्धांचे विचार कार्ल मार्क्सपेक्षाही श्रेष्ठ होते; कारण मार्क्सने केवळ माणसाचा आर्थिक विचार केला, तर बुद्धांनी माणसाचा आध्यात्मिक व सांस्कृतिक विचार केला. आशा हे दुःखाचे मूळ कारण आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून, मानवाने आशा-आकांक्षा मर्यादित ठेवून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ काम करावे, असा मोलाचा संदेश बुद्धांनी जगाला दिला. जगाला आज विनाशाकडे नव्हे, तर विकासाकडे घेऊन जायचे असेल, तर ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ हा २१ व्या शतकाचा संदेश आहे.
वैभवशाली राज्य आणि सुंदर पत्नीचा त्याग करून सत्याचा शोध घेण्यासाठी तपश्चर्या करणारा हा महामानव होता. त्यांचा जन्म, महानिर्वाण व केवळ ज्ञानप्राप्ती या तीनही घटना पौर्णिमेच्या दिवशी घडून आल्या. त्यामुळे पूर्ण चंद्राप्रमाणे कलेकलेने विकसित झाले असे ते विचारवंत होते. त्यांनी जगाला मध्यम मार्गाचा संदेश दिला. हा मार्ग वर्तमान लोकशाहीचा पायाभूत आधार बनला आहे. सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता तोल जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही, या विचाराने त्यांनी ध्यानाचा मार्ग पत्करला. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे; पण शारीरिक भोगापासून दूर राहायला हवे, हा तो मध्यम मार्ग होय. एके दिवशी बोधगया येथे एका अश्वत्थ (पिंपळ वृक्षाखाली बसून त्यांनी अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निश्चय केला. ४९ दिवसांच्या अखंड, अविरत तपस्येनंतर वयाच्या ३५ व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. शतकानुशतके अंधारात असलेल्या आणि दारिद्र्याशी झुंज देणाऱ्या हजारो भारतीयांच्या जीवनात अपूर्व अशी समाज क्रांती घडविणारे बुद्ध हे अग्रदूत ठरले. केवळ सामाजिक व आर्थिक विषमताच चिंताजनक नसते, तर सांस्कृतिक विषमतासुद्धा तेवढीच गंभीर आहे, हे लक्षात घेऊन हजारो शोषितांना सांस्कृतिक क्रांतीचा मंत्र बुद्धांनी घालून दिला. भारतवर्षाला व जगाला नवविचारांचा मंत्र देणाऱ्या या महान पंडिताचे युगप्रवर्तक कार्य भारतवर्षाला पावन करणारे ठरले आहे.