वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
भारतात म्हणजेच आपल्या स्वदेशात असताना भारतीय नागरिक, मग तो हिंदू असो की ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अथवा मुस्लिम सर्वच धर्माची मंडळी थोडी बेशिस्त अघळपघळ वागताना दिसतात. कदाचित ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ यातून किंवा घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेच म्हणून अथवा राजकीय सत्तेची गुर्मी, श्रीमंतीचा माज किंवा धार्मिक बहुसंख्य वादाची मस्ती, अल्पसंख्याक धार्मिक गट असूनही बहुसंख्याकांना पुरून ऊरू, असा खोटा भ्रामक अहंकार; अशी एक ना अनेक कारणे असण्याची शक्यता असल्याने कायदा आणि नियमांची ‘ऐसी की तैसी’ करण्याची हौस भारतीयांत आढळून येते.
परंतु हेच भारतीय अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका अथवा दुबईसारख्या अरब देशांत गेल्यावर मात्र तेथील नियमावली काटेकोरपणे पाळताना दिसतात. एवढेच नव्हे, तर आपापले धार्मिक भेद विसरून भारतीय नागरिक या नात्याने एकमेकांना सहाय्य करत आपापल्या कामात, व्यवसायात प्रगतीची शिडी चढतात. विशेष करून या परदेशी भारतीय समाजात ‘हिंदू’ धर्मियांचा गट नेहमीच एक पाऊल पुढे राहिलाय. ज्या ज्या देशात हिंदू समाज स्थलांतरित होऊन स्थायिक झालाय, तेथे त्यांनी त्या त्या देशाचे कायदे कानून पाळत, शांततेत राहन प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमावलेय. मात्र, हिंदू समाजाची हीच प्रगती आता जगभरातील बहुसंख्य देशांत राहणाऱ्या हिंदू धर्मियांसाठी डोकेदुखी बनू लागली आहे.
‘घणाघात’मध्ये हा विषय मांडण्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील अनेक देशांत हिंदू धर्मियांवर सातत्याने होणारे हल्ले, यावर अमेरिकेच्याच नेटवर्क ‘कंटेजिअन रिसर्च’ या संस्थेने सादर केलेल्या अहवालात दिलेला दुजोरा आणि ब्रिटनमधील लिसेस्टर शहरात याच महिन्यात पाकिस्तान वंशीय कट्टर मुस्लिमवादी धर्मियांनी तेथील हिंदूंवर लादलेली दंगल. प्रथम अमेरिकेतील संस्थेचा अहवाल काय सांगतो ते पाहूया. ‘कंटेजिअन रिसर्च’ या संस्थेचे सह संस्थापक जोएल फिंकेल स्टाइन यावर सविस्तर खुलासा करतान तो असा की, ‘जगात हिंदूंविरोधात द्वेष आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये एक हजार टक्क्यांनी वाढ झालीय. हिंदूविरोधी मीम्स, द्वेष आणि हिंसाचाराचा अजेंडा तयार केला जात असून ते वाढवण्यासाठी गौरवर्णीय स्थानिक समूह आणि कट्टरपंथी इस्लामिक कट्टरवादी तत्त्वे सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये हिंदूंवरील हल्ल्यात प्रचंड संख्येने वाढ झालीय. या अहवालात मांडलेल्या दोन मुद्द्यांकडे बारकाईने पाहिल्यास अमेरिका आणि इंग्लंडसारख्या लोकशाही देशात हिंदूंच्या विरोधात कशी कटकारस्थाने रचली जात आहेत याची प्रचीती येते. अमेरिकेत २०२० मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांवरील हल्ले ५०० टक्क्यांनी वाढले, ज्यात सर्वाधिक हिंदूच आहेत, असा दावा अमेरिकन तपास यंत्रणेत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या ‘एफबीआय’ने केला आहे. त्यामुळे त्यावर संशय घेण्याची शक्यता नाहीच. ब्रिटनमध्ये झालेल्या हिंदू मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानी जिहादी संघटना जबाबदार असून पाकिस्तानातील दहशतवादी ब्रिटनमध्ये आणून त्यांना मदरसांमध्ये सुरक्षित ठेवले जाते आणि त्यांचा वापर हिंदूंवर तसेच हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यासाठी केला जातो, असा निष्कर्ष ब्रिटनमधील तपास यंत्रणांनीच काढला आहे.
हा अहवाल भारत सरकारचा किंवा कुठल्या भारतीय संस्थेचा नसून अमेरिका आणि ब्रिटनमधल्या तपासयंत्रणेचा असल्याने हे सत्य नाकारता येत नाही. गेल्या पाच वर्षात जगभरात ‘हिंदू फोबिया’ निर्माण करण्याचे कारण काय व त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर भारताच्या सत्ताधाऱ्यांनीच शोधायला हवे. भारतात घडणाऱ्या दोन धर्मातल्या संघर्षाचे ते पडसाद तर नाही ना? दुसरे, परदेशातील स्थानिकांना आपल्या देशात येऊन हिंदू धर्मियच एवढी प्रगती करतात कसे, यापुढे त्यांचे वंशज आपल्यावर राज्य करतील, आपल्या हक्काचे रोजगार व्यवसाय हिरावून घेतील या भीतीतून आलेल्या रागाचे तर हे परिणाम नसतील ना? कारण आज जगभरातील अनेक प्रमुख देशात हिंदू वंशाच्या व्यक्ती उद्योगात, राजकारणात, कॉर्पोरेट कंपनीच्या उच्चपदावर विराजमान झालेत. याच महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचं उपप्रवक्तेपद भारतीय वंशाच्या वेदांत पटेल यांना देण्यात आले. अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षपदी कमला हॅरीस विराजमान आहेतच. गेल्याच महिन्यात इंग्लंडच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर होतेच. अशा प्रकारे अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशांत हिंदू वंशीय भारतीय आपल्या गुणवत्ता, परिश्रम आणि कायदे कानून यांचे नियमन पाळणाऱ्या सभ्य वृत्तीमुळे अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत. हेच परदेशातील स्थानिक गौरवर्णीयांना आणि काही कट्टरवादी धर्मियांना पहावत नाही. म्हणून हिंदू धर्मियांच्या विरोधात ‘हेट क्राइम’ घडवून आणले जात आहे.
ब्रिटनमधील लिसेस्टर शहरात पाकिस्तान वंशीय कट्टरवादी मुस्लिम धर्मियांनी अशाच द्वेषभावनेतून हिंदूंच्या विरोधात दंगल घडवून आणली. सप्टेंबरमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे कारण पुढे करत पाकिस्तान वंशीय जे इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत, त्यांनी हिंदू घरात गणेश चतुर्थी असताना झुंडीने हल्ले केले. त्यातून मग लायसेस्टर शहरात दोन्ही धर्मियांत दंगल झाली. जे भारतात तेच इंग्लंडमध्ये, धार्मिक द्वेषाची मुळे कट्टर पंथीयांच्या मनात कशी घट्टपणे रूजतात त्याचे हे उदाहरण. ब्रिटनमध्ये चार टक्के मुस्लिम आहेत, पण गुन्हेगारीत अडकलेले ब्रिटनच्या तुरुंगात १८ टक्के मुस्लिम आहेत. पण, तेथेच दोन टक्के हिंदू असूनही हिंदू व्यक्ती एकाही गुन्हेगारीत नाही. उलट ब्रिटनमधला हिंदू प्रगतिपथावर आहे. याच द्वेषाला धार्मिक कळ काढून हिंदूंवर हल्ले होत आहेत. भारत सरकारने या दंगलीचा निषेध ब्रिटनकडे नोंदवलाय, पण जे काही जगभरात घडतेय त्यावर हिंदू समाजाने व भारत सरकारने विचार करायला हवा!
विजय सामंत