वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर एक कबर बांधण्यात आली असून यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लिहिलेला लघुशिलालेख सासारामच्या चंदन पहाडीवर आहे. त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करून त्याला कबरीचे स्वरूप दिले आहे. हा शिलालेख चंदन पहाडीवर 256 दिवसांचा उपदेश पूर्ण झाल्यानंतर लिहिला गेला. सासाराम येथील चंदन पहाडी येथे सुमारे 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने एक लघु शिलालेख कोरला होता. कलिंग येथील युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो देशासह जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार करू लागला. त्याच दरम्यान सारनाथच्या दिशेने जाताना सम्राट अशोक या पहाडीवर थांबले होते. त्यांनी आपल्या धर्मप्रसाराला 256 दिवस पूर्ण झाल्याच्या प्रतिकासाठी हा शिलालेख कोरला आणि तो स्थापन केला. संपूर्ण देशात सम्राट अशोकाचे असे काही मोजकेच शिलालेख अस्तित्वात असून बिहार राज्यातील हा शिलालेख एकमेव आहे. असं असूनही आता त्या शिलालेखावर अतिक्रमण करण्यात आले असून त्यावर चुन्याचा लेप देत त्यावर हिरवी चादर चढवून त्याला कबरीचे स्वरूप देण्यात आले आहे. संच या शिलालेखाच्या खोलीला कुलूपबंद करण्यात आले आहे. हा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून 1917 सालीच संरक्षित पुराणवस्तू म्हणून घोषित करण्यात आला आहे. तरीही त्याचे रुपांतर कबरीत केल्याने आता या शिलालेखाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.