‘आधी लगीन कोंढाण्याचे’ आणि ‘गड आला पण सिंह गेला’ ही दोन वाक्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. पहिले वाक्य नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तोंडचे तर दुसरे वाक्य तानाजींच्या मृत्यूनंतर शिवरायांच्या मुखातून निघालेले. या ठिकाणी पुण्याजवळील सिंहगडाचा ‘कोंढाणा’ हा उल्लेख तर तानाजींच्या शौर्याचा गौरव म्हणून ‘सिंहगड’ हे कोंडाण्याचे नामांतर शिवरायांनी केल्याचा ऐतिहासिक संदर्भ सांगणारे आहे.
सिंहगड हा पुण्याच्या अतिशय जवळ असलेला एक किल्ला आहे. पुण्याहून नैऋत्येस अवघ्या पंचवीस किलोमीटर असलेला हा किल्ला पर्यटकांचे आवडते ठिकाण झालेले आहे. समुद्रसपाटीपासून ४४०० फूट उंचीवर उभारलेला हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वर रांगेवर हा किल्ला आहे. या किल्ल्यावरून पुरंदर, लोहगड, तोरणा, विसापूर व तुंग हे किल्ले दिसतात.
हा किल्ला आदिलशाहीत असताना विजापूरकरांनी दादाजी कोंडदेव यांना या किल्ल्याचा सुभेदार म्हणून नेमले होते. त्यांचा मृत्यू इ.स. १६४७ मध्ये झाल्यावर शिवाजी महाराजांनी कोंडाण्याचा सुभेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि आपले लष्करी केंद्र येथे बनविले. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी त्यांनी आदिलशहाला तो परत केला. पुरंदरच्या तहातही या किल्ल्याचा समावेश होता, त्यामुळे तो मोगलांकडे गेला. मोगलांच्या वतीने उदेभान राठोड हा या किल्ल्याचा कारभारी म्हणून कार्यरत होता.
या किल्ल्यावर काही पुरातत्त्वीय स्थळे आहेत. कोंढाणेश्वर शिवालय, अमृतेश्वर भैरव मंदिर, देवटाके, दारूचे कोठार, कल्याण दरवाजा, उदेभानाचे स्मारक, झुंझार बुरूज, तानाजी कडा, राजाराम स्मारक, तानाजींचे स्मारक ही त्यापैकी होत. सिंहगड प्रसिद्ध आहे, तो नरवीर तानाजी यांच्या बलिदानामुळे. त्यांच्या मुलाचे रायबाचे लग्न ठरले होते व त्याचे निमंत्रण देण्याकरिता तानाजी शिवाजी महाराजांकडे गेले होते. त्यावेळी शिवरायांच्या मनात सिंहगड काबीज करण्याची कल्पना घोळत होती. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर मोगलांच्या ताब्यात गेलेला एकेक गड काबीज करण्याची मोहीम शिवरायांनी सुरू केली होती. ती ऐकून तानाजींनी आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा सिंहगड ताब्यात घेणे हे स्वराज्यासाठी महत्त्वाचे आहे, असे म्हटले. त्याच अर्थाचे ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ हे वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडले. त्यानुसार त्यांनी मोहीम आखली असे म्हणतात. परंतु, या वाक्याचा समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये उल्लेख नाही.
अमावास्येच्या रात्री सिंहगडाच्या एका कड्यावर चढून गडावर प्रवेश करायचा बेत ठरला. त्यासाठी घोरपडीचा वापर केल्याची कथा सांगितली जाते. ह. ना. आपटे यांनी आपल्या ‘गड आला पण सिंह गेला’ या कादंबरीत या प्रसंगाचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केले आहे. त्यामुळे घोरपडीची कथा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचली. अनेक वक्ते, कीर्तनकार, शिक्षक इत्यादींनी तसेच चित्रपट लेखकांनी या कथेची रसभरीत वर्णने करून जनमानसात तिचे स्थान घट्ट केले.
कृष्णाजी अनंत सभासद हा शिवकालीन बखरकार आपल्या ‘श्री शिवप्रभूचे चरित्र’ या शीर्षकाखालील शिवचरित्रात या घटनेचे वर्णन करतो, ते असे- ‘तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळीयांचा होता. त्याने कबूल केले की, ‘ कोंढाणा आपण घेतो.’ असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन तानाजी मालुसरा चढून गडावरी तीनशे माणूस गेले. गडावर उदेभान राजपूत होता. त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल राजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोडा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लाऊन बाराशे माणूस तोफाची ( तोफवाले, गोलंदाज) व तिरंदाज, बरचीवाले, पटाईत, सुऱ्या, आडहत्यारी ढाला चढवून चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी ‘श्रीमहादेव’! असे स्मरण करून नीट फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. चाळीस-पन्नास मावळे ठार झाले. उदेभान किल्लेदार खासा त्यास व तानाजी मालुसरा सुभेदार यासि गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरी वोढ (शत्रूवर मारा घेऊन) घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून कुल लोक सावरून, उरले रजपूत मारले. कित्येक रजपूत कडे उडून पळून मेले. असे बाराशे माणूस मारिले. किल्ला काबीज केला आणि गडावर पागेचे खण होते, त्यास आग लाविली. त्याचा उजेड राजियांनी राजगडावरून पाहिला आणि बोलले की ‘गड घेतला, फत्ते झाली!’ असे जाहले. तो जासूद दुसरे दिवशी वर्तमान घेऊन आला की, ‘तानाजी मालुसरा यांनी मोठे युद्ध केले. उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालुसराही पडला’ असे सांगितले. गड फत्ते केला, असे सांगताच राजे म्हणू लागले की, ‘एक गड घेतला परंतु एक गड गेला.’ (पृ.५६)
छत्रपती शिवरायांच्या समकालीन अशा कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ‘सभासदाची बखर’ इतर बखरींच्यापेक्षा अधिक विश्वसनीय मानली जाते.
ती इ.स. १६९७ च्या सुमारास लिहिली गेली. तरीही इतर बखरींच्या मानाने तिला महत्त्वाचे स्थान आहे. या बखरीत सिंहगडावरच्या मोहिमेत घोरपडीचा वापर झाल्याचा उल्लेख कोठेही आढळत नाही. त्याचबरोबर ‘गड आला पण सिंह गेला’ हे वाक्यही तीत नाही; तर शिवरायांच्या मुखी ‘एक गड घेतला परंतु एक गड गेला’, असे वाक्य आलेले आहे.
त्यामुळे तानाजी मालुसरेंच्या मृत्यूमुळे कोंडाणा किल्ल्याचे नाव ‘सिंहगड’ ठेवले या म्हणण्याला काही पुरावा नाही. या उलट गडाचे नाव आधीपासूनच सिंहगड हेच होते, असे इतिहास संशोधकांचे मत आहे. सोबतच या मोहिमेच्यावेळी तानाजींनी गडावर चढण्याकरिता ‘यशवंती’ नावाच्या घोरपडीचा वापर केला होता, हेही एक मोठे झालेले असत्य आहे. ती केवळ एक दंतकथा आहे.
या दंतकथेमागे एक घटना असल्याचे सांगितले जाते. इ.स. १४४० मध्ये बहामनी राजा महमदशा बहामनी (दुसरा) हा सत्तेवर आला. त्याच्या महमूद गवान या वजीराने खेळणा ऊर्फ विशाळगड या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावर स्वारी केली. यावेळी किल्ला सर करण्याकरिता त्याने घोरपडीचा वापर केला होता असे म्हणतात. यावेळी त्याला मदत करणारा कर्णसिंह मात्र मृत्युमुखी पडला. त्याचा पुत्र भीमसिंह याला मुधोळची जहागिरी देण्यात आली. त्याला ‘राणा’ या किताबाऐवजी ‘घोरपडे बहाद्दर’ हा किताब देण्यात आला. यासंबंधीचे २२ ऑक्टोबर १४७१ चे फर्मान बनावट असल्याचे शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे मत आहे, अर्थात हीही एक दंतकथाच आहे.
डॉ. अशोक राणा