वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
तुरुंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंग प्रशासनाने एक नामी उपाय शोधला आहे. त्यानुसार ५०० रुपये देऊन तुरुंगात एक रात्र काढण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून दिली जात आहे.
या कारागृहाचे उपअधीक्षक सतीश सुखीजा यांनी सांगितले की, हल्दवानी कारागृह १९०३ मध्ये बांधण्यात आले होते. याच्या काही भागात अजूनही सहा कर्मचारी निवासस्थाने असून, ती दीर्घकाळापासून रिक्त आहेत. आता कारागृह प्रशासन नवीन योजना तयार करत आहे. ते म्हणाले की, काही लोकांची नावे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने तुरुंग प्रशासनाकडे सातत्याने पाठवली जात असून, त्यांना काही काळ तुरुंगाच्या बरेकमध्ये घालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या लोकांना कैद्यांचे गणवेश दिले जातात आणि तुरुंगाच्या स्वयंपाकघरात शिजवलेले अन्नही दिले जाते. ही प्रक्रिया आता नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. चक्क ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे अनेक लोक आहेत ज्यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून त्यांना आयुष्यात एकदा तुरुंगात जावे लागेल, असा ज्योतिषांचा अंदाज असतो. अशा परिस्थितीत भविष्यात काही कारणाने तुरुंगात जाण्याची शक्यता कमी करण्यासाठी लोक स्वत:हून तुरुंगातच राहायला जातात. अशा लोकांसाठी तुरुंगाचा एक भाग तयार केला जात आहे. तिथे हे लोक ५०० रुपयांमध्ये एक रात्र काढू शकतील.