महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील होट्टल गावातील पौराणिक मंदिरांच्या उत्खननादरम्यान शिव मंदिराशी संबंधित शिलालेख सापडले आहेत. या काळात एका पौराणिक शिवमंदिराचा पाया आणि तीन शिलालेख आढळले आहेत. चालुक्य वंशाच्या राजांनी अकराव्या शतकात नांदेडच्या होट्टल गावात अनेक मंदिरे बांधली होती, असे म्हणतात.

नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथे उत्खननात सापडलेल्या मंदिराचा मलबा हटवताना कामगार
होट्टल गावात तीन दगडी शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांवर देणगीदारांचे योगदान नमूद केले आहे. ही मंदिरे इ. स. १०७० च्या सुमारास बांधली गेल्याचीही नोंद आहे. हा परिसर एकेकाळी कल्याणी चालुक्य राजांची राजधानी होता. याशिवाय हा परिसर उत्तम शिल्पकलेने सजवलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने त्यांच्या उत्खननादरम्यान काही ऐतिहासिक मंदिरांचा शोध लावला. जीर्णोद्धार सुरू असलेल्या मंदिराजवळील ढिगारा साफ करताना पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने मंदिराचा पाया शोधला.