पालघर – तलासरी-डहाणू तालुक्यातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास (4 वाजून 47 मिनिटाला) भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ जमिनीखाली 5 किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले.

या भूकंपाचा धक्का डहाणू, तलासरी आणि गुजरात राज्यातील उंबरगाव तसेच दादरा नगर हवेली येथील सेलवासा, खानवेळपर्यंत बसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तालुक्यात पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यात भूकंपाने जमीन हादरल्याने नागरिकांना भूकंपाची भीती वाटत आहे. पावसामुळे घराबाहेरही झोपता येत नाही. त्यामुळे, येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली दिवस काढात आहेत. दरम्यान, या परिसरात 2018 पासून अनेकदा भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद आहे.