भारतात घडलेली अत्यंत घृणास्पद घटना म्हणजे दिल्लीजवळच्या नोएडा इथे घडलेले मुला-मुलींचे खून. भारतात दरवर्षी ४५ हजारांच्या वर गरीब मुलं बेपत्ता होत असतात. अनेकदा या सगळ्याच मुलांची पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची कुठलीही अधिकृत नोंद झालेलीही नसते. नोएडाजवळच्या निठारी नावाच्या छोट्याशा खेड्यातली ३० ते ३८ मुलं हरवलेली असताना पोलीस ठाण्यात मात्र फक्त सात ते आठ मुलंच बेपत्ता आहेत, अशी तक्रार नोंदवली गेली होती. काही चॅनेल्सवर या मुलांच्या पालकांच्या मुलाखती दाखवण्यात येत होत्या. आपली मुलं सापडावीत यासाठी हे पालक आक्रोश करत होते. असं सगळं असतानाही पोलीस मात्र या पालकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यास उत्सुक नव्हते आणि तक्रार नोंदवण्यासाठी प्रचंड टाळाटाळ करत होते. ज्या वेळी पालक तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात जात, तेव्हा ‘तुमची मुलं स्वतःचं घर सोडून गेली असणार, त्यांना कोणी पळवून नेण्याचं कारणच काय’, अशा प्रकारची टोलवाटोलवी करणारी उत्तरं पोलीस देत आणि त्यांना परत पाठवत.

त्यानंतर मात्र पालक आक्रमक झाले आणि अखेर पोलिसांना तपासात लक्ष घालणं भाग पडलं. पोलीस तपासात सेक्टर ३१ च्या डी- पाच या बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये आठ मुलांची हाडं सापडली. ही सगळी हाडं अतिशय कुजलेल्या आणि वाईट अवस्थेत होती. बातमी कळताच अनेक पालकांनी प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घेतली. माध्यमांनी शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा एक-दोन नाही तर मोठ्या संख्येने मुलं बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. मात्र, पोलीस रेकॉर्डमध्ये या बेपत्ता मुलांची कुठेही नोंद नव्हती. खरं तर नाल्यात सापडलेली हाडं बघून काही पालकांना संशय आला होता आणि त्यांनी पोलिसांनाही ही माहिती दिली होती, पण पोलिसांनी ही हाडं प्राण्यांची आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. लोकांचा संयम संपला आणि त्यांनी आवाज उठवल्यामुळे अखेर सरकारला या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालावं लागलं आणि त्यानंतर अनेक उलटसुलट अफवांना पेव फुटलं. मुलं गायब करण्यामागे पैसा हा हेतू नसावा, कारण ही मुलं अत्यंत गरीब होती. मग मुलांना गायब करण्यात एक तर लैंगिक भूक शमवणं किंवा यामागे भयंकर कृत्य करणारं एखादं रॅकेट असावं अशा प्रकारची चिंता लोक व्यक्त करू लागले.

पोलिसांवर दबाव वाढल्याने अखेर तपासाने वेग घेतला आणि नोएडातल्या २० मुलांच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण उघडकीस आलं. खरं तर हे उघडकीस येण्यास एक घटना कारणीभूत ठरली. पायल नावाची एक तरुणी हरवली होती आणि तिचा तपास करताना पोलिसांना ती डी- पाच या बंगल्यात गेल्याचे धागेदोरे मिळाले. ही पायल बंगल्यात जाताना रिक्षातच आपला मोबाईल विसरली होती. ती बंगल्यातून बाहेर पडलीच नाही. त्यामुळे रिक्षावाल्याने तो मोबाईल स्वतःकडेच ठेवून घेतला. रिक्षावाला तडक पोलिसांकडे गेला. या घटनेमुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी बंगल्याचा मालक मोनिंदरसिंग पंढेर याची चौकशी सुरू केली.
मोनिंदरसिंग याची स्वतःची फॅक्टरी होती. त्याचं शालेय शिक्षण सिमला इथे, तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झालं होतं. मोनिंदरसिंगला स्त्रियांबरोबर पाय, नाच-गाणी करायला आवडत असे. या मोनिंदरसिंगच्या डी- पाच या बंगल्यात सुरेंद्र कोली हा स्वयंपाकाचं काम करत असे. पोलिसांनी बंगल्याची तपासणी केली तेव्हा त्यांना तिथे रक्ताने माखलेला चाकू आणि पिस्तूल अशा वस्तू सापडल्या. पायलच्या खुनाच्या संशयावरून पोलिसांनी मोनिंदरसिंग आणि सुरेंद्र कोली यांना ताब्यात घेतलं. आपल्याला या खुनाची किंवा पायलची कुठल्याही प्रकारची माहिती नाही, असंच मोनिंदरसिंग याने पोलिसांना सांगितलं. मात्र, बंगल्यात येणारा प्रेतांचा कुजका दर्प, बागेत जागोजागी सापडलेली हाडं याविषयी मोनिंदरसिंग याने मौन बाळगलं. त्याला काहीही माहिती नाही यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही आणि मोनिंदरसिंगनेही गुन्हा कबूल केला नाही.
पोलिसी खाक्या वापरताच सुरेंद्र कोली याने हरवलेल्या आठ मुलांचा तसंच पायल हिचाही खून केल्याचा कबुली जबाब दिला. सुरेंद्र कोली ऊर्फ सतीश हा मुलांना चॉकलेट किंवा मिठाई यांचं अमिष दाखवत असे. बंगल्यात मुलं येताच तो त्यांना ठार मारत असे.
प्रेताबरोबर संभोग करायला आपल्याला आवडतं असं त्याने पोलिसांना सांगितलं. खरी गोष्ट अशी होती की, मोनिंदरसिंग आणि सुरेंद्र कोली दोघंही मुलांवर बलात्कार करत. आपण ४० मुलांना मारलं असं त्यांनी आठवून सांगितलं. पण, नेमका आकडा त्यांनाही आठवत नव्हता. आपण नपुसंक आहोत असं सुरेंद्र कोलीला वाटायचं आणि त्यामुळेच आपण हे कृत्य केलं असं त्याचं म्हणणं होतं. वेगवेगळे उपाय करत असतानाच एका तांत्रिकाने त्याला लहान मुलांबरोबर लैंगिक भूक भागवली तर नपुसंकत्व बरं होऊ शकतं असं सांगितल्याने त्याने हे पाऊल उचललं. मात्र, लोकांचा त्याच्या म्हणण्यावर विश्वास बसला नाही. मुलांचे अवयव विकण्याचा व्यापार करण्याचं काम या बंगल्यातून होत असावं असंच लोकांचं म्हणणं होतं.
दुर्दैवाची गोष्ट अशी की, सुरेंद्र कोली हाच गुन्हेगार ठरला आणि मोनिंदरसिंगकडून कित्येक लाख लाच स्वरूपात मिळाल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात कुठलीही तक्रार नोंदवून घेतली नाही.
तपास यंत्रणेने मोनिंदरसिंग पंढेर आणि सुरेंद्र कोली या दोघांविरोधात १६ गुन्हे दाखल केले आणि त्यापैकी १४ गुन्ह्यांबद्दल सुरेंद्र कोलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मोनिंदरसिंग पंढेर याच्या विरोधात सहा गुन्हे दाखल झाले आणि तीन गुन्ह्यांबद्दल त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, या दोघांनीही उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील केलं आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये या दोघांचीही मुक्तता केली हे विशेष! उच्च न्यायालयाने असा निकाल का दिला याबद्दल सर्वसामान्यांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक असलं, तरी जेव्हा उच्च न्यायालयात आरोपींनी अपील केलं तेव्हा सुरेंद्र कोलीने जो कबुली जबाब दिला, त्या सीडीच्या रेकॉर्डिंगचं रफ फुटेज न्यायालयाने मागितलं, पण तपास यंत्रणेकडे ते रफ फुटेज नव्हतं. तसंच कबुलीजबाबावर सुरेंद्र कोलीची स्वाक्षरी घ्यायला हवी होती, ती देखील घेतली नव्हती. इतकंच नाही तर सुरुवातीला मोनिंदरसिंग पंढेर आणि सुरेंद्र कोली दोघंही आरोपी होते, मात्र काहीच काळात फक्त सुरेंद्र कोलीवर सगळे आरोप थोपले गेले आणि मोनिंदरसिंगचं नाव अनेक आरोपांमधून मागे घेतलं गेलं या मुद्द्याकडेही उच्च न्यायालयाने लक्ष वेधलं. तसंच मोनिंदरसिंगच्या बंगल्यात वॉश बेसीनजवळ काळपट पडलेला रक्ताचा डाग आढळून आला होता, मात्र तपास यंत्रणेने त्याची फॉरेन्सिक तपासणी केली नव्हती. तसंच अशा अनेक कारणांमुळे सबळ पुराव्याअभावी दोघांची मुक्तता करण्यात आली. आरोपींना शिक्षा होईल आणि आपल्या गायब झालेल्या मुलांना न्याय मिळेल या आशेवर असलेल्या अनेक पालकांना उच्च न्यायालयाच्या या निकालाने हवालदिल केलं आहे. या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता तपास यंत्रणा सर्वोच्च न्यायालयात जाते की नाही हे बघायचं !