आफ्रिका खंडात उत्तर-पूर्व भागात असलेला सोमालिया हा एक छोटा देश. त्याचा उत्तरेकडील एक भाग गेंड्याच्या शिंगाप्रमाणे असल्याने सोमालियाला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ असे नाव आहे. प्रत्येक देशाचे काहीतरी एक वैशिष्ट्य असते. या छोट्या सोमालिया देशाचे वैशिष्ट्य म्हणजे जगात एकूण जेवढी समुद्री चाचेगिरी चालते, त्याच्या नव्वद टक्के चाचेगिरी सोमाली पायरेट्स (चाचे) करतात ! तिथल्या अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय चाचेगिरी हाच आहे! सोमालियाची भौगोलिक रचनाही या चाचेगिरीला पोषक आणि कारणीभूत आहे. कशी ते पाहा… सोमालिया आणि उत्तरेकडचा येमेन हा देश यांच्यामध्ये रेड सी म्हणजे लाल समुद्र आहे. हा लाल समुद्र पूर्वेला हिंदी महासागर, तर पश्चिमेला सुवेझ कालव्यातून भूमध्यसागराला मिळतो. पौर्वात्य देशांमधील माल घेऊन पाश्चिमात्य देशांकडे नेणारी सर्व मालवाहू जहाजे याच मार्गाने जातात. तसेच पश्चिमेकडून पौर्वात्य देशांकडे होणारी सर्व मालवाहतूकही या भागातूनच होते. अशी सरासरी ३०० मोठी जहाजे रोज या मार्गातून ये-जा करतात. ही जहाजे सोमाली चाच्यांचे प्रमुख लक्ष्य ठरतात. सोमालियाच्या समुद्र किनाऱ्यापासून ५०-६० कि.मी.वर खोल समुद्रात अशा जहाजांवरील खलाशांना ओलीस ठेऊन हे चाचे मोठ्या खंडणीची मागणी करतात. आफ्रिका खंडातील देशांमध्ये सर्वात अधिक लांबीचा, ३००० कि.मी. चा समुद्रकिनारा सोमालियाला लाभलेला आहे. ही चाचेगिरी कशी चालते हे पाहण्यासारखे आहे !

सोमालियाच्या पूर्व प्रांताला पँटलँड म्हणतात. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय चाचेगिरी हाच आहे आणि तो मोठ्या पद्धतशीरपणे केला जातो. प्रमुख पायरेट (चाचा) हा हल्ल्यात भाग घेत नाही. कोणते जहाज किती डॉलरचा माल घेऊन गल्फ ऑफ ओमानमध्ये कधी येणार आहे, जहाजावरती सुरक्षा यंत्रणा कशी आहे, याची सविस्तर माहिती काढून हा प्रमुख चाचा ती गुंतवणूकदारांना पुरवतो. या चाचेगिरीचे विशेष म्हणजे अशा हल्ल्यात अरब आणि काही युरोपियन देशांमधले धनिक लोक पैसा गुंतवितात. एक जहाज या चाच्यांनी पकडले की, त्याच्यातून मोठी खंडणी तर मिळतेच, शिवाय जहाजावरचा माल विकून लाखो डॉलर्सची कमाई हे चाचे करतात !
जहाजावर प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या पथकात म्हणजे अटॅक स्क्वॉडमध्ये २४ ते ३६ माणसे असतात. या लोकांना मार्गदर्शन करणारा एक बॉस कमांडर असतो. या सर्व हल्लेखोरांना त्या भागातल्या सर्व समुद्री मार्गांची आणि पळवाटांची बारीक सारीक माहिती असते. या सर्व चाचे लोकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे २४ लोकांचे एक सिक्युरिटी पथकसुद्धा त्यांच्याबरोबर हातबॉम्ब, एके-४७ बंदुका वगैरे शस्त्रांनी सुसज्ज असते. हे सर्व लोक मुख्य बोटीतून (मदरशिप) हल्ल्याच्या ठिकाणी रात्री जातात. हेरलेल्या जहाजाजवळ जाऊन घडीच्या शिड्या आणि दोरांच्या सहाय्याने मालवाहू जहाजावर चढतात. हल्ल्याच्या वेळी प्रतिकार झाल्यास चाच्यांच्या सुरक्षा पथकाचे लोक बंदुकांचा वापर करतात. ते प्रथम धमकावून जहाजाच्या कॅप्टनला जहाज उत्तरेस ओमान किंवा अमिरातीच्या बाजूला किंवा दक्षिणेस मोझांबिकपर्यंत नेऊन खोल समुद्रात उभे करावयास लावतात. त्यातल्या खलाशांना किनाऱ्या जवळच्या एखाद्या गुप्त ठिकाणी नेऊन ओलीस म्हणून ठेवतात. हे झाल्यावर जहाज त्यावरील मालासहीत गुप्त ठिकाणी ऊन मालवाहू जहाजाच्या कंपनीला आणि विमा कंपनी यांना जहाजाची पायरसी झाल्याचे सांगून मोठ्या खंडणीची मागणी केली जाते. याबाबत वाटाघाटी करण्यासाठी यांच्याकडे अनुभवी लोकांचा स्टाफ असतो.
वाटाघाटी यशस्वी झाल्यास जहाजमालक कंपनी रकमेचे भरलेली खोकी पॅराशूटच्या सहाय्याने ठरलेल्या ठिकाणी उतरवितात. गेल्या काही वर्षांपासून हे पैशांचे काम काही खासगी सिक्युरिटी एजन्सीमार्फत केले जाते. हे सोमाली चाचे हल्ली शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांचा चोरटा व्यापारही करू लागले आहेत. त्यांच्याकडे स्वतःची ऑफिसेस आहेत, अकौंटंटस् आहेत, रेडिओऑपरेटर्स, मजबूत जीपीएस यंत्रणा आहेत. एखादा मोठा सुपर ऑईल टँकर या चाच्यांनी पकडला तर त्यातून २५-३० लाख डॉलर्सपर्यंत खंडणीची कमाई त्यांना कमीतकमी होते. अशा पद्धतीने गब्बर झालेले चाचे पुढे मोठ्या उद्योगांना फायनान्सर म्हणूनही काम करू लागतात. सोमालिया ते सुवेझ कालवा या मार्गातल्या जहाजांना विमा कंपन्या फार मोठ्या दराने विमा आकारणी करतात, त्यांचे कारण ही चाचेगिरी होय. त्यामुळे मालाच्या किमतीही वाढतात. दरवर्षी या परिसरात अशी लाखो डॉलर्सची उलाढाल होते.

अगदी अलीकडील म्हणजे मार्च २०२४ मधे घडलेली चाचेगिरीची एक घटना. ‘एमव्ही अब्दुल्ला’ हे बांगलादेशी व्यापारी जहाज युएई येथून मोझांबिकला जात होते. त्यावेळी सोमाली सागरी चाच्यांनी जहाजावर येत जहाजाचे अपहरण केले. त्याबाबतची माहिती या परिसरात सागरी गस्तीवर असलेल्या भारतीय युद्धनौकेला मिळाली. युद्धनौकेने जहाजाच्या कप्तान आणि खलाशांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण ते न जमल्याने त्यांनी जवळच्या दुसऱ्या युद्ध संरक्षण नौकेला कारवाई करण्यासाठी पाठवले. तोपर्यंत सोमाली चाच्यांनी बांगलादेशी खलाशांना ताब्यात घेतले होते. युद्धनौकेवरील कमांडोंनी मग पाण्यात उतरून जहाजाच्या मागील बाजूने जहाजावर प्रवेश केला. परंतु, त्यांची चाहूल लागताच सर्व चाच्यांनी तिथून समुद्रात उड्या टाकून पलायनाचा प्रयत्न केला. त्यापैकी ३५ चाच्यांना पकडण्यात भारतीय कमांडोंना यश मिळाले.
२०१० साली सोमाली चाच्यांनी ५३ जहाजांवर हल्ला करून १,१८१ खलाशी ओलीस ठेवले. २०११ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ११७ जहाजांवर हल्ला करून ६०० खलाशी ओलीस ठेवले. या हल्ला होणाऱ्या जहाजांना संरक्षण देऊन वाटाघाटी करण्यासाठी इंटरनॅशनल मेरीटाईम ही अनेक देशांनी एकत्र येऊन काढलेली संघटना आहे. त्यांच्याकडे २५ युद्धनौकांचा ताफा आहे, त्यामुळे चाचेगिरीला थोडा वचक बसला आहे. सततच्या दुष्काळ आणि यादवी युद्धांमुळे पछाडलेली सोमालियाची जनता आणि त्यातच दुबळे सरकार, यामुळे या प्रदेशात अनेक प्रकारचे अनैतिक व्यवसाय हे येथे नित्याचेच झाले आहे.
सुनीत पोतनीस, संपर्क : ९४०३२७५७९४