संज्या हा आकोला जिल्ह्यातल्या माना या गावाचा. एक वलीतातला सधनं कास्तकार म्हनूनसन्या गावात त्याची ओयख. त्याचं मॅट्रीक लोग मान्यातचं शिक्षण होयेलं राह्यते.अन बारावी लोग तालुका मुर्चापूरले. त्याले नवकरी करनं आवळतं नसल्यानं . थो बारावी नंतर शिक्षण सोळूनं देते .अन वावराकळे लक्ष द्याले लागते. त्याची दा एक्कर जमीनं वलीता खालची असते. त्याच्या वावरात गोळं पान्याची भलीमोठ्ठीजात पायर्यायची ईहिर असते . बापाले थो एकुलता एक पोरगा असते. संज्या त्याच्या वावरात येगयेगळ्या परकारचे परयोग करतं असते. शेतावरचे पुस्तक वाचनं, कृषकोन्नती, कृषी मासीकं, वावर मासिक वाचनं करनं हा त्याचा छंद असते. त्याच्या येगयेगळ्या परयोगानं थो वावरातूनू भरमसाठ पीक घेत असते.

त्याचं लगन कवठ्याच्या एका शालू नावाच्या पोरीसंग होते. मस्त सन्सार चालू असते. त्याले एक गोंडस पोरगी होते.
संज्याच्या काॅलेजच्या मैतराचं लगनं ठरते. त्याले लगनाची पतरीका येते . संज्या अन त्याची बायको दोघही मुर्चापूरवरूनं अहेरं घेतात.
लगनाच्या आठ दिवस आंधीच संज्याची बायको शालू लगनात जाते. नवरी तीची मैतरीनं असल्यानं.
लगनाचा दिवस जौळ येते. लगनं कवठ्यालेचं आंगनात पोरीच्या घरी असते. घरी ढोरं वास-यायच्यानं संज्या लगनाच्या दिशी पायटीचं सात वाजता ढोरायचा चारापानी करून हिरोहोंडा घेवूनसन्या कवठ्याले निंघते.
वरात मारोतीच्या पारावूनं वाजत गाजत मांडवात येते. लगन लागते , बॅन्ड वाजते अन् पंगती बसतात. लोक सुई लगन ही लावत नाही तं .तेयची धुम जागा पकळाची. पट्ट्या ही टाकू देत नाहीत सायाचे लोकं . पांडे कपळे घालून फफुळ्यातचं पालकटा मांडूनं बसतात मॅट वानाचे. संज्या सुई लगन अरामानं लावते अनं पयल्या पंगतीची ऊठाची वाट पाह्यते तं काय . पयली पंगत ऊठल्या बराबर लोकं टुकनी लावून जेवना-या लोकायच्या मांग ऊभे. वान्नेरावानी ऊळ्या मारून बसतात. बरं खरकट ही झाळू देत नाहीत मायबीनं. यवळी खा साठी मरमर सायाची. दुसरी पंगत बसते, तिसरी पंगत बसते पनं संज्याचा काही केल्या नंबर लागतं नाह्यी .संज्या मनातल्या मनात म्हनते …
‘ लेका आता माणसाचा गरदा कमी झाला. आता भजन ज्मते लेक! …’
त मंग काय बायायची अरधी पंगत बसते . संज्याले राग येते थो मनातल्या मनात म्हनते….
‘ हट्ट च्या मायले एक त लगन ऊशिरा लागलं अनं त्यात चार पंगती आतापावतर ऊठल्या. नंबर काही लागून राह्यला नाही. अन् पायटी न्याहारी ही केली नाही. ‘
संज्यानं ना पायटी न्याहारी केली असते ना चा घेतला असते . आता त्याले भूक सुदरू देत नाही .
आता बायाची अरधी पंगत बसते अन मानसायची अरधी . घडायातं तीन वाजतात . भूकीनं संज्या तळपत असते. वरूनं ऊनं चटकत असते. मांडवातूनं ऊन चटकत असते. मातीचा गरमास अन् मांडवाच्या गरमासानं संज्याचा घसा कोळ्ळा खट्ट पळला असते . अनं त्यातल्या त्यात एपरील मयना वर्हाडात लय तपते. संज्याचा जीव पान्यानं लायं लायं करते.
पनं जवा संज्या चारपाच ऊघळे नांगये लेकरं हातात जलमरीच्या तासक्या घेलून मांडवा बाहेरं पाह्यते . तव्हा संज्याचं मन चरचर ईयानं चिरल्या सारखं होते . संज्याची भूकं कुठल्या कुठं पवूनं गायब हुन पयूनं जाते.
ऊघळे नागये लेकरं….. पायात ना वायना …. फाटलेल्या चड्ड्या ……फाटलेला , मयकटलेला फराक, तोंडात बोटं टाकूनं थ्या पंगतीकळे, पतरवाईतल्या अन्नाकळे एकटक टुकनी लावूनं पाह्यतं असतात . वरून म्हनते ऊन. तेयचे लेकरायचे पाय जयतं असतात . एका पायावर दुसरा पायं देवूनसन्या थे लेकरं ऊभे असतात. तेयले आस असते फकस्त पोटभर अन्नाची. तेयले पाहूनं संज्याचा जीव थटथट तुटत असते. त्याले लै खराब वाटत असते .
संज्याले पंगतीतल्या लोकायचा आता राग येत असते.
संज्या मनातल्या मनात सोतासंग बोलत असते ….
‘हे लोकं सायाचे… जेयच्या घरच्या दवळ्या पुरनाच्या पोईन टच्च भरल्या हायेत. धनवान हायेत. वावर, जोळ्या टॅक्टर हायेत. सायाचे वान्नेरावानी ऊळ्या मारून पंगतीत पांडेभक कपळे घालूनसन्या बसूनं राह्यले. अन हे ऊघळे नागये लेकरं त्या पतरवाईतल्या बुंदा , पोई , आलू वांग्याची भाजी , वरन-भात अनं लुंजी ले पाहूनचं थुक्याच्या गीटक्या मारून राह्यले. तेयले कोनीचं पाहूनं नाह्यी राह्यलं. पांडे कपळे घालूनं फफूळ्यात बसूनार्या लोकायचा ह्या अन्नावर बिलकूलं हक नाही . अनं हे तरनेबांड वाळपे पोट्टे सायाचे, फोकनीचे बायाच्या पंगतीत वाळताना लयचं जबरदस्तीनं बाया , पोट्याईयले वाळनं करूनं राह्यले. हात आळवा करूनं राह्यल्या पोट्या तरी सायाचे पतरवाईतं वतूनं राह्यले. पतरवाई टच भरेलं ही तेयले दिसतं नसनं कायं ?….’
अनं दिसाले नाकी -डोयी चरचर असलेल्या एका पोट्टीले त सारे वाळकरी पोट्टे तीच्या पतरवाईलेच पाहूनं राह्यले होते . थे नायी नायी करे , हात आळवा करे पनं तरी पोट्टे सायाचे कायी केल्या आयकतच नोते .
” यवळा मान ठेवं “
म्हनत वाहाळू राह्यले.
पोट्टीची पतरवाई टचंम भरली होती. तीनं ढेकरं ही देल्ली होती. तरी पोट्टे कायी केल्या आयकतच नोते .’
थ्या पोट्टीनं ज्याच घेतलं. थो त बेज्याच हरके . पन थ्या ऊपाशी -तापाशी लेकरायले कोनी ना पाह्ये ना कोनाले किव ये…
संज्याच्या जीवाले थे काही केल्या पटेना.
आता संज्याचा राग डोक्शाच्या वदर गेला होता . संज्या रागारागानं, फनफनत नवरदेवा जौळ गेला. सुभासचा त्यानं हात पकळला. दुपट्याची अनं नवरीच्या चुनरीची संज्यानं गाठ सोळली. संज्या सुभासचा हात धरूनं मांडवा बाहेरं घेवूनं जात होता. लोकायले वाटे हा पोरगा नवरदेवाले कुठ घेऊन चाल्ला बापा! सारे लोक संज्याकळे पाह्येत होते . संज्यानं सुभासले थ्या पोट्टीची टच्च भरलेली अन तीनं ऊष्टी टाकलेली पतरवायी दाखोली. मंग ओहळतच त्याले मांडवा बाहेर नेल . थे ऊघळे लेकर दाखोले. त्याले चार गोष्टी सुनोल्या सच्चा मैतर असल्यानं हु का चू न करत त्यानं आयकल्या. सुभास मुकन्यावानी काईचं बोल्ला नायी. सुभासले ले संज्यानं म्हतल……
” ज्या लोकायले पोटभर खा ले भेटते तेयले तुम्ही खावू घालू राह्यले. अन जे ऊन्हातानात जिभल्या चाटू राह्यले तेयच्या कळे तुम्हाले पा ची ही फुरसतं नाह्यी. हा आपला कृषीपरधान देश म्हने…काहाचा कृषीपरधान देश. जतीसा दोनं वक्ताचं जेवनं नशिबातं नाही. भूकीनं तळफळत जतीसा लोकं मरतात. थो कृषीपरधान देश.मुठभर लोकं तुपाशी अन् पसाभर लोकं ऊपाशी…
..मोठ लगनं करूनं राह्यला बे. काॅलेजमंधी मोठमोठ्या देशभक्तीच्या. देशसेवेच्या, समाजसुधारन्याचा बाता हानतं होता भाषनामंधी. सारं सारं थे खोटं होतं काय? ….अन अतिसा तुह्याचं लगनात हे ऊघळे नांगये लेकरं थ्या खरकट्या पतरवाईले पाह्यत थुका गीटूनं राह्यले….थे तुले दिसतं नाह्यी काय? सायाच्या ! “
बोले तैसा चाले त्याची वंदावे पावूले ….
हे खोटं होयं कायं बे लेका तुच सांग आता मले.
लेका मी चाल्लो घरी आता. लखलाभ तुले तुव लगनं अन् पक्की रसोईची पंगत . ” संज्यानं बायकोले फोन केला… बेसन भाकर कर म्हणूनसन्या.
संज्या कॅनीतल थंडगार पानी पोटभर पेला . पळीतात मुताले गेला. होंडा ले चाली लावली किक मारता मारता त्याचं ध्यानं पंगतीकळे गेलं तं त्याले अजबच चित्रं दिसलं . सुभास त्याची नवरी थे ऊघळे लेकर सुभास अनं नवरीच्या मांडीले मांडी लावूनं पंगतीत हासत जेवन करून राह्यले. सुभास बुंदा घेऊन तयहाताच्या खोलगट भागानं तेयले चारत होता.. थे चित्र पाहून संज्याले लैच हरिक झाला.त्यानं बायकोले फोन करूनं म्हतल बेसन भाकर संध्याकायी जेवू. संज्या सुभास जौळ गेला. थे सार पाहून त्याचं ऊर भरूनं आलं. संज्या पंगती जौळ गेला. संज्याच्या आसवानं पापनिचे हात सैल सोळले होते. वरनाच्या डवन्यात टपटप आसवाचे दोन थेम्ब पळले . डवना तोंडाले लावूनं सुभास वरनं पेते अन्.. …सुभास संज्याले म्हनते कसा…
” संज्या ; मले आतापावतर असं वाटे तू लेका लैच तिखट हायेसं , पन लेका तू त खारट बी हायस मिठावानी. “
सारे लोकं सुभासचे शब्द आयकून हासाले लागले होते. संज्यानं लुंजीची फोळ ऊचलली सालटासहीत खाल्ली. बुंदा मुठ्ठीभर घेतला अन् सुभासच्या तोंडात टाकला.
थे ऊघळे नागळे गरीबायचे लेकरं सन्नावून भिळले होते. खपाटीले गेलेले पोटं टम्म फुगीरले होते. सारे पोरं मग्गम झाले होते. जेवल्यावर सुभासनं थ्या लेकरायले अहेरात आलेले कपळे देल्ले. पोट्यायले तेयच्या तासक्या , गंजूल्या भरूनं बुंदा, पोया, भाजी ही हातानचं देल्लं पोट्टे खुसमखुस होवूनसन्या झिंगाट पयाले…
संज्याले आता कयल होतं की, सुभास हा कसा मानूसं हायं म्हनूनसन्या…
‘बोले तैसा चाले त्याची वंदावे पावूले.’
हे म्हनं सुभासच्या बाबतीत खरी ठरली होती.
लेखक : -सु.पुं.अढाऊकर, अकोला , ९७६९२०२५९७