अकोला : (नारायणराव अंधारे) देवकीनंदन गोपाला चित्रपट करण्यापूर्वी गीतकार स्व. श्री. ग. दि. माडगूळकरांना वऱ्हाडात मातामायचे गाणे, महादेवाचे गाणे, जात्यावरचे गाणे, लोकगीते कशा पद्धतीने गायले जातात हे ऐकायचे होते. तसे त्यांनी देवकीनंदन गोपाला या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक स्व. प्रा. किशोर मोरे यांना सांगितले. प्रा. स्व. श्री किशोर मोरे म्हणाले, सरकारी कलापथकातील प्रमुख कलाकार श्री.ह.मो. खटोड गुरुजी आहेत, ते नाट्यकलाकार, नकलाकार व लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांना बोलावू का? वरिष्ठांच्या संमतीने प्रा.श्री मोरे, ह.मो. खटोड गुरुजींना विश्रामगृहात घेऊन आले आणि त्यांचा परिचय वरिष्ठांशी करून दिला. श्री. ग. दि. माडगूळकरांना हवी ती गाणी श्री खटोड गुरुजींनी ऐकविली आणि लोकगीते वाद्यासह ऐकण्यासाठी लहान उमरीच्या ग्रामपंचायत हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला. वऱ्हाडात गायले जाणारे लोकगीते ऐकून वरिष्ठ मंडळी खुश झाली, आनंदली. तेव्हाच दिग्दर्शक श्री राजदत्तांनी श्री ह.मो. खटोड गुरुजींना देवकीनंदन गोपाला या चित्रपटात एक भूमिका करण्याची विनंती केली. देवकीनंदन गोपाला या चित्रपटातील श्री ह.मो. खटोड गुरुजींची भूमिका पाहून राघू मैना या चित्रपटात खटोड गुरुजींना भूमिका दिली. अर्थातच या प्रकरणात प्राचार्य ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांचा सिंहाचा वाटा होता. कारण तेही सहाय्यक दिग्दर्शक होते. श्री खटोड गुरुजींनी सर्वांचे आभार मानले. विशेष असे की, अखिल भारत मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर या मंडळात सदस्य म्हणून श्री ह.मो. खटोड गुरुजींना घ्यावे अशी शिफारस चित्रपट निर्माता स्व. प्राचार्य श्री डॅडी देशमुख व दिग्दर्शक श्री राजदत्तांनी केली. त्यामुळे अखिल भारत मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर यांनी दि. 4.10.1983 मध्ये ज्येष्ठ अभिनेता सदस्य म्हणून खटोड गुरुजींना मान्यता दिली.

नाट्यक्षेत्रातून तुम्ही सिनेसृष्टीत कसे गेले? या विषयावर अकोला आकाशवाणी केंद्राने श्री ह.मो. खटोड गुरुजींची मुलाखत प्रसारित केली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वाशिम शाखेने श्री खटोड गुरुजींना पुरस्काराने सन्मानित केले, तर जिल्हा शाखा अकोला-मलकापूर अकोला शाखेने खटोड गुरुजींचा गौरव करताना दैदीप्यमान कामगिरीने नाट्यक्षेत्राला उजळून टाकणाऱ्या आपल्या कार्याला सलाम असे म्हटले आहे. पुरस्कार अर्पित केला तो रंगभूमी दिन दि. 5.11.2016 ला. उज्वल एखाद्याचं नशीब याचा पुरावा म्हणून श्री ह.मो. खटोड गुरुजी आहेत याचा सत्कार आंतरराष्ट्रीय कलावंत दिन 25.10.2024 ला माँ गायत्री ज्येष्ठ नागरिक संघाने अकोला येथे गौरव केला असे अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री नारायणराव अंधारे शिर्ला यांनी कळविले आहे.