चालू महिन्यात भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीज आणि क्रिकेट हे फार जिव्हाळ्याचं नातं आहे. या देशातले लोक क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात. विश्वचषक स्पर्धा जिंकून जगज्जेता होण्याचा पहिला मान वेस्ट इंडीजनेच मिळवला. १९८३ मध्ये भारताने याच विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव करुन इंग्लंडच्या मैदानावर इतिहास घडवला होता. या अविस्मरणीय घटनेला गेल्या महिन्यात २५ तारखेला ४० वर्षे पूर्ण झाली.
हे सगळं आठवलं की आपसूकच वेस्ट इंडीजच्या त्या खेळाडूची सर्वांना आठवण आल्याशिवाय राहणार नाही. विव्ह रिचर्डस त्याचं नाव. २५ जूनला लॉर्डस मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात कपिलदेवने पाठीच्या दिशेने धावत जाऊन विव्हचा तो उंच झेल पकडला नसता तर कदाचित विश्वचषक भारताच्या नावे झाला नसता. विव्ह ज्या तडफेने मैदानावर खेळत होता ती तडफ वेस्ट इंडीजला विजयाचा पैलतीर गाठून दिली असती. विंडीजचा त्या सामन्यात पराभव झाला असला तरी खरा हिरो ठरला तो विव्हियन रिचर्डसच.
विव्ह हा क्रिकेटमधला राजा होता. आपल्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत व्हिवियन रिचर्डसने फलंदाजी करताना एकदाही हेल्मेट घातले नव्हते. तो केवळ एक तडाखेबाज फलंदाजच नव्हता तर त्याच्याकडे एक नजाकत होती, एक लय होती. समोरच्याला कुठलीही दयामाया न दाखवता तो त्याला उखळात कुटून काढायचा. मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे जेव्हा त्याची लय नसेल तेव्हा तो कण्हून कुथून बद्धकोष्ठी धावा काढत नसे. सेन्चुरीच्या जवळ आला म्हणून सावध खेळण्याचा नतद्रष्ट भिकारडेपणा तर त्याने कधीही केला नाही. समशेर बरसली नाही तर त्याचा विळा करून तो धावांचे गवत काढत बसला नाही !
टेस्ट क्रिकेटमध्ये १५० चा स्ट्राइक रेट गाठणारा तो पहिला फलंदाज होता. तो स्कोअरबोर्डकडे न बघता गोलंदाजांना धुवत राहायचा. विक्रमांसाठी न खेळता त्यातल्या गेमस्पिरीटसाठी खेळला म्हणून त्याचे क्रिकेटवरचे प्रेम सच्चे होते. इतकेच नव्हे तर त्याचा फॉर्म पूर्णतः हरपला हे त्याच्या लक्षात येताच तो सन्मानाने निवृत्त झाला. उगाच पुन्हा पुन्हा कायम चूर्ण खाऊन साफ व्हायची वाट बघत बसला नाही.
क्रिकेटचे समालोचन त्यानेही केलं पण अजीर्ण व्हावे इतके नाही. त्याने नीना गुप्ताशी खुले आम अफेअर केले. तिच्यापासून झालेल्या पोरीला मसावाला अव्हेरले नाही; तो तिच्या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिला होता. २०१५ मध्ये व्हिवच्या आई ग्रेटेल रिचर्डस यांनी मसाबाला आपण आपली नात मानत असल्याचे कबूल केले होते तर (व्हिवच्या बायोग्राफीनुसार) व्हिवच्या पत्नीने मिरियमने त्याला या बद्दल माफ केल्याचे लिहिले आहे. व्हिवचा मुलगा माली रिचर्ड मसाबाला आपली बहीण मानतो. व्हिव दिलदार होता, खेळासाठी खेळायचा. क्रिकेटचे त्याने च्युइंगम केले नव्हते, तेच तेच चघळून पुन्हा चावायला आणि पुन्हा थुंकायला! आता तर थुंकलेले देखील
चघळत राहतात ..असो . व्हिवला मात्र च्युईंगमचा भयानक शौक होता. व्हिवने करेबियन बेटांसाठी सोशल वर्क देखील केले पण खेळाचे राजकारण केले नाही की खेळातून राजकारणात गेला नाही. क्रिकेट हेच त्याचे सर्वस्व होते आणि त्या बरोबरच त्याने स्वतःची अस्मिताही जपली. १९८३ मध्ये वेस्ट इंडीज टीममध्ये बंडाळी माजली होती तेव्हा त्याल कोरा चेक ऑफर केला गेला होता! तेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी ! विशेष म्हणजे तेव्हा आफ्रिकेत वर्णभेद जोरावर होता, व्हिवने त्या चेकला कचऱ्याची बकेट दाखवली! त्याच्या देशाने त्याला सर्वोच्च किताब बहाल केला होता.
‘हिटिंग ऍक्रॉस द लाइन’ हे त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, विशेष म्हणजे हे पुस्तक खपावे म्हणून आजकालचे क्रिकेटर करतात तसा फालतूपणा त्याने केला नव्हता. त्याच्या फलंदाजीच्या स्टाइलला शोभेल असेच शीर्षक त्याने या पुस्तकाला दिले होते. त्याच्या या ऍक्रॉस द लाइन तुडवातुडवीमुळे समोरच्या गोलंदाजाची लय मात्र बिघडून जात असे.
व्हिवने आपला मुलगा माली रिचर्डस याला लाइमलाइटमध्ये आणण्यासाठी वा त्याची शिदोरी पक्की करण्यासाठी आपली कोणतीही पुण्याई वापरली नाही; त्याचा मुलगा काउंटी क्रिकेटच्या पुढे जाऊ शकला नाही आणि व्हिवनेही त्याला पुढे जाता यावे म्हणून कुठल्या शिड्या जोडल्या नाहीत! तो फलंदाजीचा राजा होता आणि अखेरपर्यंत राजासारखाच राहिला. ‘सीधी बात नो बकवास’ हे वाक्य त्याला खूप फिट बसतं. ‘बॉल फोडून काढणे’ हे त्याने शब्दशः सिद्ध करून दाखवले होते, बॉलच्या त्याने अक्षरशः चिंधड्या उडवल्या होत्या.
बिनीच्या काळात नोकरीच्या शोधात रिचर्डस इंग्लंडला आला होता. १९७१ मध्ये सेंट जॉन्सच्या डेकार्सीज रेस्त्रोमध्ये त्याने बारबॉय म्हणून काम सुरु केले तेव्हा त्याचे वय होते अठरा वर्षे. दिवसभर काम करून संध्याकाळी तो सेंट जॉन्सच्या क्रिकेट क्लबमध्ये खेळायला जाई तेव्हा त्याच्याकडे क्रिकेटची मूलभूत साधने देखील नव्हती. त्यावेळी त्याच्या बारमालकाने त्याला ग्लोव्हजपासून ते बॅटपर्यंतचा सेट दिला आणि व्हिवने आपल्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवला. त्याची बॅट कायम तळपती राहिली. तो यशस्वी कप्तान होता आणि पार्ट टाइम गोलंदाजही होता. फिल्डिंग करताना ग्राउंडवर टिवल्याबावल्या करण्यात त्याचा हात कुणी धरत नसे. आपल्या टीममेट्सचा आदर करणाऱ्या रिचर्डसचे पाय कायम मातीचेच होते. विशेष म्हणजे निवृत्त होताना तो आधी एकदिवसीयमधून निवृत्त झाला आणि नंतर काही महिन्यात कसोटीतून निवृत्त झाला. आजकाल बरोबर उलटे चित्र पाहायला मिळते, नाही का ?
असो. आता त्याचं वय पासष्टी पार गेलंय पण तो अजूनही जिंदादिल आहे आणि आयुष्याचा आनंद घेतोय, अर्थातच राजासारखा! म्हणूनच व्हिवियन रिचर्डस निवृत्त झाल्यावर क्रिकेट बघणं मी कायमचं बंद केलं.
समीर गायकवाड , मोबा. ९७६६८३३२८३