• ‘ग्रंथ संजीवनी’ पोर्टलवर सर्व डिजिटल पुस्तके उपलब्ध आहेत.
पुणे : महाराष्ट्रातील ग्रंथालयांमध्ये दुर्मीळ पुस्तकांचा मोठा खजिना आहे. काही पुस्तके शंभर वर्षे जुनी आहेत, तर काही ८० वर्षे. हाच पुस्तकांचा खजिना योग्य पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यभरातील १३५ सरकारमान्य शतायु ग्रंथालयांमधील दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत सुमारे ३० हजार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले असून, ही पुस्तके डिजिटल स्वरूपात ‘ग्रंथ संजीवनी’ नावाच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. येत्या काळात राज्यभरातील ‘अ’ दर्जा असलेल्या सर्वच ग्रंथालयांतील दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन होणार आहे.
महाराष्ट्रात अनेक ग्रंथालयांमध्ये दुर्मीळ पुस्तके आहेत. त्यांना काळाप्रमाणे डिजिटायझेशनची गरज आहे. या पुस्तकांचा वारसा जतन व्हावा आणि ही पुस्तके पुढील पिढीलाही वाचायला मिळावीत यासाठी ग्रंथालय संचालनालयाकडून पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा उपक्रम राबविला जात आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात असल्याचे ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात ‘अ’ वर्गाच्या ग्रंथालयांना निधी दिला जात आहे. त्या माध्यमातून ग्रंथालयांकडून पुस्तकांचे डिजिटालेशन होत आहे.
गाडेकर म्हणाले, एशियाटिक सोसायटीतील ३० हजार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. ‘ग्रंथ संजीवनी’ या पोर्टलवर ही पुस्तके वाचायला मिळत आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला आम्ही तीन कोटींचा निधी दिला असून, येथेही पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम सुरू होत आहे. पुणे मराठी ग्रंथालयातही पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्यातून पुण्यातील शासकीय विभागीय ग्रंथालयातील दळ पुस्तकांचेही डिजिटायझेशनचे काम केले जात आहे.
राज्यातील १३५ शतायु ग्रंथालयांकडून त्यांच्याकडे असलेल्या दुर्मीळ पुस्तकांची यादी मागवली होती. ग्रंथालयांनी पुस्तकांची यादी आम्हाला पाठवली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने विविध ग्रंथालयांमधील दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन केले जाईल आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल.
