मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. ०४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, याचा शुभ मुहूर्त व महत्त्व याबाबत आज आपण जाणून घेऊया.
शुभ मुहूर्त – :
माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ मंगळवार, ०४ फेब्रुवारी रोजी पहाटे ०४ वाजून ३७ मिनिटे.
माघ शुद्ध सप्तमी समाप्ती : मंगळवार, ०४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रौ ०२ वाजून ३० मिनिटे.
सप्तमीचे महत्व : रथ सप्तमी ही सूर्य जयंती म्हणून खजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते.
व्रताची पूजाविधी : रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र ‘सूर्य’ याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्य पूजन केले जाते. सूर्य पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे, छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले द्यावे. रथसप्तमीदिनी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात. रथा ची बारा चाके बारा राशींचे प्रतिक आहे, असे मानले जाते.
रथ सप्तमीच्या दिवशी – घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवा आणि तेथे दिवा लावा. यासोबतच गायत्री मंत्राचा २७ वेळा जप करावा. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल. रथ सप्तमीच्या दिवशी कुशाच्या आसनावर बसून आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करा.
व्रताचे फळ काय सांगितले जाते ?
महाराष्ट्रात प्रामुख्याने हे व्रत करतात. षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजविलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखविणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे खताचे स्थूल स्वरूप असते.
■ हळदीकुंकू व वायने वाटणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अनध्याय असतो आणि रात्री गायन, वादन, दीपोत्सव इ. कार्यक्रम असतात.
■ वर्षभर सूर्योपासनेचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी, मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी, मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादींप्रकारे व्रतभेद सांगितला जातो.
■ या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान, असे काहीचे मत आहे. सर्व रोगांतून व पापांतून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्र, धन इत्यादीची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते.
