उत्पत्ती :– भारतीय संस्कृती ही जगात सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असल्याचे मानले जाते. जगात इतर ठिकाणी मानव जेव्हा गुहांमध्ये राहून शिकार करून, कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करीत होता, तेव्हा भारतात सुनियोजित नगरे उभारली जात होती. समाजव्यवस्था आदर्शवत होती. उत्तम प्रकारे व्यापार केला जात होता. इ.स.पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व २००० पर्यंत हा या संस्कृतीचा काळ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी आपल्या व्यापाराच्या सोयीसाठी कराची ते लाहोर असे लोहमार्गाचे काम हाती घेतले. हे काम चालू असताना खोदकाम करताना अचानक काही जुने विटाचे बांधकाम नजरेस पडले. ह्या जागेचे पुरातत्त्व महत्त्व ओळखून सन १९२१ साली भारतीय पुरातत्त्व संशोधक दयाराम सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली हडप्पा येथे उत्खनन करण्यात आले. उत्खनन करताना एक संपूर्ण नगरच तिथे कधी काळी अस्तित्वात होते असे लक्षात आले. तसेच पुढील वर्षी सन १९२२ साली राखलदास बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहेंजोदडो येथे उत्खनन करण्यात येत • असताना हडप्पासारखेच इथेही नगर अस्तित्वात होते असे लक्षात आले. सदर जागांमध्ये उत्खनन करताना मातीची भांडी, कांस्य धातूच्या मूर्ती, दागिने, मातीची खेळणी, विविधरंगी खडे, तत्कालीन चलन, चांदी अशा अनेक वस्तू उत्खननातून मिळाल्या. विशेष म्हणजे एकही लोखंडी वस्तू इथे उत्खनन करताना आढळून आलेली नाही. फक्त कांस्य धातूचा व दगडी अवजारांचा वापर या लोकांना माहीत असल्यामुळे त्यांच्या संस्कृतीस ‘कांस्यपाषाण संस्कृती’ असे म्हटले जाते. हे अवशेष सर्वप्रथम पाकिस्तानमधील हडप्पा येथे मोठ्या प्रमाणात सापडले. त्यामुळे या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असेदेखील नाव देण्यात आले.

स्थापत्य रचना :- नगरांच्या भोवती संरक्षणासाठी तटबंदी बांधलेली असे. नगरांमध्ये आखीव रेखीव व प्रशस्त रस्ते होते. सर्व रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते. सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे होती. ह्या सार्वजनिक स्नानगृहाचा आकार १२*७ मीटर असा मोठा होता. वस्त्र बदलण्यासाठी स्नानगृहांच्या समोरच खोल्या बांधलेल्या आढळून आल्या. दुमजली घरेदेखील होती. तटबंदी व घर बांधण्यासाठी पक्क्या भाजलेल्या विटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसून येतो. ह्या विटा आजही चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. नगर निर्माणासाठी भाजलेल्या पक्क्या विटांचा वापर हे हडप्पा संस्कृतीचे एक मूलभूत वैशिष्ठ्य मानले जाते. सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. धान्य साठवण्यासाठी कोठारे बनविण्यात आलेली होती. या नगरांची भव्यता लक्षात घेता काही नगरांमध्ये पन्नास हजारांच्या आसपास लोक वास्तव्यास होते, असे अनुमान काढता येते.
सिंधू संस्कृतीची भव्यता :- आतापर्यंत सुमारे चौदाशे ठिकाणी उत्खनन करून पुरातत्व शास्त्रज्ञांनी एका महान संस्कृतीचा शोध लावला आहे यावरून असे लक्षात येते की समकालीन संस्कृतींमध्ये आकारमानाच्या दृष्टीने हडप्पा संस्कृती ही जगातील सर्वात मोठ्या संस्कृतींपैकी एक होती हे निश्चितच लक्षात येते. उत्खनन केलेली मोठी नगरे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असल्याने सध्या या संस्कृतीस ‘सिंधू संस्कृती’ असे नाव दिलेले आहे. सिंधू संस्कृतीमधील काही प्रमुख ठिकाणं जरी पाकिस्तानमध्ये असली तरी पाकिस्तान हा स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा भाग असल्याने भारताच्या सीमा या अगदी आजच्या अफगाणिस्तान, इराणपर्यंत भिडलेल्या होत्या. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना या आज दुसऱ्या देशांमध्ये गेलेल्या ठिकाणांचा अभ्यास करणेदेखील क्रमप्राप्त ठरते. नुकतेच पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इथे मिळालेल्या वस्तूंचा आधुनिक ‘कार्बन-१४ डेटिंग’ या पद्धतीने वयोमान काढले असता ते सुमारे इसवी सन पूर्व ५६०० पर्यंत मागे असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे हडप्पा पूर्वकालीन सभ्यतासुद्धा नांदत होती, असे लक्षात येते. परंतु मिळालेले पुरावे अगदीच तुटपुंजे असल्यामुळे त्या कालाविषयी खात्रीलायकरित्या भाष्य करता येत नाही. मात्र ह्यावरून सिंधू संस्कृती ही एक प्राचीन संस्कृती असल्याचे लक्षात येते. एक चिनी सभ्यता
सोडली तर एकही संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीच्या तुलनेत एवढी प्राचीन नाही. सुमेरियन, इनका, मायन, मिस्त्र, मेसोपोटेमिया अशा अनेक महान संस्कृती जगामध्ये होऊन गेल्या परंतु कालौघात नष्टही झाल्या. परंतु सनातन धर्माच्या रूपात आजही आपली भारतीय संस्कृती आपले अस्तित्व टिकवून आहे यातच तिचे मोठेपण दिसून येते.
समाज जीवन :- सिंधू संस्कृतीतील लोक शेती करत होते. शेतीमधे गहू, जवस, तांदूळ ही प्रमुख पिके होती. तसेच हे लोक पशुपालकदेखील होते.
मोहेंजोदडो येथे उत्खननामध्ये एका पुजाऱ्याची अत्यंत सुस्थितीतील मूर्ती सापडली. सध्या ही मूर्ती लाहोर येथील वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. या मूर्तीवरून असे अनुमान काढता येते की त्याकाळी पौराहित्य करणारा एक वर्ग असावा. तसेच नृत्य करणाऱ्या मुलींच्या कांस्य धातूच्या भरपूर अशा मूर्ती आढळून आल्या. या नर्तिकांनी भरपूर दागदागिने अंगावर घातल्याचे दिसून येते. राजस्थानातील कालीबंगा येथे फुटलेल्या काळ्या काचांचे बांगड्यांचे तुकडे आढळून आले. काली म्हणजे काळ्या अणि बंगा म्हणजे बांगड्या अशी त्या कालीबंगा शब्दाची उत्पत्ती आहे. यावरून असे अनुमान काढता येते की तत्कालीन समाज व्यवस्था मातृसत्ताक असावी किंवा स्त्रियांना सामाजिक जीवनात उच्च स्थान तरी असावे.
अर्थकारण :- तेव्हा खुश्कीच्या मार्गाबरोबरच समुद्रामार्गे पश्चिम एशिया अणि सुदूर आफ्रिकेपर्यंत व्यापार चालत होता. गुजरातमधील लोथल इथे प्रचंड गोदीचे अवशेष सापडले आहेत. उत्खननात सापडलेल्या अनेक मुद्रांवर जहाजाचे चित्र आहे. अशा अनेक गोष्टी समुद्रामार्गे व्यापार चालत असल्याची साक्ष पटवण्यास पुरेशा आहेत. व्यापारामध्ये मुख्यत्वे मातीची भांडी, मोती, दागिने, रंगीत खडे, धान्य, मीठ, कांस्य धातूच्या वस्तूंचा समावेश होता. चलन विनिमयासाठी कांस्य धातूच्या अणि दगडी मुद्रा वापरल्या जात. ह्या मुद्रांवर एका बाजूला बैल, हत्ती, एकच शिंग असलेला रहस्यमय प्राणी अशा प्रतिमा छापलेल्या आहे. तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन चित्रलिपीमधील काही अक्षरे छापलेली आहेत. ही चित्रलिपी आजही उलगडण्यात आपण अयशस्वी आहोत. या चित्रलिपीचा उलगडा झाल्यास तत्कालीन इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणात प्रकाश पडण्यास मदत होईल.

धर्म :- उत्खननामध्ये एकाही ठिकाणी मंदिराचे अवशेष आढळून आलेले नाहीत. त्यामुळे तत्कालीन संस्कृती ही मूर्तीपूजक नसून निसर्गपूजक वाटते.
कला :- उत्खननात मुलींच्या ज्या मूर्ती सापडल्या आहे त्या जणू काही नृत्य करत आहेत, असाच भास होतो. त्यामुळे नृत्यकला तत्कालीन
समाजाचा भाग असावा असे वाटते. विविध मातीची भांडी कलात्मकरित्या बनवलेली दिसतात. ह्या मातीच्या भांड्यावर चित्रेदेखील काढलेली दिसतात.
सिंधू संस्कृतीचा -हास :– सिंधू संस्कृतीच्या झालेल्या ऱ्हासाविषयी अनेक मतप्रवाह प्रचलित आहेत.
१) पूर :– मोहेंजोदडोसारखी मोठी नगरे सिंधू नदीच्या काठावर होती. सतत येणाऱ्या पुरामुळे ही नगरे उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी असलेल्या नगरांवर नगर बांधल्याच्या खुणा ह्याची खात्री पटवतात. एखाद्या शतकात पुरामुळे एखादे नगर गाडले गेल्यावर त्याच जागेवर पुन्हा नवीन नगर वसवले जायचे.
२) आर्यांची आक्रमणे :- मध्य आशियातील स्टेपच्या गवताळ प्रदेशातून आर्य लोक भारतात आले होते. सिंधू संस्कृतीचा अखेरचा काळ आणि आर्यांच्या आगमनाचा काळ हा जवळपास सारखाच आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या आर्यांनी सिंधू संस्कृतीच्या नगरांवर हल्ले करून सिंधू संस्कृती नष्ट केली असा एक मतप्रवाह आहे.
३) अवर्षण :– मान्सूनच्या लहरी हवामानाचा फटका किंवा सतत काही वर्षे असलेल्या अवर्षणाने सिंधू संस्कृतीच्या लोकांना नाईलाजाने स्थलांतर करावे लागले. सिंधू संस्कृतीमधील सहाशेच्या वर ठिकाणे ही राजस्थान, हरियाणामध्ये सापडली आहेत. ह्याच भागामध्ये कधी काळी सरस्वती नदीचे खोरे होते, परंतु कालांतराने काही भौगोलिक कारणामुळे ही नदी मृतवत झाली. त्यामुळे ही नगरे ओस पडली. बारमाही गंगेचे खोरे सोयीस्कर वाटल्याने
हे लोक गंगेच्या खोऱ्याकडे वळले.
हडप्पा संस्कृती की सिंधू सरस्वती संस्कृती:- सरस्वती नदीचा उल्लेख ऋग्वेद आपल्या पुराणांमध्येही आढळतो. आजही गंगा यमुना ह्या नद्याच्या बरोबरीने सरस्वती नदीचे नाव आदराने घेतले जाते. अनेकदा सरस्वती नदी ही काल्पनिक असल्याचे बोलले जाते, परंतु पुराणांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या भागाचा शास्त्रीय अभ्यास व उपग्रहाद्वारे अभ्यास केला असता तिथे खरोखर पूर्वी नदीचे खोरे असल्याचे सिद्ध झालेले आहे. परंतु काही भूगर्भीय हालचाल होऊन नदीच्या खोऱ्याचा भाग उचलला गेला. त्यामुळे नदीचे पाणी यमुनेच्या खोऱ्याकडे वळले. पर्यायाने नदीमध्ये पाणीच नसल्याने लोकांना नगरे सोडून जावी लागली. मानवी संस्कृतींचा अभ्यास करताना नेहमी लक्षात येते की मानवी संस्कृती या नेहमीच नदीच्या आसपास किंवा तिच्या खोऱ्यामध्ये उदयास आलेल्या दिसतात. परंतु राजस्थानसारख्या अवर्षणग्रस्त भागांमध्ये जिथे पाणी नाही तरी तिथे जुन्या नगरांचे अवशेष आढळून येणे हे लक्षात येत नाही. यावरून असा अनुमान काढता येतो की कधीकाळी तिथे पाणी होते, परंतु अचानक उद्भवलेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे ही नगरे ओस पडली. ह्या संस्कृतीमधील जास्तीत जास्त ठिकाणे ही सरस्वती नदीच्या खोऱ्यात आढळून आली असल्यामुळे या संस्कृतीस ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ असे नाव अधिक संयुक्तिक वाटते. नुकतेच NCERT ने आपल्या सहावीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात ह्या संस्कृतीचे पूर्वीचे हडप्पा संस्कृती है नाव हटवून ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ असे नवीन नामकरण केले आहे. हरियाणा सरकारच्या भाजपा सरकारने मागच्या वर्षीच आपल्या शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा बदल केलेला होता. त्यामुळे एनसीईआरटीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाकडे सनातन धर्माचे सरस्वती नदीच्या आडून उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु वरील सर्व गोष्टींचा केलेला उहापोह व शास्त्रीय अभ्यास नामांतरयोग्य असल्याचा निर्वाळा देतो.
शेवटी एखाद्या संस्कृतीचे नाव काहीही असले तरी तिचे महत्त्व कमी होत नाही. त्या संस्कृतीने समाज म्हणून दिलेली जगायची शाश्वत मूल्ये, निसर्गाचा आदर करायची वृत्ती आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा हीच त्या संस्कृतीची देणं आहे हेच खरे.
नुकत्याच ‘एनसीईआरटी’ ह्या संस्थेने आपल्या सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हडप्पा संस्कृतीचे ‘सिंधू सरस्वती संस्कृती’ असे नामकरण केलेले आहे. त्यामुळे सरस्वती नदीच्या आडून सनातन धर्माचे उदात्तीकरण तर होत नाही ना अशी अनेकांना शंका आहे. त्यामुळे ही सिंधू संस्कृती म्हणजे नेमकी कोणती संस्कृती आहे ह्याचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त ठरते.
दीपक कुटे, लेखक पुरातन संस्कृतीचे अभ्यासक आहेत