वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
हृदयविकाराचा झटका येण्यामागची कारणे आपल्या सर्वांना माहीत आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रोलची वाढलेली पातळी, धूम्रपान, स्थूलपणा आदी कारणे ही हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत असल्याचे तपासण्यांमधून आढळले आहे, परंतु हृदयविकाराचा झटका येण्यामागे ताणतणाव हेदेखील एक कारण असून अनेकदा समोर येत नाही किंवा दुर्लक्षित राहते.
ताण का वाढतो? झोप अपुरी होणे किंवा एखादा आजार असणे अशा शारीरिक कारणांमुळे ताण वाढतो. तसेच पैशाची चिंता, जवळच्या व्यक्ती गमावणे अशा अनेक भावनिक कारणांमुळेही ताण वाढतो. दैनंदिन आयुष्यातला कामाचा ताण, इतर अडचणीमुळेही ताण येतो. साथीच्या काळात सामाजिक-भावनिक अंतर, आजाराची लागण होण्याची भीती, जवळची व्यक्ती गमावणे, दैनंदिन गरजा भागवण्याची चिंतेमुळे अनेक जीव तणावातून जात आहे.
ताणाचा शरीरावर होणारा परिणाम ताण निर्माण झाल्यानंतर शरीर आपल्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करते, परंतु हा ताण सतत राहिला तर मात्र शरीरावर याचे परिणाम दिसून येतात. ताण निर्माण झाल्यानंतर शरीरामध्ये कॉर्टिसोल हार्मोन्स स्रवतात. अभ्यासानुसार सातत्याने वाढणाऱ्या कॉर्टिसोलमुळे रक्तातील कोलेस्ट्रोल, ट्रायगिल्सराईड, साखर आणि रक्तदाबामध्ये वाढ होते आणि हृदयविकार होण्याचा धोका निर्माण होतो. ताणामुळे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा संभव असतो. त्याचप्रमाणे तणाव वाढल्यामुळे शरीरात स्रवणाऱ्या कॅटेकोलामाइन्समुळे रक्तदाब वाढते. यामुळे हृदयविकार होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. दीर्घकालीन ताणामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. रक्त अधिक घट्ट होते आणि स्ट्रोक वा हृदयविकाराचा धोका वाढतो.
ताणामुळे शरीरामध्ये निर्माण होणारी लक्षणे वेदना, अंग ठणकणे, ऊर्जा व झोप कमी होणे, चिंता, राग आणि नैराश्याची भावना असणे, अधीरता असणे, विस्मरण.. ही ताणामुळे लक्षणे निर्माण होऊ शकतात. तणाव निर्माण करणारी परिस्थिती ओळखणे कठीण असले तरी या तणावपूर्ण परिस्थितीवरील मानसिक आणि शारीरिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे असते.
तणाव व्यवस्थापनासाठी खालील गोष्टींची मदत घेता येईल.
पुरेसा व्यायाम करणे –
शरीराला तणावमुक्त करण्यासाठी व्यायाम फायदेशीर आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसभरात किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे ताणाची पातळी कमी होण्यास मदत होते.
आधारस्तंभ उभे करणे
काही अभ्यासानुसार, तुमच्या जवळपास आधार देणाऱ्या व्यक्ती, नातेवाईक किंवा संस्था असतील तर ताण कमी होण्यास मदत होते. या व्यक्ती कुटुंबातल्या किंवा ऑफिसमधले सहकारी किंवा तुम्ही जोडून घेतलेल्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या असू शकता. तसेच ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, ज्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येऊ शकतील अशा व्यक्तींचे नेटवर्क तयार करणे गरजेचे आहे.
नैराश्य किंवा अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत घेणे
नैराश्य आणि अस्वस्थता सातत्याने येत असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. अस्वस्थता कमी करण्यासाठी योग, ध्यानधारणा, चालणे अशा विविध उपक्रमांची मदत घ्यावी.
कामामुळे निर्माण होणारा ताण कमी करणे
कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे निर्माण होणारा ताण हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकतो. कामाच्या जबाबदाऱ्या कमी करणे शक्य नसेल तर त्यातून काही काळ बाहेर पडण्याचा किंवा त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. घेऊन नियंत्रण ठेवणे शक्य आहे. जीवनातल्या तणावामुळे हृदयविकाराचा धोका वाढतोय असे जर तुम्हाला जाणवले तर वेळीच डॉक्टरांशी चर्चा करा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.
डॉ. ब्रजेश कुमार कुंवर (लेखक नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये वरिष्ठहृदयविकारतज्ज्ञ आहेत)