वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
वयोमानाने विसराळूपणा येतोच, असे गृहित धरले जाते. त्यामुळे अल्झायमर या आजाराकडे बहुतांश लोकांचे दुर्लक्ष होते. भारतात आजही ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. अल्झायमर अर्थात् स्मृतिभ्रंश हा आजार वयानुसार वाढत जातो. मात्र, वेळीच उपचार केल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते, असे तज्ज्ञमंडळी सांगतात.
२१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. अल्झायमरमध्ये प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीला रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरील नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू न्हासामुळे सर्व हालचाली मंदावतात आणि रुग्ण बिछान्यावर पडून राहतो.
सध्या जगभरात माणसाचे सरासरी आयुर्मान वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे वेळीच लक्ष न दिल्याने ८० वर्षांवरील ५० टक्क्यांहन अधिक वृद्ध अल्जायमरग्रस्त असल्याचे आढळून येतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात अल्झायमर व संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी झाली असून, संख्या प्रत्येक २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात साडेचार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. हा आजार तिसाव्या वर्षीही होऊ शकतो. हे प्रमाण फारच कमी आहे. मात्र, एरवी वयाची साठी ओलांडल्यानंतर विस्मृतीचा प्रकार वारंवार घडत असेल तर, ते काळजी करण्याचे आणि त्वरित उपचार घेण्याचे कारण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात.