वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
आयुर्वेद आरोग्य टिकवण्यासाठी कायम आग्रही आहे. रोग होऊच न देण्यासाठी प्रयत्न करणे कधीही उत्तमच… नाही का? त्यासाठीच आयुर्वेदात प्रत्येक बाबतीत कोणकोण नियम स्वास्थ्य रक्षक ठरतात ते पालन करण्याचे निर्देश आहेत. याने स्वस्थ्यारक्षण, रोगनाश, दीर्घ-सखी आयुष्य प्राप्ती होते. आज आपण रात्री जागरण यासंदर्भात स्वास्थ्य रक्षणाचे नियम जाणून घेऊ.
दिवस जसा सकाळ-दुपार-सायंकाळ असा तीन भागात आपण विभागतो तसेच रात्रसुद्धा तीन भागात विभागून त्या त्या भागात काय काय घडते आणि म्हणून काय काय करावे ते आयुर्वेदाने समजून आपल्यासमोर मांडले आहे
रात्रीच्या पहिल्या प्रहरात वाताचा जोर अधिक असतो. मनास चांचल्य असते. मनावर ताबा मिळवण्यासाठी अशावेळी नामस्मरण आदी क्रिया उपयोगी ठरतात. सामान्यतः कुणीही अशावेळी अभ्यास करणे हे चूक ठरते. (एखाद्या चुकीच्या गोष्टीची सवय लावून घेणे आणि आपली चर्या बदलणे याने काही गोष्टी शक्य होतात, पण लांबपर्यंत तशीच चर्या ठेवल्याने होणारे नुकसान टाळता येणे अवघड असते. असो.). वातावर विनाऔषध उत्तम उपाय म्हणजे झोपी जाणे. कारण मनाचा इंद्रियांशी असलेला संबंध तुटल्याशिवाय झोप येतच नाही. मनावर आणि इंद्रियांवर वाताचा ताबा असतो. म्हणून रात्री नामस्मरण करून लवकर झोपी जावे असे पूर्वीपासून आपल्या परंपरेत एक भाग म्हणून बसवून दिले आहे. याने स्वास्थ्य रक्षण आपोआपच घडते.
रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात पित्ताचा जोर असतो. अशावेळी गाढनिद्रा असेल तर पित्ताचे सहज शमन होते. जागरण असेल तर पित्ताचा जोरही सहज आणि पटकन वाढतो. हृदयविकाराचे झटके येऊन मृत्यू होणे वगैरे आकस्मिक प्रकार हे रात्रीच्या याच काळात जास्त होतात. जिथे रुग्ण वाचायची शक्यता आपोआपच कमी होते. अशावेळी हृदयविकाराच्या तीव्र वेगातसुद्धा आम्लपित्ताचा त्रास असल्यासारखी लक्षणे उत्पन्न होतात आणि त्यामुळेच गल्लत होते. हे टाळण्यासाठी लवकर झोपावे, म्हणजे पित्ताचा रात्रीतील काल सुरू होईपर्यंत गाढ निद्रावस्थेत असणे आपोआप घडते आणि स्वास्थ्य रक्षणही आपोआपच घडते.
रात्रीचा तिसरा म्हणजे शेवटचा भाग म्हणजेच पहाटेचा भाग. यावेळी नैसर्गिकरीत्या कफाचा जोर असतो. अशावेळी म्हणूनच साखर झोप/जास्त झोप येणे घडते, पण कफाच्या काळात झोपून राहिले तर पटकन कफाचे आजार होतात. म्हणूनच आपल्याकडे ब्राह्म मुहूर्तावर उठावे अशी पद्धत आहे. कफाच्या काळात उठून व्यायम, अभ्यास केला तर सर्वात जास्त फायदा होतो आणि कफही वाढत नाही. त्यामुळे त्याचे रोग टाळले जातात आणि स्वास्थ्याचे आपोआपच रक्षणही होते.
यावरून असे लक्षात येते की, लवकर उठावे आणि लवकर झोपावे याने माणूस निरोगी राहण्यास मदत होते. आजकालच्या पिढीला लवकर झोपणे आणि लवकर उठणे दोन्हीही माहीत नाहीये आणि लहान वयातच अनेक आजार होत चालले आहेत. आजच्या पिढीला प्रत्येक गोष्टीचे कारण समजणेही हवे असते. त्याशिवाय फक्त प्रथा म्हणून ते जुन्या परंपरा मान्य करत नाहीत आणि तसे वागतही नाहीत. म्हणूनच कारण स्पष्ट करत वरील विवेचन केले आहेत, जेणेकरून नवीन पिढीतील तरुणांना त्यामागील भूमिका समजेल आणि तसे वागण्यास ते प्रवृत्तही होतील अशी आशा आहे.
-वैद्य सत्यव्रत नानल