केरळच्या उत्तरी समुद्री भागातील मालाबार हे निसर्गरम्य क्षेत्र आहे. पर आज तिथे पर्यटकांची गर्दी असते ती तेथील नैसर्गिक संपदा अनुभवण्यासाठी; परंतु १०० वर्षांपूर्वी तेथील भीषण वास्तव आजही काळाच्या उदरात दडलेले आहे. तेथील रक्तलांछित मातीतून स्त्रियांच्या भयभीत आवाजातील किंकाळ्या कोणाला ऐकू येत नाही. मुलांचे रुदन ऐकू येत नाही. तेथील रक्तरंजित इतिहासाला तथाकथित सेक्युलर मंडळींनी आपल्या समोर कधीच खरे प्रकट होऊ दिले नाही. मध्यंतरी ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट (भयपट) खूप गाजला. अशा बऱ्याच चित्रपटांच्या कहाण्या अजन डबाबंद अवस्थेत आहेत. त्यांची रीळ अजूनही उलगडलेली नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास कितीतरी कांड आहेत; ज्यांचे वास्तव समोरच आलेले नाही. येणाऱ्या नवीन पिढीला हे दाहक सत्य कधीच कळणार नाही. जसे, मोपला कांड, डायरेक्ट अॅक्शन डे कांड, ज्याला कलकत्ता कांडही म्हणता येईल. हिंदू महिला बलात्कार नोआखाली कांड. गांधी वधानंतर झालेले ब्राह्मण नरसंहार कांड, कारसेवक नरसंहार अयोध्या कांड व गजरातचे गोधरा अग्निकांड हे सर्व झालेले कांड सोयीस्करपणे लपविल्या गेलेत; ज्यांच्या किंकाळ्यांना, आक्रोशांना इतिहासाचे पष्ठही लाभले नाही. ही खरी शोकांतिका!
यातील मोपला कांड; ज्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याचे सत्य स्वरूप सामोरे यावे म्हणून हा लेखन प्रपंच.
या हत्याकांडाचे सूत्रधार म्हणजे मोपला किंवा मोप्पिला. हे मोपले कोण होते, कशा मनोवृत्तीचे होते, हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. व्यापाराच्या निमित्ताने मालाबारमध्ये आलेले अरेबियन्स नंतर तेथेच स्थायिक झाले व हिंदू स्त्रियांशी लग्न करून तेथेच आपले जीवनयापन करू लागले. यांची मोपला म्हणजे वेद पद सं (जावई) म्हणून ओळख निर्माण झाली. या जावयांनी नंतर जो खिलाफत चळवळीच्या नावाखाली हैदोस घातला, त्याला हिंदू जनमानस कधीच क्षमा करणार नाही. (महात्मा गांधी, शौकत अली, मुहम्मद अली हे तुर्कस्तानातील खलिफाचे पदभरण पुनश्च करणाऱ्या खिलाफत चळवळीत सहभागी झाले होते हे येथे विशेष.) खिलाफत चळवळीच्या आड मोपल्यांनी जो नंगा नाच घातला त्यावर महात्मा गांधीजींचे म्हणणे होते की, मोपला धार्मिक कृत्य व धर्माप्रमाणे वागण्यासाठी फार दक्ष(?) आहेत, हे येथे अजून विशेष.
२० ऑगस्ट १९२१ मध्ये मालाबार (केरळ) येथे अत्यंत क्रूरपणे हिंदूंना लक्ष्य करून मारले गेले. हाल हाल करून मारून दहशत निर्माण केली गेली. मालाबारच्या निसर्गरम्य परिसरात मोपल्यांनी खिलाफत चळवळीच्या आड आपले नापाक मनसुबे रचले व निःशस्त्र शांतिप्रिय हिंदूंवर अनन्वित अत्याचारांची मालिकाच सुरू झाली; ज्यात हिंदू देवीदेवतांची विटंबना, महिलांच्या अब्रूवर घाला, तलवारीच्या धाकावर धर्मपरिवर्तन, एवढेच नव्हे तर ज्या कट्टर हिंदूंनी आपला पूर्वापार चालत आलेला धर्म सोडला नाही, त्यांना त्यांच्या बायको-मुलांसमोर कापून विहिरीत फेकले. रक्तमांसाचा खच पडला. तथाकथित सेक्युलर मंडळींनी या सर्व घृणित व अन्यायग्रस्त घटनेला ‘मोपला विद्रोह’ हे नाव दिले; ज्याने सर्वांची दिशाभूल केली गेली.
आजही प्रशासकीय सेवेतील अभ्यासक्रमात ‘मोपला विद्रोह’ हा शब्द आहे, हे येथे उल्लेखनीय. ‘विद्रोह म्हणजे कुठल्यातरी अन्यायाविरुद्ध आंदोलन करणे, परंतु येथे तसे काही नव्हते. १०० वर्षांनंतर तरी ‘मोपला विद्रोह’ हा शब्द बदलावा, ही माफक अपेक्षा.
तथ्य तर्क व पुराव्यासहित मोपला कांडचे विश्लेषण व्हायला हवे हे निश्चित. सुप्रसिद्ध वामपंथी इतिहास लेखनकार सुमित सरकार यांनी आपल्या ‘आधुनिक भारत’ या पुस्तकामध्ये या घटनेची माहिती तर दिलीच; परंतु त्यांच्यानुसार १८८५ व १८९६ मध्येदेखील मोपल्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती; ज्यात हिंदू जमीनदारांची संपत्ती लुटली; हिंदू मंदिरांची तोडफोड केली, असा उल्लेख आढळतो. याला भारताचा प्रथम ‘जिहादी आतंकवाद’ म्हणायला हरकत नाही. कारण हे मोपले पोलिस येताच सामूहिक आत्महत्या करीत असत. त्यांना हेच शिकवले गेले असायचे की, शहीद झाल्यावर सरळ जन्नतमधे प्रवेश करू शकतो! गंमत अशी की. १८८५ च्या जिहादी मानसिकतेत व आजच्या परिस्थितीत काही बदल झालेले नाही, हे आपण बघतोच. मोपला कांडात मोपल्यांनी सर्वप्रथम पोलिस स्टेशन लुटले. पोलिसांची शस्त्रे हिसकावली. तेथील ब्रिटिशांनाही मारले व नंतर त्यांची वक्रदृष्टी शांत सहिष्णू हिंदू समुदायांवर गेली. त्यांनी खिलाफत चळवळीच्या नावाखाली ५० हजार हिंदंचे तलवारीच्या धाकात धर्मपरिवर्तन केले. ३० हजार हिंदूंना क्रूरपणे मारले. हजारो स्त्रियांची त्यांच्या मुलाबाळांसमोर अब्रू लुटली गेली.
मोपला कांडचे विदारक सत्य मांडले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात; ज्याचे नाव ‘पाकिस्तान अथवा भारत विभाजन.’ या पुस्तकाच्या पान नं. १७१ वर स्पष्ट लिहिलंय की, मोपला हत्याकांड सुनियोजित कटकारस्थान होते. त्यात जाणूनबुजून हिंदू समुदायाच्या आस्थांवर आघात तसेच माय-बहिणींची अब्रू लुटल्या गेली, हिंदूंची कत्तल केली गेली. अनेक अनन्वित अत्याचारांचा यात उल्लेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन कोणीही असत्य मानू शकत नाही. ते लेखन शतप्रतिशत सत्य आहे, हे निश्चित.
मोपला कांडची दर्दनाक कहाणी तत्कालीन स्वातंत्र्य सेनानी व माजी काँग्रेस अध्यक्ष अॅनी बेझंट यांनी स्वत: मालाबार भेटीच्या वेळेस अनुभवली. २९ नोव्हेंबर १९२१ च्या न्यू इंडियाच्या अंकात त्यांनी ‘मोपला कांड’वर एक लेख लिहन महात्मा गांधी व त्यांचे दोन बंधू(?) मुहम्मद अली, शौकत अलींच्या वक्तव्यांची व खिलाफत आंदोलनाची टर उडविली गेली. अॅनी बेझंट यांना भारतीय महिलांबाबत मोठी अनुकंपा असायची. त्यात मोपला कांडमध्ये भारतीय स्त्रियांची विटंबना त्यांना सहन झाली नाही. त्यांच्या लेखात स्पष्ट लिहलंय की…
१) भारतीय घरंदाज स्त्रियांना फाटलेले कपडे घालून घरदार व सर्व संपत्ती सोडून पळावे लागले.
२) सात महिन्यांच्या गर्भवती स्त्रीची पोट चिरून हत्या केली गेली. प्रेताच्या पोटातून अजन्मे अर्भक दिसत होते.
३) एका आईकडून सहा महिन्यांचे बाळ घेऊन तिच्यासमोर त्याचे दोन उभे तुकडे केले.
४) नायर परिवाराच्या एका प्रतिष्ठित महिलेला मुलाबाळांसमोर, पतीसमोर विवस्त्र केले व परिवाराने शरमेने डोळे झाकले असता तलवारीच्या टोकांनी त्यांचे डोळे जबरदस्तीने उघडायला लावले व त्यानंतर त्या स्त्रीवर सर्वांदेखत सामूहिक बलात्कार करण्यात आला. इतके घृणित कृत्य लिहितानादेखील हात कापत आहेत. ही वस्तुस्थिती.
५) सन्मानित हिंदू पुरुषांची नग्न धिंड काढली गेली; जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे संपून जाईल.
नितांबुरखी नानी हिनेदेखील मोपला कांडच्या सत्यतेबद्दल लॉर्ड रीडींग तत्कालीन व्हाईसरॉय यांच्या पत्नीला लेडी रीडींग यांना पत्र लिहन हिंदू स्त्रिया ज्या घाबरून जंगलात आश्रय घेत्या झाल्या होत्या, त्यांची आपबीती लिहन पाठविली.या पत्राचादेखील ऐतिहासिक दस्तावेज मिळतो.
वरील सर्व घृणित हत्याकांड अली मुसलीयार व मरीयम कुन्नन कुजा हाजी या पाशवी मानवांच्या नेतृत्वात झाले. आजही केरळचे सरकार यांना स्वातंत्र्य सेनानी(?) घोषित करते, हे अजूनच क्लेशकारक. या घृणित आदर्शा(?) कडे बघून केरळची नवतरुण मुस्लिम मुले जिहादी संघटमात सहभागी होतात.
त्यावेळेसचे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांनी चक्क मोपलांचे समर्थन केले होते, हे येथे उल्लेखनीय.
काँग्रेस अधिवेशनामध्ये (अहमदाबाद) मोपला कांडचा निंदाजनक प्रस्ताव आणला तेव्हा त्यावेळेसचे मुस्लिम नेता हसरत मुहानी यांनी म्हटले की, मोपत्यात शांती राहिली नसून तेथे आता मुसलमानांनी दारूल अमनचा निर्माण केला आहे व त्यासाठी हिंदूंनी आपले जीव वाचवण्यासाठी जर धर्मपरिवर्तन केले असेल, तर त्याला बळजबरीने धर्मपरिवर्तन म्हणता येणार नाही, हे महाशय मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते व पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही ते भारतातच राहिले. असे हे पाशवी मोपला कांड समजून घेण्यास व त्यातील सत्यता जगापुढे आणण्यासाठी नवीन पिढीने अग्रेसर व्हायला हवे. भविष्यात भारतात पुनश्च मोपला हत्याकांड होऊ नये याची खबरदारी घ्यावी. १०० वर्षांपूर्वीचा सत्य इतिहास हेच सांगतोय्….
प्रा. ममता चिंचवडकर