वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटनेही आता कात टाकायचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही नवे नियम १ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतींत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चेंडूला थुकी लावून तो चमकावणे कायमचे नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे. शिवाय मैदानात क्षेत्ररक्षक अथवा गोलंदाजाने गैरवर्तन केल्यास फलंदाजाला ५ बोनस धावा दिल्या जाणार आहेत. ज्या मांकडिंगच्या प्रकाराला अखिलाडूवृत्ती म्हणून पहिले जात होतो तो प्रकार आता अधिकृत धावबाद मानला जाणार आहे. शिवाय फलंदाज बाद झाल्यास पुढचा फलंदाज २ मिनिटांत खेळपट्टीवर आला नाही तर त्याला ‘टाइम आऊट’ म्हणून बाद मानले जाणार आहे. आयसीसीचे हे नवे नियम यंदाच्या टी-२० विश्वचषकापासून लागू केले जाणार आहेत. या नियमांना सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी चीफ एक्झिक्युटिव्स कमिटीने (सीईसी) मान्यता दिली आहे. त्यामुळे क्रिकेटमधील हे नवीन नियम १ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अमलात आणले जाणार आहेत.
फलंदाज टाइम आऊट
आता नव्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय लढतींमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल, तर टी-२० फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त ९० सेकंद असेल. याआधी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ही वेळ ३ मिनिटांची असायची आणि जेव्हा फलंदाज वेळेत फलंदाजीसाठी येत नसे त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार ‘टाइम आऊट’ घेत असे. २ मिनिटांत फलंदाज खेळपट्टीवर आला नाही तर त्याला ‘टाइम आऊट’ म्हणून बाद मानले जाणार आहे. सर्वात प्रथम १९१९ मध्ये क्रिकेटमध्ये प्रथमच टाऊनटन्स काऊंटी ग्राऊंडवर फलंदाज हेरॉल्ड हेगेट यांना या नियमानुसार आऊट देण्यात आले होते.१९८० पासून या नियमाला आयसीसी नियमावलीत सामील करण्यात आले होते.
वन डे मध्येही स्लो ओव्हर रेटचा नियम
स्लो ओव्हर रेटचा नियम जानेवारी २०२२ मध्ये टी२० फॉरमॅटमध्ये लागू करण्यात आला होता, ज्यामध्यो स्लो ओव्हर रेटसाठी संघांना दंड आकारण्यात आला होता. आता हा नियम वन डेमध्येही लागू होणार आहे.
‘मांकडिंग आता ‘धावबाद‘
पूर्वी गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी हात वर करण्याच्या आधी नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रिझ सोडल्यास त्याला मांकडिंगने बाद करणे अखिलाडूवृत्तीचे मानले जायचे. पण आता आयसीसीने अशा प्रकारे गोलंदाजाने एखाद्या फलंदाजाला बाद केल्यास त्याला धावबादच मानले जाणार आहे. आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विनने गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला धावबाद केल्यावर अनेकांनी त्यावर टीका केली होती.
क्षेत्ररक्षकाने गैरवर्तन केल्यास फलंदाजाला ५ दंड
धावा मिळणार क्षेत्ररक्षणाच्या वेळी क्षेत्ररक्षकाने अथवा गोलंदाजाने जर फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणते विचित्र कृत्य केले किंवा जाणूनबुजून चुकीचे हावभाव, वर्तन केले तर दंड म्हणून फलंदाजाला ५ धावा दिल्या जातील. आधी या चेंडूला डेड बॉल म्हटले जायचे आणि फलंदाजाचा फटका रद्द केला जात असे. या नव्या नियमामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूंनी फलंदाजाबरोबर वाद घालणे अथवा त्याच्याशी गैरवर्तन केल्यास फलंदाजाला ५ दंड धावा देण्यात येतील.
चेंडूवरील थुकपट्टीला कायमचा लगाम कोरोना काळात या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून चेंडूवर थुकी लावून चमकावण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. ही बंदी आता आयसीसीने कायमची करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील नियम बदलेपर्यंत कोणताही गोलंदाज चेंडूला लाळ लावू शकणार नाही. बॉल पॉलिश न करण्याचा नियम २०२० मध्ये लागू करण्यात आला होता.