कुंभकर्णाचा ब्रह्मदेवाला वर मागताना संभ्रम झाला. त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले आणि तो 6 महिने झोपून राहायचा. हल्ली आपली मात्र निद्रा नीट होत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी आपला गोंधळ उडतो, आपण संभ्रमात राहतो. जीवनातील एक तृतियांश वेळ झोपेत जाते. ती जीवनातील अती आवश्यक गरज आहे, पण बरेच लोक निद्रेला प्राधान्य देत नाहीत.
निद्रानाश आहे, म्हणून बरीच मंडळी माझा सल्ला घ्यायला येतात. रोहन 20 वर्षांच्या निद्रानाशासाठी माझ्याकडे आला. तो आता त्याच्या पन्नाशीमध्ये आहे. कॉर्पोरेट कंपनीत कामावर असताना, कामाचा त्याला बराच ताण होता. त्यामुळे त्याला झोप येत नसत. त्याच्या एका मित्राने त्याला सल्ला दिला की, एखादी बियर घेतली की, मस्त झोप येते. तसे रोहन कधीकधी बियर घेऊन झोपत होता. त्याला सुरुवातीला मस्त झोप लागली. त्याला ते चांगले वाटू लागले, पण काही महिन्यांनी त्याची झोप अस्वस्थ झाली. झोपमोड होत होती किंवा लवकर जाग येत होती. यावर त्याच्या मित्राने परत जालिम उपाय दिला, तो म्हणजे बियर सोडून त्याने हार्ड ड्रिंक्स व्हिस्की घ्यायला पाहिजे. मग काय रोहनचे असे वेगवेगळ्या दारूच्या प्रयोगात बरीच वर्षे गेली. झोप कधी ठीक, तर कधी त्रासिक. असे बरेच वर्षे निघून गेले. झोप तर काय छान झाली नाही, पण दारूच्या व्यसनाचा आजार मात्र झाला होता. आता तो दररोज 1 ते 2 क्वार्टर दारू घेतो, तरी पण त्याला तरतरीत झोप येत नाही. आणि दारू नाही घेतले, तर त्याचे परिणाम शरीरावर होतात. झोप ही गेली आणि शरीरप्रकृतीही खालावली, अशी त्याची हालत होती. कामाचा तणाव, तर तसाच वाढत होता. आता रोहनचा निद्रानाश, ताणतणाव आणि व्यसन या सर्वांचा इलाज करावा लागणार होता.
62 वर्षांची मिसेस फर्नांडिस, त्यांना झोप येत नव्हती. ‘डॉक्टर मला कसेतरी चांगली झोप येऊ द्या. तुम्ही काहीही करा, पण झोप येणे महत्त्वाचे आहे.’ अशा विनवण्या करतच त्या माझ्यासमोर बसल्या. चांगल्या झोपेसाठी त्या कसल्याही औषधी घ्यायला तयार होत्या. मी त्यांच्या झोपेच्या तक्रारीची पूर्ण तपशील घेतला. घरातील काही अडचणीमुळे त्यांचे मन अशांत होते. त्यांच्यात उदासीनता होती. उत्साह नव्हता. गेली दोन वर्षे, ती नैराश्याच्या गर्तेत होती. भावनिक बराच त्रास होता, पण त्यांना झोप न येणे हेच मनात जास्त सलत होतं. झोप नीट आली की, सर्व बरे होईल, असा त्यांचा समज होता. त्यांना उदासीनतेचा आजार होता, त्यामुळे त्यांना झोप येत नव्हती. त्यांची उदासीनता ठीक होण्यासाठी त्यांना अंटीडिप्रेसंट औषधी दिल्या. सुरुवातीला त्यात थोड्या झोपेच्या गोळीचा अंश होता, पण 2 ते 3 महिन्यांत तो झोपेच्या गोळीचा अंश बंद केला, तरी त्यांना चांगली झोप येत होती. एक ते दीड वर्षात त्यांची डिप्रेशनची गोळी सुद्धा बंद झाली,
तरी त्यांना चांगली झोप येत होती. सुमती 50 वर्षांच्या आहेत. त्या रात्री 10 वाजता झोपतात, पण सकाळी 3 वाजता त्यांना जाग येते. त्या तशाच बेडमध्ये पडून राहतात, मग केव्हा तरी 5 किंवा 6 वाजता त्यांना झोप येते, मग त्या ८ वाजता उठतात. असाच त्यांचा नित्यक्रम गेली 5 ते 6 वर्षे झाले चालू आहे. दिवसभर मात्र त्यांना मरगळ असते. लवकर थकतात. त्यांना फ्रेश वाटत नाही. गोंधळलेल्या असतात. त्यांना डिप्रेशन किंवा चिंता नाही. मानसिक किंवा शारीरिक काहीच आजार नाही. त्यांना केवळ निद्रानाशाचा त्रास आहे. निद्रानाशाची खालील लक्षणे आहेत.
1. झोप येण्यास कठिनाई
2. मध्य रात्री जाग येत राहणे आणि नंतर झोप न येणे..
3. सकाळी खूप लवकर उठणे.
4. रात्री चांगली झोप झाली असे न वाटणे किंवा झोपले, तरी तरतरीत न वाटणे.
5. दिवसभर डोळ्यावर झोप असणे किंवा थकवा जाणवणे.
6. कामात लक्ष न लागणे किंवा आठवण शक्ती कमी होणे.
7. झोपेबद्दल दिवसभर चिंता वाटणे.
8. कामात खुळचट चुका होणे.
9. चिडचिडेपणा, चिंता किंवा उदासीनता होणे.
निद्रानाशाची बरीच कारणे आहेत. जीवनातील महत्त्वाच्या घडामोडीत तणावपूर्ण घटनेत झोप येत नाही. उदाः अचानक नौकरी जाणे, घटस्फोट, नवीन नौकरी, आर्थिक अडचण इत्यादी. शारीरिक आजारपण आणि वेदना उदाः अॅसिडिटी, पार्किनसनचा आजार, डिमेन्शिया इत्यादी. स्लीप अप्निया, रेस्टलेस लेग सिंड्रोम, असे झोपेच्या आजाराचे प्रकार. कॉफी/चहा, तंबाखू किंवा अल्कोहोल यामुळे झोपमोड होते. रात्रीचे खूप खाणे, झोपेच्या अनियमित वेळा आणि शिफ्ट वर्क ड्युटी यामुळे देखील झोपेचा त्रास होऊ शकतो. आपल्या जीवनात काही काळासाठी निद्रानाश होऊ शकतो. काही दिवस किंवा आठवडेच निद्रानाश असेल, तर सहसा ते काही तणावपूर्ण परिस्थितीमुळे होऊ शकते. ते लवकर बरे सुद्धा होते, पण निद्रानाश महिनाभर किंवा जास्त राहत असेल, तर त्याला दीर्घकालीन आजाराचे स्वरूप येते, तेव्हा त्याचा इलाज करणे महत्त्वाचे होते.
उत्तम झोपेसाठी काही खालील सवयी जोपासाव्या.
1. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा नियमित ठेवाव्यात. अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा.
2. दिवसभर सक्रिय राहावे. कार्यक्षम राहिल्याने चांगली झोप येते.
3. दिवसा सहसा वामकुक्षी घेऊ नये किंवा घेतली, तर अगदी काही मिनिटेच घ्यावी.
4. तंबाखू, चहा किंवा कॉफी जास्त घेऊ नये. यांचा उपयोग सायंकाळी करण्याचा टाळावा.
5. रात्री किंवा झोपताना खूप खावू नये. मोजकेच खावे.
7. सायंकाळी अती व्यायाम करणे टाळावे.
7. झोपताना आंघोळ करणे किंवा शांत गाणी ऐकणे किंवा काही वाचणे अशा सवयी कराव्यात.
8. बेडरूममध्ये पुरेसा अंधार असावा. बेड स्वच्छ असावे. त्यावर दुसऱ्या वस्तू किंवा समान नको. झोपताना शरीराला टोचेल अशा गोष्टी नको.
वरील काळजी घेतल्याने झोप व्यवस्थित लागेल आणि दुसऱ्या दिवशी तरतरीत वाटेल.
– डॉ. शैलेश उमाटे
सायकायट्रिस्ट व सेक्सोलॉजिस्ट ठाणे