टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे मत
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : संपूर्ण देशात ब्रेन ट्यूमरमुळे वाढणाऱ्या बालरुग्णांची व यात होणाऱ्या त्यांच्या मृत्यूंची संख्या काहीशी वाढत आहे. परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात दरवर्षी २००० नवीन ब्रेन ट्यूमर रुग्णांची नोंद होत असून यात ५०० चिमुकले असल्याचे सांगत येथील तज्ज्ञांनी लवकर लक्षणे ओळखून उपचार व योग्य काळजी घेतल्यास ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांच्या मृत्यूत घट होऊ शकते, असे मत व्यक्त केले. Death due to brain tumor can be prevented with care

मुंबईतील परळ येथील टाटा रुग्णालयात ब्रेन ट्यूमर फाऊंडेशनच्या मदतीने ब्रेन ट्यूमरने ग्रस्त मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाटा रुग्णालयात दरवर्षी नोंदणी होणाऱ्या ५० टक्के आर्थिक दुर्बल घटकातील मुलांवर मोफत उपचार केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टाटासह सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रेन ट्यूमरसह कर्करोगाच्या उपचारांसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. मात्र टाटा रुग्णालयात गंभीर रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाते. टाटा रुग्णालयात दरवर्षी ३०० रुग्णांवर ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया केली जाते. यासोबतच ६००-७०० रुपयांची रेडिओथेरपी आणि ५०० रुपयांची केमोथेरपी केली जाते. मात्र कालांतराने उपचारात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केला जात आहे. यामध्ये बीम प्रोटॉन थेरपीचीही भर पडली आहे. या थेरपीतून निघणारे रेडिएशन केवळ कर्करोगाच्या पेशींना मारण्यास सक्षम असतात. या थेरपीतून निघणारे रेडिएशन केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचे काम करतात. युरोपमध्ये या थेरपीने सहा आठवड्यांसाठी ९० लाख ते १ कोटी रुपये खर्च येतो, तर टाटा मेमोरियलने हा खर्च ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत खाली आणला आहे. तर ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी १०-११ वर्षे वयापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन वर्षांनी ग्रोथ हार्मोन पूरक उपचार सुरू होतात. तसेच एक ते दोन वर्षांच्या मुलांना देण्यात येणारे इंजेक्शनची किंमत अधिक आहे, असे टाटा रुग्णालयातील डॉ. तेजपाल गुप्ता यांनी सांगितले.
देशात रुग्ण नोंदणीसाठी स्वतंत्र प्रणाली नाही. मात्र अंदाजानुसार देशात दरवर्षी १० ते १२ लाख नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळत असतील. यापैकी २० ते २४ हजार ब्रेन ट्यूमर, तर ५० ते ५० हजार हे ब्लड कॅन्सरचे रुग्ण आहेत. दुसरीकडे ब्रेन ट्यूमर आणि ब्लड कॅन्सरच्या एकूण प्रकरणांपैकी अनुक्रमे २५-३० टक्के मुलांचा वाटा आहे, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
ब्रेन ट्यूमर फाऊंडेशनची रुग्णांना मोठी मदत अनेक ब्रेन ट्यूमर बरे होऊ शकतात. काही वेळा बरे झाल्यावरही त्याचा त्रास आयुष्यभर राहतो. अशा परिस्थितीत ब्रेन ट्यूमरने त्रस्त मुलांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यात खर्चासहित राहण्याची सोयही ब्रेन ट्यूमर फाऊंडेशनकडून केली जाते.