मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांची खंत
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुधारणा करूनही राज्यांतील अधिकारी अजूनही ‘परवाना आणि नियंत्रण राज’च्या काळात असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात काम करूनही विकास दर वाढन्यामध्ये अडथळे येत असल्याची खंत देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकार व्यवसाय क्षेत्रातील वातावरण सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यामुळे व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने देशाच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. हे सर्व प्रयत्न भारतामध्ये व्यवसाय करणे सुलभ व्हावे आणि उत्पादन क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक राहण्यासाठी करण्यात येत आहेत; पण दुर्दैवाने त्याचे अपेक्षित परिणाम अद्याप दिसत नाहीत, याबद्दल भार्गव यांनी एका कार्यक्रमात बोलताना नाराजी व्यक्त केली. उत्पादक आणि उद्योजकांच्या मोठ्या वर्गाचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी जास्त संबंध असतात. मात्र केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारे आणि त्यांचे अधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. निर्णयांमध्ये खूप विलंब होतो. राज्यातील बहुतांश लोक वेळेला फारसे महत्त्व देत नाहीत. त्यामुळे प्रशासनाची वृत्ती परवाना आणि नियंत्रणाच्या काळात होती तशीच आहे, याकडे भार्गव यांनी लक्ष वेधले. उद्योजकही बऱ्याच प्रमाणात परवाना राजच्या काळात निर्माण झालेली मानसिकता अनुसरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी खासगी क्षेत्र परवान्याच्या अटींनी बांधले गेल्याने ते विकसित होण्याच्या किंवा नवनिर्मितीच्या स्थितीत नव्हते; पण परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल असताना मारुती कंपनी पुढे जाण्यात यशस्वी ठरली, असे भार्गव यांनी सांगितले.