ताराराणींच्या शौर्याला उजाळा; औरंगजेबाच्या दोन गुप्तहेरांनी इ. स. १७०० मध्ये तयार केला होता नकाशा
इसवी सन १७०० मध्ये औरंगजेबाने गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांच्या साहाय्याने तयार केलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या मूळ नकाशाचे छायाचित्र डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व संशोधक सचिन पाटील यांनी उजेडात आणले आहे. या नकाशामुळे पुन्हा एकदा महाराणी ताराराणी यांच्या शौर्यगाथेवर प्रकाश पडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजी जाधव आणि पन्हाळा किल्ल्याचे तत्कालीन किल्लेदार परशुराम त्र्यंबक यांनी १६९२ ते १७०१ असा सुमारे ९ वर्षे किल्ला सर्व बाजूंनी सुमारे ३० ते ४० हजारांच्या मुघल सैन्याचा वेढा पडलेला असतानाही धैर्याने व पराक्रमाने झुंजत ठेवला. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य ताब्यात घेण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब दिल्ली सोडून महाराष्ट्रात आला. त्याने मराठ्यांची राजधानी रायगड ताब्यात घेतली. यानंतर त्याने उपराजधानी पन्हाळ्याकडे कूच केली. औरंगजेबाने आपला नातू मुईझुद्दीन याला प्रचंड दारूगोळा व सैन्यासह पन्हाळा ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेकडील जिंजी किल्ल्यावर होते. महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळ्याचे किल्लेदार परशुराम त्र्यंबक यांनी सलग ९ वर्षे किल्ला लढविला. यामुळे शेवटी औरंगजेबाला स्वतः युद्धात भाग घ्यावा लागला. तत्पूर्वी, औरंगजेबाचे गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांना किल्ल्याची सर्व माहिती असलेला नकाशा बनविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. योजनेनुसार इसवी सन १७०१ ला औरंगजेबाने जवळपास ३० हजार सैन्याच्या साहाय्याने पन्हाळा किल्ला ताब्यात घेण्याचा मनसुबा तयार केला. त्याआधीच त्याने पन्हाळ्याच्या वेढ्याचा नकाशा तयार केला होता.
मुघल दरबारातील नोंदी
मुघल दरबारातील नोंदीनुसार, १ नोव्हेंबर १६९२ रोजी एका गुप्तहेराने औरंगजेबाला किल्ल्याला दोनच दरवाजे असल्याची माहिती दिली. १ एप्रिल १६९३ च्या नोंदीनुसार, हिंदू व राजपूत राजे व सरदारांनी पन्हाळ्यास वेढा घातला. पन्हाळ्याच्या वेढ्यात होळीचा सणही साजरा केला होता. यानंतर दि. २६ ऑगस्ट १७०० रोजी खवासपूर (सांगोला परिसर) येथे वास्तव्यास असलेल्या औरंगजेबाने पन्हाळा किल्ल्याचा नकाशा पाहिला. सलग ९ वर्षे रणरागिणी ताराराणी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पन्हाळगड लढविला. अखेर दि. २८ मे १७०१ रोजी औरंगजेबाने किल्ला ताब्यात घेतल्याची नोंद असल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली.
नकाशाची वैशिष्ट्ये
या नकाशात पन्हाळगडावरील वाघ दरवाजा, तीन दरवाजा, सोमेश्वर तलाव, सदोबा तलाव, खोकड तलाव तसेच किल्ल्याचे मुख्य दरवाजे दिसतात. चार दरवाजा हा रणमंडळ प्रकारातील मोठा दरवाजा वक्र बाजूने दर्शविला आहे. इसवी सन १६६० मध्ये सिद्धी जोहरच्या वेढ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरील प्रत्येक बुरूज आणि तटबंदीस तोफांच्या साहाय्याने मजबूत केले होते. त्या तोफांचेही अस्तित्व या नकाशावर दाखवले आहे. या वेढ्यामध्ये प्रामुख्याने मुघल, हिंदू, राजपूत आणि ब्रिटिश सैनिक असल्याने ब्रिटिश ध्वजासह भगवे व हिरव्या रंगाचे झेंडे यात दिसतात. तसेच ब्रिटिश अधिकारी सर विल्यम्स नॉरिस यांनीही या युद्धात भाग घेतला होता, असे संदर्भ साधनात दिसत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

• रणरागिणी ताराराणीच्या युध्दप्रसंगाचे हे कल्पनाचित्र.

इसवी सन १७०० च्या दरम्यान औरंगजेबाचे गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांनी तयार केलेल्या पन्हाळगडाच्या नकाशाचे दुर्मीळ छायाचित्र.
‘फोर्ट ऑफ शिवाजी’ या संग्रहातील हा नकाशा जयपूर येथील द सिटी पॅलेस येथील महाराजा सवाई मानसिंग (द्वितीय) म्युझियममध्ये असून, तो सामान्य लोकांसाठी पाहण्यास उपलब्ध नाही. इंग्रजी मासिक ‘द इंडिया मॅगझिन ऑफ पीपल अँड कल्चर’ यांनी फेब्रुवारी-मार्च १९९६ ला ‘नकाशे आणि प्रवास’ या विशेष अंकात ‘सियेज ऑफ पन्हाळा’ या मथळ्याखाली या नकाशाचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. – सचिन पाटील, पुरातत्त्व अभ्यासक