” काय श्यामराव कवा चारता पोरीच्या लगनाचा बुंदा. “
” साजरा सोयराच मनाजोगता भेटूनं नाह्यी राह्यला ना बावा डिग्या. “
” कसा पायजे. “
” दनकट कास्तकार पायजे ब्वा. “
” मंग जितापूरले हाय एक सोयरा. पन्नासक एक्कर वावर हाय. “
” पोरगं काय करते. “
” कास्तकारी… दुसरं काय करनं भोकाचे वळे काहाळनं काय. इतल वावर असल्यावर थ्याले नि-हा वावरातच चकरा मारा लागते. अन् एकुलत एक हाय. काय पा लागते. “
” दारू गीरूचा नांद नाही ना!”
” एकदम मस्त हाय पोरगं. सुपारीचं खांड त खात नाही. “
” घरदार. “
” टोलेजंग वाळा हाय. बारा तेरा जोळ्या, गायी, म्हसाळानं गोठा भरलेला. लक्षुमी पानी भरते तथिसा काहाचीच कमी नाही अमरीत सोळूनं. “
” मंग त बर हाय ब्वा. “
” बरं ऽऽऽ वज्जेर साजरं. “
” कवा चलत मंग पाहाले. “
” त्याच्या मामासंग बोला लागनं आंधी. हिरपूरले थ्या पोराचा मामा राह्यते. माह्यावाला थो दोस्त हाय. “
” घे मंग ईचारूनं पाहून येवू घरदार…”
श्यामराव डिंगाबरले बोल्ला…
कुरूम एक लहानस गाव. ह्या गावात श्यामराव त्याची बायको शंकुतला अन तेयले एक पोरगं गजानन अन पोरगी छबू हे राह्यत होते. श्यामरावचा जिगरी मैतर दिगंबर होता. सुखादुखात थो सावली सारखा ऊबा राह्ये.
छबू नयतरनी झाली होती. गोरीपान दुधासारखी दिसत होती. लंबे दाट कुरळे केस, चरचरीत नाक, भोकरावानी घारे टपोरे डोये, चेह-याले सोभन असे कान, ऊच्चीपुरी मान,ध्यान ओहळूनं घेनारा ठसठशीत ऊभार गावातल्या पोरायले पिसे करूनं टाकत होती. छबू अठरा सालची झाली होती. गावातल्या हरेक येटायातले दोन चार पोरं पिसे झाले होते. तीची एक झलक पायन्यासाठी तीच्या घरापुळे कुत-यासारखे घुटमयत. नयतुरन्या पोरायच्या घोयक्यातला छबूचा ईषय हा आवळीचा ईषय ठरत होता.
दिंगाबरनं पोराच्या मामाजौळ बझाराच्या दिवशी छबू ईषयी ईचार बोलूनं दाखवला. होकार आला. पोरगी पाहाचा दिस ठरला. पोरग, पोराचा बाप, पोराचा मामा अन् पोराचा काका छबूले पाहाले ठरल्या दिवसाले आले. हे बातमी हा हा म्हनत गावभर वा-यावर पसरली. छबूवर मरनारी पोरं कवरीबावरी होवून दुखी झाली.
पावणे श्यामरावच्या घरी ऊतरले. बाजीवर नव्या चाद-या टाकन्यात आल्या होत्या, घर निटनेटकं केलं होतं. ऊंब-यावरचं खराब गोन्ट काहाळूनं गव्हाच नव गोन्ट टाकलं होतं. नवा टवालं ठेवनीतला काहाळला गेला. इस्टीलची बादली पानी भरून, पितयीचा गीलास आंगनात ठेवण्यात आला. नवाकोरा टवाल वयनाटीच्या बांबूंले लटकवन्यात आला. हिंगनबेट बादली शेजी ठेवन्यात आलं. एक दा बारा सालचं पोरगं तथिसा ऊभ केलं. पावने आले हातपाय धुन्यात आले. बैकटीत बसले. चा पानी झालं. वावरा- शिवराच्या गोश्टीमाश्टी झाल्या. पंगता बसल्या. श्यामराव ईकळूनं डिंगाबर, श्यामरावचा मोठा भाऊ, छबूचा मामा, जातीतले तीन बोलके बुडे. जेवनं झाले. तमाखू, पान खान्यात आले. छबू तयारी करत होती. चौकळी लुगळं थे पयल्यादाच नेसली होती. तोंडावर खाकी पावडर तीनं लावलं. ओतं. हयदी कुकवाच बोटं लावलं. अन पावन्यात डोक्शावर शेव घेवूनं पिळ्यावर येवूनं बसली. गावात गलका ऊळाला होता. छबूवर मरनारे पोरं कासावीस झाली होती.
छबू थरथरत होती. तीनं चहाचे कप आनले होते. थरथरत्या हातानं तीनं कप पाव्हन्यायच्या हातात देल्ले होते. पाव्हन्यायनं ईचारलेल्या सवालायनं छबू भंडावूनं गेली होती. नाव, जल्मनाव, मामकूळ, हात दाखव, तयपाय दाखव, दोरीनं किती ऊच्ची हाय थे मोजली. सवाल जबाब झाल्यावर तीले जा च सांगलं. थे सा-या लोकायच्या पाया पळत पुळ पुळ सरकत होती. कोनी आठाने त कोनी चाराने हातावर टेकवत होते. पायन्याचं काम सरलं देन घेनं ठरलं. तारीख ठरली. अन् तारखीपरमान छबूच लगन झालं. गावातले सारेच नयतुरने हवालदिल झाले. कोनी फाशी लावून घे, कोनी दारूच्या आहारी गेलं, कोनी मुकने झाले …. छबू लगन होऊन तीच्या सासरी गेली होती. सासरी सुखात नांदत होती. छबूच्या नव-याची हयद ऊजयली अन् थो मॅटावानी कराले लागला. न खाता – पिता थो गावभर फिराले लागला. भूक लागल्यावर थो ऊकंड्यावरलं जे भेटन थे खावू लागला. तहान लागल्यावर नालीतलं पानी पिवू लागला. त्याचे मायबाप, छबू समजावले आले की, थो दूर पवूनं जाये. छबूच्या गावातल्या पोरायची बददूवा लागली की काय असा ईचार छबू करत होती. दिसमास लोटत होते. छबू सासू सास-याचा भाकर टुकळा नितनेमान करत होती. भाकरीची शिदोरी घेऊन थे नव-याले गावात धुंडाळत फिरत असे. नवरा कधी आंगनात येवून झोपे त कधी पिपयाच्या पारावर. दिसमास लोटत होते. ऊन्हायात श्यामराव आंब्याच्या रसाले घ्याले आला. पोरगी छबू रांधन घरात सयपाक करत होती. श्यामरावनं आंगनातून हाका मारल्या….
” छबू ऽऽऽ अय छबूकडे. “
बापाचा आवाज कानी पडताच छबू एखांद्या वासरासारखी धावत पयत जावूनं बापाले बिलगली.
” अव येडा बाई लळत काहाले. तुले काय दिल्ली बंबईले देल्ल काय? सा कोसावर तुव गाव. जवाई बुवा कुठसा हायेत. “
” वावरात गेले अज पट्टा पास हाय. “
” बरं तुवा कसा काय हाय चालू सनसार. “
” सार आंगनातच बोलसान काय चला बैकठीत. “
छबू बापाले बोल्ली …
चा पानी झालं.. छबू सपाट्यात सैपाकाले भिळ्ळी नव-याचा भाकर टुकळा कराचा हाय. राती नवरा आला नाही. ऊपाशी असन कुठ असन…असे येगयेगळे ईचार छबूच्या मनात येत होते. सास-याले अन् बापाले छबूनं ताट वाहाळून देल्ल. नव-याले शिदोरी बांधली.
” बा मी बात वावरात ययले शिदोरी पोस्त करून येतो. ” छबू बापाले बोल्ली अन् नवरा आंगनात अवतरला… डोक्स खाजवत ऊबा झाला…
” दे थ्या येड्यापिश्याले भाकर टुकळा अन् हकाल अथूनसन्या. “
श्यामराव छबूले बोल्ला… तसा ईवाई तावात आला.
” तुम्चा जवाई होय थो श्यामराव. “
” काय जवाई? …. “
श्यामरावच्या बोटात धरलेला घास ताटात अल्लादी पळ्ळा.
” कवा पासून हे अस झालं छबू. “
” लगनाच्या चार रोजा पासूनं. “
” अन त्वा आतापावतर सांगल नाही. चल आपल्या घरी. “
” नाही बा! आता हेच माह्य घर. माह्य कुकू जिथ तिथ मी. मंगयसुत्र मी आता काहाळू शकत नाही. आता ह्या घरातून चार खांद्यावरच मी आखरीले निघन. तुम्ही जेवन करून जा. “
पोरीचे बोल आयकून श्यामराव धाय मोकलून लळू लागला… न जेवताच श्यामराव दुप्पट्याले डोये पुसत पोरीचे घर सोळ्ळ…
लेखक
सु.पुं.अढाऊकर
अकोला
९७६९२०२५९७