वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

बदलत्या काळानुसार निर्माण होणारी आधुनिक साधने आणि सुविधा याचा वापर हा अधिक गतीने सर्वत्र केला जात आहे. त्यामुळे परंपरेमध्ये देखील बदल होऊ लागला आहे. पूर्वीच्या काळी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींग कार्डाचा वापर केला जात होता. मात्र आता अशी ग्रिटींग कार्ड म्हणजेच शुभेच्छा पत्रे दुर्मिळ झाली आहेत. दिवाळीत नवीन कपडे, गोडधोड पदार्थ, फटाके, सजावट, रंगरंगोटी, धार्मिक पुजा अर्चा, नवीन वस्तूंची खरेदी याबरोबरच एक मेकांना |दिवाळीच्या शुभेच्छा देवून |दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला जातो. कुटूंबियांसह मित्र परिवार, नातेवाईक, यांना विविध माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. या शुभेच्छा देण्यामागे परस्परातील जिव्हाळ्याचे नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न होत असतो.
पूर्वी दिवाळीच्या शुभेच्छांसाठी विविध प्रकारचे ग्रिटींग कार्ड अर्थात शुभेच्छा पत्रांचा प्रामुख्याने उपयोग केला जात होता. दिवाळीच्या आगोदर अनेक दिवस बाजारात आकर्षक शुभेच्छा पत्रे खरेदी करण्यासाठी झुंबड उडत होती. दिवाळीतील वसुबारस, धनोत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज याच्या संदर्भाने अर्थपूर्ण मजकूर व काव्यपंक्ती असलेली शुभेच्छा पत्रे खरेदी केली जात होती. शुभेच्छा पत्रे देखील मोठ्या कल्पकतेने निर्माण केली जात होती. त्याच्यावर आकर्षक रंग छटा व चित्रे लक्षवेधी ठरायची. काहीजण स्वतः घरी अशी शुभेच्छा पत्रे बनवत होते. शाळकरी मुले काही घरगुती साधनांचा वापर करून मोठ्या खुबीने चांगली शुभेच्छा पत्रे बनवत असत. दिवाळीत अशी शुभेच्छा पत्रे एकमेकांना देण्यासाठी उत्सुकता असायची. तसेच परगावातील नातेवाईकांना देण्यासाठी ती पोष्टाद्वारे पाठवली जात होती.
अनेकजण दिवाळी खर्चात भेट कार्ड खरेदीचे नियोजन देखील करत होते. तयार भेट कार्ड विकणारी अनेक दुकाने होती. दिवाळीच्या आगोदर अशी छापील भेट कार्डे बाजारात दाखल झाली कि ती खरेदीसाठी गर्दी होत होती. या भेटकार्डामुळे दिवाळीचा आनंद वाढत होता.
आपले व्यवसायिक संबंध दृढ करण्यासाठी अनेक मोठ्या संस्था व कंपन्या सर्वसंबंधितांना दिवाळीचे शुभेच्छा पत्र पोहचवण्याची खबरदारी घेत होते. आता बदलत्या जामाण्यात दिवाळीत शुभेच्छांसाठी ग्रिटींग कार्ड दिसून येत नाही. आज शुभेच्छा देण्याची प्रथा कायम राहिली आहे. मात्र बदलत्या काळानुसार शुभेच्छा देण्याचे स्वरूप व माध्यम बदलले आहे. आज काही सहकारी संस्था, बँका, लहानमोठ्या कपंन्या, राजकिय नेते यांच्याकडून काही प्रमाणात दिवाळी शुभेच्छा पत्रांचा वापर केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने संपर्काचे एक निमित्त म्हणून दिवाळी ग्रिटींग कार्ड नेते मंडळींकडून दिली जात आहेत. मात्र त्यामागे राजकिय हेतू देखील असू शकतो. दिवाळी ग्रिटींग कार्डचे असे काही अपवाद वगळता अनेजणांनी दिवाळीतील ग्रिटींगला फाटा दिला आहे. शुभेच्छा दिल्या जातात. मात्र त्यासाठी आता दिवाळीचे ग्रिटींग राहिले नाहीत.
मोबाईलचा जमाना आल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जावू लागल्या. तेव्हा अनेक जण शुभेच्छांसाठी बल्क एसएमएसला प्राधान्य देत होते. या काळातच शुभेच्छा पत्रांना घरघर लागली. तंत्रज्ञानाचा गतीने स्विकार करणारी नवी पिढी पुढे आली. फेसबुकसह मोबाईलमध्ये व्हॉटस अॅप सारखे माध्यम आले. मग एसएमएस देखील मागे पडले. आता फेसबुक, व्हॉटस्अॅप अशा सोशल मिडियाच्या माध्यमातूनच दिवाळीसह अन्य विविध नैमित्तिक शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीतील शुभेच्छा पत्रे आता कालबाह्य ठरली आहेत. नव्या तंत्राने दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत आहे. दिवाळी सारख्या सणांमधील शुभेच्छा देण्याच्या पद्धतीत झालेला बदल स्पष्टपणे जाणवणारा आहे. शुभेच्छांसाठीचे माध्यम बदलले असले तरी परस्परांप्रती असणाऱ्या शुभेच्छा व सदिच्छा कायमपणे रहाव्यात.