कलेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेकांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी ठरणारे आहे. अभिनय आणि कला याबरोबरच सामाजिक स्तरावर आणि काही प्रमाणात साहित्य क्षेत्रात लेखिका या भूमिकेतून चांगले योगदान दिलेल्या प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. विविध पातळीवर प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध माध्यमांतून स्वत:ला आजमावत स्वत:ची जागा निर्माण केली ती प्रिया विजय तेंडुलकर यांनी. प्रिया विजय तेंडुलकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. ज्येष्ठ नाटककार आणि पटकथाकार विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या होत. प्रिया तेंडुलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. अभिनय कलेबरोबरच प्रिया या उत्तम चित्रकार आणि लेखिकासुद्धा होत्या. बी. ए. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिया तेंडूलकर यांनी जे.जे. मधून चित्रकला विषयात दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पण केवळ चित्रकला विषयाचे शिक्षक एवढेच करिअर करायचे नसल्याने प्रिया या अभिनयाकडे वळल्या. वडील विजय तेंडूलकर यांच्या लेखन कलेचा वारसाही त्यांनी पुढे चालवला. त्यांनी १९६९ साली गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’ या नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी या नाटकात कल्पना लाझमींबरोबर एका बाहुलीची भूमिका केली. ‘पिग्मलियन’, ‘अँजी’, ‘कन्यादान’, ‘सखाराम बाइंडर’, ‘कमला’ अशा काही नाटकांमधूनही प्रिया तेंडुलकर यांनी भूमिका केल्या. अशा हौशी आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या. ‘अंकुर’ या १९७२ साली प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल याच्या पहिल्या वास्तवदर्शी चित्रपटात त्यांनी अनंत नाग यांच्या सोशिक पत्नीची भूमिका साकारली. रंगभूमी, जाहिरात क्षेत्र, दूरदर्शन या माध्यमांमध्ये हिंदी भाषिक कलाकारांबरोबर आणि कलाकृतींशी त्यांनी सहजपणे जुळवून घेतले. अशोक सराफ, रवींद्र महाजनी, महेश कोठारे या सहकलाकारांबरोबर ‘गोंधळात गोंधळ’ (१९८४), ‘मुंबईचा फौजदार’ (१९८५) अशा काही मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केले. याशिवाय ‘मिनचिना ओटा’ या कानडी चित्रपटात अनंत नाग यांना तुल्यबळ अशी महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘पूजा ना फूल’ या गुजराती चित्रपटामधली नायिकेची त्यांची भूमिकाही नावाजली गेली. १९८५ साली बासू चॅटर्जी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या ‘रजनी’ या साप्ताहिक मालिकेमध्ये प्रिया यांना संधी दिली. या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळे प्रिया तेंडुलकर हे नाव तेव्हा चर्चेत राहिले. ‘रजनी’ या भूमिकेमुळे त्यांना स्वतंत्र अशी ओळख मिळाली. रजनी मालिकेनंतर गुलजार यांच्या ‘स्वयंसिद्धा’ या स्त्रीवादी मालिकेतही प्रिया तेंडुलकर यांनी काम केले. ‘महानगर’, ‘हक्के-बक्के’, ‘किस्से मियाँ बिवी के’ अशा काही मालिकांमधील अभिनयासाठीही प्रिया यांचे नाव घेतले जाते. प्रिया यांनी कथालेखनाद्वारे आणि वर्तमानपत्रातील सदरलेखनाद्वारे वारशाने मिळालेली लेखनकलाही जोपासली.
१९९६ साली ‘असंही’ हा निवडक सदरलेखनाचा संग्रह प्रकाशित झाला. २००० सालापर्यंत त्यांचे ‘जन्मलेल्या प्रत्येकासाठी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ आणि ‘जावे तिच्या वंशा’ हे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. या कथासंग्रहातून माणसांच्या आयुष्याकडे, विशेषत: स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहाण्याचा स्वतंत्र आणि व्यापक दृष्टिकोन दिसतो. कधी संवेदनशील, कधी उपहासात्मक तर कधी चिंतनशील लेखन करणारी मनस्वी लेखिका म्हणून प्रिया तेंडुलकर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. जगाची ओळख करून देणारे स्वानुभव त्यांनी ‘पंचतारांकित’ या चरित्रवजा पुस्तकात अतिशय सहजसोप्या व ओघवत्या शैलीत मांडले आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रिया तेंडुलकर यांच्या लिखाणाचा ठसा कथालेखनातही उमटला आहे. प्रिया तेंडुलकर यांचे कार्य हे विविध क्षेत्राच्यादृष्टीने प्रेरणादायी ठरले. मात्र आजारपणामुळे १९ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. एका गुणी अभिनेत्रीने, लेखिकेने अल्पायुष्यातच कलाजगताचा निरोप घेतला.