मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. आकसापोटी कोणावरही कारवाई केली जाणार नाही असं सांगत विरोधकांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजाला सरकारनं संपूर्ण अभ्यास करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आरक्षण दिलं आहे त्यामुळे याबद्दल कोणीही संभ्रम निर्माण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
जातीय कलह निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कायद्याला धरून नसणाऱ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नव्हतं. जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत होते तेव्हा त्यांना पाठिंबा दिला मात्र जरांगे यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून त्यांची भाषा राजकीय झाली अशी टीका त्यांनी केली. त्यापूर्वी या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी आणि गदारोळ झाला झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं. तसंच विरोधकांनी सभात्यागही केला. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते आज प्रवीण दरेकर यांनी केली. उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसंच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला त्या आर्थिक व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली.