अलिबाग. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी असलेल्या अनेक निकषांपैकी महत्वाचा भाषेच्या प्राचीनतम असण्याचा निकष माय मराठीने पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे याचा पुरावा म्हणून 934 मध्ये कोरला गेलेला शिलालेख रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे उभा आहे. कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इ.स. 1116-17 च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. श्री चामुण्डाराये करवियले, गंगारा सुत्ताले करवियले अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आहे आहे.
पहिलाच पुरावा : पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित होता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचे गतवर्षी सुशोभीकरण करण्यात आले. ज्येष्ठ पुरातत्व तज्ज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके 934 म्हणजे इ.स. 1012 झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.
आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराय यांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके 934 मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारच्या भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप असे जे निकष आहेत, त्या निकषांपैकी भाषेची प्राचीनता या निकषासाठी आक्षी येथील हा आद्य शिलालेख अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे वय एक हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध करणारा आहे. (वृत्तसंस्था)